आशिया चषक स्पर्धेच्या फायलनमध्ये भारतीय संघाच्या विजयाचा नायक तिलक वर्माने पहिल्यावहिल्या आयपीएल हंगामानंतर एका गंभीर आजाराचा सामना केल्याचं सांगितलं आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या युट्यूब कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना तिलकने या गंभीर स्वरुपाच्या आजारपणाबद्दल सविस्तर माहिती दिली.

‘पहिल्या आयपीएलनंतर मला तब्येत नीट नसल्याचं जाणवलं. मी हे कुणालाच आधी बोललो नाहीये. मला .. नावाचा आजार झाला होता. ही एक स्थिती असते ज्यामध्ये स्नायू पूर्णपणे झिजतात. त्यावेळी भारतीय कसोटी संघात स्थान पटकावणं हे माझं उद्दिष्ट होतं. मी डोमेस्टिक क्रिकेट खेळत होतो. इंडिया ए संघाचाही भाग होतो. त्यासाठी काही शिबिरंही आयोजित करण्यात आली होती. विश्रांतीच्या दिवशी मी जिममध्ये जाऊन व्यायाम करायचो. मला वर्ल्डकपमध्ये सगळ्यात फिट खेळाडू व्हायचं होतं. सगळ्यात चपळ आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक व्हायचं होतं. या सगळ्या गोष्टी मनात सुरू होत्या. मी सगळं काही एकाचवेळी करत होतो पण शरीराला रिकव्हर होण्यासाठी वेळच दिला नाही. मी आईसबाथ घ्यायचो आणि झोपायचोही पण शरीराला विश्रांतीच मिळाली नाही. शरीराला विश्रांतीची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे मी रेस्ट डे च्या दिवशीही शरीराला त्रास द्यायचो. माझ्या स्नायूंवर ताण पडला आणि ते पूर्णत: झिजले’, असं तिलकने सांगितलं.

तो पुढे म्हणाला, ‘माझ्या सगळ्या नसा आखडल्या आणि शरीर एकदम जखडल्यासारखं झालं. मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने मला साथ दिली. मी इंडिया ए साठी बांगलादेशविरुद्ध खेळत होतो. मी १०० चेंडू खेळून काढले, माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मी बॅटही उचलू शकत नव्हतो. माझी बोटं दुमडेना. नसा आखडल्या. माझं शरीर दगडासारखं झालं. मी रिटायर्ट हर्ड होऊन ड्रेसिंगरुममध्ये परतलो. माझ्या बोटांची हालचान होईना त्यामुळे माझे ग्लोव्ह्ज कापावे लागले. मला आकाश अंबानींचा कॉल आला. त्यांनी बीसीसीआयशी संपर्क केला. बीसीसीआयनेही तत्परता दाखवत मला मदत केली. मला हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की मला दाखल करायला थोडा जरी उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. धोका वाढला असता. शरीरातलं रक्त घेण्यासाठी सुया, सीरिंजही आत जाईना. त्या तुटायच्या. माझी आई हॉस्पिटलमध्ये माझ्याबरोबर होती. ती मला खाऊपिऊ घालत असे. मी त्या अवस्थेतून बाहेर पडलो यासाठी देवाचा आभारी आहे’.

रबडुमहऑलसुश हा काय आजार आहे?

या स्थितीत स्नायू मोडून पडतात. असं होताना रक्तवाहिन्यांमध्ये विषारी घटक सोडतात. यामुळे किडन्यांवर परिणाम होऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर वर्कआऊट, डीहायड्रेशन किंवा प्रचंड उष्णतेत काम करणं यांचा परिणाम म्हणून ही स्थिती ओढवू शकते. याची लक्षणं म्हणजे प्रचंड स्नायू दुखतात. अशक्तपणा जाणवतो. लघवीचा रंग गडद होतो. काहींना श्वास घ्यायलाही त्रास जाणवतो.

आशिया चषकाचा नायक

२८ सप्टेंबर रोजी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम लढतीत तिलक वर्माच्या दिमाखदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावांची मजल मारली. साहिबझादा फरहानने ५७ तर फखर झमानने ४६ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून कुलदीप यादवने ४ विकेट्स पटकावल्या. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना, भारताची अवस्था २०/३ अशी झाली होती. या परिस्थितीतून तिलक वर्माने संघाला संकटातून बाहेर पडलं. तिलकने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली. तिलकने विकेट्सची पडझड रोखतानाच धावगती मंदावणार नाही याची काळजी घेतली. त्याने सुरुवातीला संजू सॅमसनबरोबर आणि नंतर शिवम दुबेबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तिलकलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

२२वर्षीय तिलकने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० पदार्पण केलं. त्याचवर्षी त्याने बांगलादेशविरुद्ध वनडे पदार्पण केलं. ३२ टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना तिलकने ९६२ धावा केल्या असून यामध्ये २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

मुंबई इंडियन्सचा तारा

२०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने तिलकमधली गुणवत्ता हेरत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. तिलकसाठी मुंबई इंडियन्सने १.७ कोटी एवढी रक्कम खर्च केली. दुसऱ्या लढतीत त्याने राजस्थानविरुद्ध ३३ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सनने तिलकला रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तिलकला रिटेन करण्यासाठी मुंबईने ८ कोटी रुपये मोजले.