Team India Squad For IND vs WI Series: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला येत्या २ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.
याआधी भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. विराट आणि रोहितने या मालिकेला सुरूवात होण्याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी युवा कर्णधार शुबमन गिलवर होती. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली होती. ही मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती. आता वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड दौऱ्यावर जे खेळाडू भारतीय संघाचा भाग होते, त्यापैकी काही खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे.
या खेळाडूंना मिळाला डच्चू
वेस्टइंडिज होणाऱ्या मालिकेतून अभिमन्यू इश्वरन, करूण नायर आणि ऋषभ पंत या ३ फलंदाजांना बाहेर करण्यात आलं आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. यातून तो पूर्णपणे सावरू शकलेला नाही. त्यामुळे त्याला या मालिकेसाठी संधी देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे ७ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करत असलेल्या करूण नायरला आपली छाप सोडता आली नव्हती. त्यामुळे त्याला या मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे. यासह एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या अभिमन्यू इश्वरनला देखील या मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.
यासह वेगवान गोलंदाज आकाशदीप, अर्शदीप सिंग, अंशुल कंबोज, हर्षित राणा आणि शार्दुल ठाकूर यांना देखील या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातून बाहेर करण्यात आलं आहे. अंशुल कंबोजला इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत १ सामना खेळण्याची संधी मिळाली होती. पण तो आपली छाप सोडू शकला नव्हता. तर अर्शदीप सिंगला संपूर्ण मालिकेत बाकावर बसून राहावं लागलं.यासह शार्दुल ठाकूर आणि हर्षित राणाला देखील वेस्टइंडिज विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातून कोणाला वगळलं?
अभिमन्यू इश्वरन
करुण नायर
ऋषभ पंत ( दुखापतीमुळे)
आकाश दीप
अर्शदीप सिंग
अंशुल कंबोज
शार्दूल ठाकूर
हर्षित राणा
इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव