Ajinkya Rahane Prediction On Team India: आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ भिडणार आहेत. भारतीय संघ १० सप्टेंबरला पहिला सामना यूएईविरूद्ध होणार आहे. तर १४ सप्टेंबरला बहुप्रतिक्षित भारत- पाकिस्तान सामना रंगणार आहे. यावेळी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान कोणते ५ खेळाडू भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान देऊ शकतात? याबाबत अजिंक्य रहाणेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषकात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवली गेली आहे. यावेळी भारतीय संघ अनुभवी खेळाडूंशिवाय मैदानात उतरणार आहेत. दरम्यान अजिंक्य रहाणेने ५ खेळाडू निवडले आहेत, जे या स्पर्धेत दमदार कामगिरी करू शकतात.
अजिंक्य रहाणेने अक्षर पटेलचा मॅचविनर खेळाडू म्हणून उल्लेख केला आहे. गेल्या २-३ वर्षांत त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली असल्याचं रहाणेने सांगितलं. तो नवीन चेंडून देखील गोलंदाजी करू शकतो आणि गरज पडल्यास शेवटच्या षटकांमध्ये देखील गोलंदाजी करू शकतो.
तसेच हार्दिक पांड्यादेखील भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावू शकतो. रहाणे म्हणाला, “या स्पर्धेत हार्दिक पांड्याची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. त्याने अष्टपैलू खेळाडू म्हणून याआधीही चांगली कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की, तो आगामी स्पर्धेतही चांगली कामगिरी करेल.”
तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल बोलताना तो म्हणाला,” इंग्लंडविरूद्ध त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र, त्यानंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेत ५ अर्धशतकं झळकावून दमदार पुनरागमन केलं. या स्पर्धेत तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तो टी-२० क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज आहे. पण आता शस्त्रक्रियेनंतर तो कशी फलंदाजी करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तसेच बुमराहबाबत बोलताना तो म्हणाला, “मी आशिया चषकात बुमराहला खेळताना पाहण्यासाठी खूप उस्तुक आहे.त्याला यावर्षी एकही टी-२० सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. तो कुठल्याही क्षणी गोलंदाजीला येऊन आपली छाप सोडू शकतो. तो मॅचविनर गोलंदाज आहे. त्याने विकेट्स नाही काढल्या तरीदेखील तो जो दबाव बनवतो, याचा इतर गोलंदाजांना फायदा होतो.” रहाणेच्या मते, अर्शदीप सिंग देखील या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो. अर्शदीपला बुमराहसोबत गोलंदाजी करताना पाहण्यासाठी उत्तुक असल्याचं रहाणेने सांगितलं.