Team India Squad For Asia Cup 2025: येत्या ९ सप्टेंबरपासून एशिया कप स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. गिल टी-२० संघात परतला आहे. या संघाची घोषणा होण्याआधी त्याला टी-२० संघात स्थान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आता बीसीसीआयने त्याला उपकर्णधार बनवलं आहे. त्यामुळे त्याचं संघातील स्थान निश्चित झालं आहे. तो अभिषेक शर्मासोबत डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो. त्यामुळे संजू सॅमसनला संघात स्थान मिळूनही प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

आशिया चषकासाठी घोषणा करण्यात आलेल्या भारतीय संघात ३ सलामीवीर फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या संघात उपकर्णधार शुबमन गिल, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे ३ सलामीवीर फलंदाज आहेत. अभिषेक शर्मा सध्या टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्याची शक्यता खूप कमी आहे.तर शुबमन गिल संघाचा उपकर्णधार आहे. संघाचा उपकर्णधार प्लेइंग ११ मधून बाहेर होईल, असं होणं देखील खूप कठीण आहे. त्यामुळे संघाची सलामीवीर जोडी कोण असेल, हे आधीच ठरलं आहे. तर टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला फलंदाज तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. त्यामुळे सलामी जोडी आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आधीपासूनच ठरला आहे. जर या तिघांपैकी एकही फलंदाज बाहेर झाला, तर संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळू शकते.

यष्टीरक्षक म्हणून कोण?

तर आशिया चषक स्पर्धेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जर टॉप ३ मध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर संजू खालच्या फळीत फलंदाजीला येणार का? तर असं होण्याची शक्यता खूप कमी आहे. जितेश शर्मा हा खालच्या फळीत फलंदाजी करताना मोठे फटके मारू शकतो. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. पत्रकार परिषदेत अजित आगरकरांनी स्पष्ट सांगितलं आहे की, “शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल संघाचा भाग नव्हते, त्यामुळे संजू सॅमसनला संधी दिली जात होती.” आता गिल परतला आहे आणि सलामी जोडी ठरली असं दिसून येत आहे. त्यामुळे आगामी आशिया चषकात संजू सॅमसनला संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आगामी आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह.