Team India Playing 11 Prediction For 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १–० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना एडबस्टनच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर पहिल्या कसोटीत केलेल्या चुका सावरणं गरजेचं असणार आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी केली. दोन्ही डावात मिळून टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी ५ शतकं झळकावली. त्यामुळे सलामी जोडीत कुठलाही बदल होणार नाही. पहिल्या सामन्यातील शतकवीर केएल राहुल यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरूवात करू शकतो. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना केएल राहुलने शतकी खेळी केली. त्यामुळे या जोडीत कुठलाही बदल होणार नाही.

पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शनला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यातील पहिल्या डावात तो शून्यावर माघारी परतला. तर दुसऱ्या डावात त्याला चांगली सुरूवात मिळाली, पण तो ३० धावा करत माघारी परतला. पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला असला तरीदेखील दुसऱ्या सामन्यात त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

शुबमन गिलने पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना दमदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे भारताचा कर्णधार या सामन्यातही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर उपकर्णधार ऋषभ पंत या सामन्यातही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. ऋषभने पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात शतकं झळकावली होती. ८ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करत असलेला करुण नायर पहिल्या कसोटीतील दोन डावात फ्लॉप ठरला. मात्र, त्याचा अनुभव पाहता त्याला या सामन्यातही संधी दिली जाऊ शकते. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघातील सर्वात अनुभवी खेळाडू रविंद्र जडेजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळेल. तर दुसरीकडे शार्दुल ठाकूरला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. जर बुमराहला विश्रांती दिली गेली तर, त्याच्या जागी डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्रमुख वेगवान गोलंदाज असू शकतात.