केंद्रीय क्रीडामंत्री गोयल यांच्याकडून प्रशंसा
भारतात होणाऱ्या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या सहा शहरांतील स्टेडियमच्या कामकाजाचा आढावा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोएल यांच्याकडून घेतला जात आहे. गोयल बुधवारी नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमची पाहणी करण्यासाठी आले होते. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या कामकाजावर समाधान व्यक्त करताना हे स्टेडियम कोची येथील स्टेडियमपेक्षा सरस असल्याची पोचपावती गोयल यांनी दिली.
ते म्हणाले, ‘ कोची, कोलकाता आणि दिल्ली येथील स्टेडियमची मी पाहणी केली. कोचीच्या कामावर समाधानी नाही, परंतु त्यांना काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. कोचीच्या तुलनेत नवी मुंबईतील स्टेडियमच्या कामावर खूश आहे. येथील तयारीवर संतुष्ट आहे. आसनांचे काम सुरू आहे. परंतु ते वेळेत पूर्ण होईल याची खात्री आहे. खाजगी संस्था असूनही त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तितके कमी आहे. अनेकदा सरकारही अशा वास्तूची उभारणी करू शकत नाही.
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी नवी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, गोवा, कोची या शहरांची निवड करण्यात आली आहे. क्रीडामंत्री मुंबईनंतर गुवाहाटी येथील स्टेडियमच्या पाहणीसाठी रवाना झाले. या स्पर्धेचे आयोजन ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सुवर्णसंधीच्या माध्यमातून देशभर फुटबॉलचा प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात हा खेळ पोहचवण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे गोयल यांनी सांगितले.
यशस्वी आयोजन करू – विजय पाटील
विश्वचषक स्पर्धेतील भारताचे सामने नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीवरून हे सामने दिल्लीत खेळवण्याचा प्रयत्न आहे. याबाबत डी. वाय. पाटील स्टेडियमचे प्रमुख विजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘ कोणते सामने कुठे होणार याबाबतचा निर्णय ७ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे येथे कोणतेही सामने खेळवले गेले तरी आयोजन यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्यातील दिग्गज खेळाडू येथे खेळतील ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.