संदीप कदम
अहमदाबाद : भारत- पाकिस्तान सामन्याकरता सीमेपलीकडील चाहत्यांना ‘व्हिसा’ नाकारल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. तसेच बऱ्याच पत्रकारांनी ‘व्हिसा’साठी प्रयत्न केले, यापैकी काहींचेच प्रयत्न यशस्वी झाले. भारतात आल्यानंतर क्रिकेटबद्दलचे भारतीयांचे वेड आणि आदरातिथ्य पाहून ते भारावून गेले व भारतात आल्याचा आपल्याला खूप आनंद झाल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्रातील पत्रकार भारतात येण्याच्या अनुभवाबद्दल म्हणाले, ‘‘पाकिस्तानमधील अनेक पत्रकारांना या सामन्याच्या वृत्तांकनासाठी यायचे होते. मात्र, सर्वाना ‘व्हिसा’ मिळाला नाही. ‘व्हिसा’ मिळालेल्या काही मोजक्या पत्रकारांपैकी मी एक आहे. ‘व्हिसा’ मिळाल्याची बातमी कळताच खऱ्या अर्थाने आमची धावपळ सुरू झाली. मी कराचीमध्ये राहत असल्याने मला ‘व्हिसा’ घेण्यासाठी इस्लामाबादला जावे लागले. तेथून आम्ही वाघा सीमेवरून अमृतसरमध्ये दाखल झालो. त्यानंतर तेथील विमानतळावरून आम्ही दिल्ली आणि नंतर दिल्लीमार्गे अहमदाबादला आलो.’’
हेही वाचा >>>IND vs PAK: पराभवानंतर बाबरने जिंकली चाहत्यांची मनं, टीम इंडियाच्या जर्सीवर घेतला कोहलीचा ऑटोग्राफ, पाहा VIDEO
‘‘भारतातील क्रिकेटवेडय़ा चाहत्यांचा उत्साह पाहून आम्ही भारावून गेलो. आम्ही याबाबत ऐकले होते. आता याचि देही याचि डोळा हा अनुभव घेतला. भारतातील लोकांनी आमचे आदरातिथ्यही केले. ते पाहून आमचा प्रवासातील सर्व थकवा निघून गेला. त्यामुळे भारतात येण्याचा आम्हाला आनंद झाला. मी प्रथमच येथे आलो आहे आणि हा अनुभव नक्कीच स्मरणात राहील असा आहे. आणखी काही सामन्यांचे वृत्तांकन करण्याचा आम्ही प्रयत्न करू,’’ असेही या पत्रकारांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान सामने होत राहिले पाहिजेत. दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांसाठी होणारी गर्दी मी अनुभवली आहे. त्यामुळे खेळ आणि राजकारण हे बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतला पाहिजे. आगामी काळात आपल्याला भारत व पाकिस्तान हे संघ मालिका खेळताना दिसतील, अशी आशा करू या.