वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य दिले आहे. दोन्ही संघांनी या सामन्यात बरोबरीची झुंज दिली आहे. मिचेल स्टार्कने तिसऱ्या दिवशी ५८ धावांची वादळी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या धावांमध्ये महत्त्वपूर्ण भर घातली. तर दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात मारक्रमने चांगली सुरूवात करत संघाचा डाव एका टोकाने सावरला आहे. तर तेंबा बावूमाने त्याला उत्कृष्ट साथ देत अर्धशतकी खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाला दुखापत झाली असून त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतक संघासाठी झळकावलं आहे. बावुमाने ८३ चेंडूत ही अर्धशतकी खेळी केली आहे. तेंबा बावूमा फलंदाजीला उतरल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाली आहे. मैदानात खेळ थांबवत फिजिओने त्याला तपासलं. बावुमाला मैदानात नीट चालताही येत नव्हता. धावताना त्याला होत असलेला त्रास आणि वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. पण तरीही त्याने मारक्रमसह चांगली भागीदारी रचली.

दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०७ धावांवर सर्वबाद केले. यासह दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे मोठे लक्ष्य दिले. लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर धावांचा पाठलाग करण्यासाठी ही धावसंख्या मोठी आहे. दक्षिण आफ्रिकेने चांगली सुरूवात केली पण मिचेल स्टार्कने सुरूवातीला विकेट घेत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर एडन मारक्रमने वियान मुल्डरच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर स्टार्कने मुल्डरला झेलबाद करवत संघाला दुसरा धक्का दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२ विकेट्स गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमा फलंदाजीला आला. त्याने येताच मोठा फटका खेळला आणि ३ धावा केल्या. यानंतर धाव घेताना त्याच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत जाणवली. फिजिओदेखील मैदानावर आले आणि काही वेळ खेळ थांबला. पण तरीही बावुमाने मैदान सोडलं नाही आणि फलंदाजी करत राहिला. टीब्रेकनंतर पुन्हा मैदानावर आल्यानंतरही त्याच्या हॅमस्ट्रिंगचा त्रास कायम होता. नीट चालताही येत नसताना एका पायाने धावत धावत त्याने संघासाठी अर्धशतकी खेळी साकारली. यासह त्याने एडन मारक्रमला चांगली साथ देत शतकी भागीदारी केली.