Team India Squad For Asia Cup 2025: आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. येत्या २०२६ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा पाहता आशिया चषक स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यूएईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करणं मुळीच सोपं नसेल. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी एकापेक्षा एक भक्कम खेळाडू आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांना सर्व बाबींचा विचार करून पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान अंतिम १५ खेळाडूंची निवड करताना ४ चॅम्पियन खेळाडू बाहेर होऊ शकतात.

रोहित शर्मानंतर भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. तर कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलकडे टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार हे जवळजवळ निश्चित आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तानुसार येत्या १९ किंवा २० ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

शुबमन गिल गेल्या काही महिन्यांपासून टी-२० क्रिकेट खेळताना दिसून आलेला नाही. मात्र, आशिया चषकात त्याला पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. तो अभिषेक शर्मासोबत मिळून डावाची सुरूवात करताना दिसून येऊ शकतो. यासह संजू सॅमसन आणि तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांना संधी दिली जाऊ शकते. रिंकू सिंग गेल्या काही मालिकांमध्ये हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही, पण तरीदेखील टीम मॅनेजमेंट त्याला या स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देऊ शकते.

अष्टपैलू खेळाडू म्हणून कोणाला संधी मिळणार?

आगामी आशिया चषक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल या तिघांना संघात संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल आणि हार्दिकने टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे हे दोघे संघाचा भाग असतील, हे जवळजवळ निश्चित आहे.

तर फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांची आशिया चषकासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह भारतीय टी-२० संघात पुनरागमन करू शकतो. तर डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला या संघात स्थान दिले जाऊ शकते. तर राखीव यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्माला संघात स्थान दिले जाऊ शकते.

या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

आगामी आशिया चषकासाठी डावखुऱ्या हाताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला संधी मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच श्रेयस अय्यरला देखील आपल्या संधीची वाट पाहावी लागणार आहे. तसेच शिवम दुबे आणि रियान परागचा देखील पत्ता कट होऊ शकतो.