पीटीआय, नवी दिल्ली
दुसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बरोबरी साधल्यानंतरही उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ निवडीची प्रतिक्षा कायम राहिली आहे. उर्वरित सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीच्या बैठकीत श्रेयस अय्यरचा सहभाग हा मुद्दा ऐरणीवर असेल.
श्रेयसला पहिल्या दोन्ही सामन्यातून फारशी चांगली कामगिरी दाखवता आलेली नाही. दुसऱ्या कसोटीत त्याने क्षेत्ररक्षण करताना बेन स्टोक्सला केलेले धावबाद हीच काय ती त्याची छाप पडली आहे. पण, त्यानंतरही त्याची तंदुरुस्ती त्याच्या कामगिरीच्या आड येत असल्याची चर्चा आहे. पाठ आणि कंबरेच्या दुखापतीतून श्रेयस अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही असेच चित्र सध्या दिसून येत आहे. कदाचित या कारणाने वगळण्यापूर्वी श्रेयसच माघार घेण्याची शक्यता अधिक आहे.
श्रेयसने माघार घेतल्यास राहुल आणि रवींद्र जडेजा या जायबंदी खेळाडूंच्या यादीत आणखी एकाची भर पडणार आहे. तारांकित फलंदाज विराट कोहलीच्या उपलब्धतेविषयी देखील चर्चा सुरू आहे. सध्या तरी तो तिसऱ्या व चौथ्या सामन्यात खेळणार नाही हे जवळपास निश्चित आहे.
एकूणच ही सगळी परिस्थिती आणि जयबंदी खेळाडूंची उपलब्धता माहित पडल्यावर अंतिम संघ निवडला जाईल असे समजते आहे. राहुल आणि जडेजा यांना पुन्हा संघात स्थान मिळणार अशी अटकळ बांधली जात असली, तरी संघात निवड होण्यापूर्वी राहुल आणि जडेजा यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. श्रेयसही बाहेर राहिल्यास पदार्पणात मोठा प्रभाव पाडू न शकलेल्या रजत पाटीदारला आणखी एक संधी मिळू शकते. राहुल, जडेजा तंदुरुस्ती चाचणी देऊ शकले नाहीत, तर मुंबईच्या सर्फराजच्या संधीची शक्यता अधिक वाढते. तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार असून, भारतीय संघ ११ फेब्रुवारीस राजकोटला दाखल होईल. इंग्लंड संघ सध्या अबु धाबी येथे सराव करत असून, ते १२ फेब्रुवारीस राजकोटला येतील.
हेही वाचा >>>यंदाचे ऑलिम्पिक पूर्वीपेक्षा आव्हानात्मक! अनुभवाची शिदोरी महत्त्वपूर्ण; भारताची बॅडमिंटनपटू सिंधूचे मत
बुमराला विश्रांती?
गोलंदाजीवरील ताण कमी करण्यासाठी भारत उर्वरित सामन्यांसाठी जसप्रीत बुमराला विश्रांती देणार असा एक अंदाज आहे. पण, दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याची घेतलेली धास्ती लक्षात घेता लगेच त्याला विश्रांती दिली जाणार नाही असा एक अंदाज आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याला स्थान देऊन चौथ्या किंवा पाचव्या कसोटीसाठी बुमराला विश्रांती दिली जाऊ शकते.