Virat Kohli-Anushka Sharma Instagram Post For Indian Soldiers: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तवाणाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला करून निष्पाप भारतीयांचा जीव घेतला होता. त्यामुळे आता भारताने देखील ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चांगलच प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्य युद्धभूमीवर पाकिस्तानचे डाव हाणून पाडत आहे. दरम्यान भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने भारतीय सैन्याचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
गुरूवारी पाकिस्तानी सैन्याने भारतातील काही राज्यांवर ड्रोन हल्ले केले. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व ड्रोन खाली पाडले. आता विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ” या कठीण काळात जे जिद्दीने देशाचे संरक्षण करत आहेत, अशा सशस्त्र दलांना आम्ही सलाम करतो आणि त्यांच्याबरोबर आम्ही एकजूटीने उभे आहोत. त्यांच्या अटल शौर्यासाठी आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी राहू. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या महान देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.” या पोस्टवर त्याने जय हिंद असं लिहिलं आहे.
यासह विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने देखील पोस्ट शेअर करून भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत. अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिले, “आम्ही भारतीय सशस्त्र दलाचे आभारी आहोत. या कठीण काळात त्यांनी आमचं नायकासारखं संरक्षण केलं आहे. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.”
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आयपीएल २०२५ स्पर्धेवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे.गुरूवारी या स्पर्धेतील सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये होणार होता. या सामन्याला सुरूवात झाली. पहिल्या डावातील १० षटकं झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमचे फ्लड लाईट्स बंद करण्यात आले.
त्यानंतर प्रेक्षकांना मैदानाबाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं. त्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही स्पर्धा एका आठवड्यानंतर पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेला आठवड्याभरानंतर पुन्हा एकदा सुरूवात होणार आहे.
विराट कोहलीची या हंगामातील कामगिरी
या हंगामात विराट कोहलीची बॅट आग ओकतेय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघही सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. विराटच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यांमध्ये ६३.१२ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या आहेत. यासह तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील आहे. विराटने ऑरेंज कॅप पटकावली देखील होती. मात्र, आता सध्या तो चौथ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या शुबमन गिलने विराट कोहलीपेक्षा ५ धावा जास्त केल्या आहेत. तो सध्या तिसऱ्या स्थानी आहे.