नवी दिल्ली : भारताने परिस्थितीचा विचार करूनच आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड केली पाहिजे. दोन वर्षांपूर्वी अंतिम सामन्यासाठी भारताने संघनिवड करताना पूर्वग्रह बाळगला होता. यंदा त्यांनी ही चूक करता कामा नये, असे मत भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केले.
दोन वर्षांपूर्वी ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. साउदम्पटन येथे ढगाळ वातावरण असूनही भारताने रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिले होते. याचा भारताला फटका बसला. यंदा
७ जूनपासून ओव्हलवर खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळू शकेल. मात्र, सामन्याच्या दिवशी परिस्थिती पाहूनच भारताने संघनिवड करणे गरजेचे आहे, असे प्रसाद यांना वाटते.




‘‘गेल्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यापूर्वीच भारतीय संघाचे दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचे ठरले होते. मात्र, सामन्याच्या दिवशी पाऊस झाला. या परिस्थितीत भारताने आपल्या योजनेत बदल करणे गरजेचे होते. परंतु, भारताने आधी ठरवलेल्या संघासहच खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. जे झाले ते झाले, पण यातून भारतीय संघाने धडा घेतला पाहिजे. ओव्हल येथील परिस्थिती, खेळपट्टी आणि वातावरण लक्षात घेऊनच भारतीय संघाने अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे आवश्यक आहे,’’ असे प्रसाद म्हणाले.
पंतची उणीव जाणवेल
यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पंतने परदेशातील कसोटी सामन्यांत केलेली कामगिरी पाहता, भारताला त्याची उणीव नक्कीच जाणवेल, असे प्रसाद यांना वाटते. ‘‘परदेशात पंतची जागा घेणे कोणत्याही खेळाडूला अवघडच जाईल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अन्य कोणत्याही यष्टिरक्षकाने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत शतके केलेली नाहीत,’’ असे प्रसाद म्हणाले. ‘‘पंतच्या अनुपस्थितीत भारताने केएस भरतला संघात स्थान दिले पाहिजे,’’ असेही प्रसाद यांनी सांगितले.