श्रीराम वीरा
काही महिन्यांपूर्वी रेडीट इंडिया या इंटरनेटवरच्या लोकप्रिय वेबसाईटवर एक पोस्ट झळकली. राजधानी दिल्ली इतकी विस्कळीत आणि अस्ताव्यस्त का आहे? सगळंच असं बेंगरुळ का आहे, विशेषत: वेस्ट दिल्ली. पश्चिम दिल्लीकरांना ही पोस्ट आक्षेपार्ह वाटण्यापेक्षा आपलीशीच वाटली. भयंकर वाहतूककोंडी, धूळ, खुली गटारं, गच्चगोळ रस्ते, बेकायदेशीर बांधकामं, भ्रष्ट व्यवस्था, फाळणीनंतर पाकिस्तानहून इथे दाखल झालेल्या मंडळींचा इतिहास, अनेक दशकं कुणी कोणाला उलथावून टाकणं- सगळे याबद्दल बोलू लागले.
या भागाची डेमोग्राफी कोणा विचारली का? नियोजनाचा फज्जा उडालेल्या शहरावर चर्चा होत आहे ना? यावरुन चर्चेला तोंड फुटलं. कीबोर्डवर शाब्दिक आदळआपट करत नेटिझन्सनी वर्गवाद, रंग, जात, स्थानिक भूमीपुत्र, बाहेरचे, इतिहास-भूगोल सगळंच बाहेर काढलं. अनेक तास लोक कीबोर्ड बडवत वेगवेगळे मुद्दे मांडत राहिले. चर्चेचं सार हेच निघालं की पश्चिम दिल्लीचा गोंधळ हा महानगरपालिकेचा आजचा विषय नाही. पश्चिम दिल्ली माणसांनी भरगच्च कशी होत गेली हे इतिहासाच्या चौकटीतून पाहिलं तरच लक्षात येऊ शकतं. हा जनांचा प्रवाह असाच आलेला नाही. फाळणीनंतर पाकिस्तानातून असंख्य माणसं दिल्लीत आले. त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. खायलाप्यायला काही नाही. कपडालत्ता नाही. सर्वस्व गमावलेल्या आणि भीतीच्या छायेत ते इथवर आले होते. काहींनी वाटेतच जीव सोडला होता. या मंडळींना घर देणं आवश्यक होतं. राजधानी दिल्लीच्या परिघावरच्या गावांमध्ये जमीन मोकळी होती. शेतीसाठी वापरली जायची पण तिथे घरं नव्हतं. आखणीबद्ध नियोजन करुन रचलेला हा परिसर नाही तर अतीव गरजेतून वसवलेली नगरं आहेत. आप्तस्वकीय, घरदार नाहीसं झालेल्या स्थितीतून जत्थेच्या जत्थे आले होते. त्यांना आसरा देणं हे प्रथम कर्तव्य होतं. त्या कर्तव्य भावनेतून कॉलनीज निर्माण झाल्या. स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान देणाऱ्या लढवय्यांच्या नावाने या कॉलनी उभारण्यात आल्या.
इतिहासकार रवींदर कौर यांनी ‘सिन्स १९४७-पार्टिशन नरेटिव्हज अमंग पंजाबी मायग्रंट्स ऑफ दिल्ली’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या पश्चिम दिल्लीला ‘वाईल्ड वेस्ट’ म्हणतात. त्या हे विचारपूर्वक बोलतात कारण त्यांचं बालपण इथेच गेलं आहे. फाळणीनंतर आलेली माणसं पश्चिम दिल्लीच्या विविध भागात स्थिरावली. विकासपुरी हा त्यापैकीच एक भाग. विराट कोहलीचे आईवडील काही दशकांपूर्वी तिथे आले. विराट मोठा होत गेला तसं त्यांनी विकासपुरी सोडलं. या भागातल्या माणसांचं बोलणं, राहणं या सगळ्याला इतिहासाचा-भूगोलाचा-सांस्कृतिक धागा आहे. रवींदर यांच्या मते वेस्ट दिल्ली बाकी दिल्लीच्या तुलनेत वेगळं आहे. मोठी झाल्यावर मी दिल्लीच्या अन्य भागात फिरू लागल्यावर मला वेगळंच वाटायचं. वेस्ट दिल्ली ही वेगळीच दुनियादारी आहे.
वेस्ट दिल्लीकर वेगळे का याबद्दल त्या सांगतात, जनरलाईज्ड न करता. ‘वेस्ट दिल्लीच्या लोकांमध्ये एक रांगडेपण आहे. नवीन पिढ्या येत गेल्या पण ते रांगडेपण जराही कमी झालेलं नाही. वेस्ट दिल्लीकर फटकळ असतात. गोडमधाळ बोलत बसत नाहीत, जे आहे ते थेट सांगतात. आमची वाणी आणि जीभ यावर काही बाबतीत कोणाचंच नियंत्रण नाही असं राजिंदर गंमतीत सांगतात. काही महिन्यांपूर्वी इंडिया हॅबिटेट सेंटरला मोठ्याने बोलत असल्याबद्दल काहींना समज देण्यात आली होती. मला प्रचंड हसायला आलं. वेस्ट दिल्लीत हे खपवून घेतलं जाणार नाही. लोकांना स्वत:बद्दल विचार करायला आवडतं. आम्ही सळसळत्या ऊर्जेचे असतो. कशात काही नसतानाही आम्ही गोष्टी मजेशीर करु शकतो. विराट कोहली हा खऱ्या अर्थाने वेस्ट दिल्लीचाच आहे. या भागात जे लोक आले ते बेघर झालेले. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. पण अनेकांनी संघर्ष करत वाटचाल केली. इथल्या लोकांमध्ये कधीही हार न मानण्याचं बाळकडू आहे’.
विराटच्या बाबांनी अनेक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्टॉक मार्केटमध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना आर्थिक फटकाही बसला पण ते हरले नाहीत. त्यांच्यातलं विजीगिषु वृत्ती विराटमध्ये ठसठशीतपणे दिसते. विराटने स्वत:ही हे सांगितलं आहे.
अत्यंत व्यावसायिक पद्धतीने जिंकण्यासाठी खेळणारा लढवय्या ही विराटची ओळख आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विराटमध्ये त्यांचं प्रतिबिंब दिसतं. पाकिस्तानच्या खेळाडूंनाही तो आपल्यासारखा वाटतो. पाकिस्तानचे माजी खेळाडू विराटचं कौतुक करताना थकत नाहीत. ते त्यांच्या खेळाडूंना विराटला खेळताना पाहा असा सल्ला देतात. विराट कोहली अरे ला का रे करतो. ऑस्ट्रेलियात प्रेक्षकांनी उन्मतपणा केल्यावर त्यांना तो मधलं बोट दाखवू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना चार गोष्टी सुनावू शकतो. जेम्स अँडरनसारख्या वयस्कर खेळाडूला डिवचू शकतो. पाकिस्तानच्या काही खेळाडूंना उद्देशून शेरेबाजी करू शकतो. तरीही त्याची विकेट पटकावणं हे प्रतिस्पर्धी संघासाठी सगळ्यात मूल्यवान असतं. कारण त्याची बॅट बोलते.
‘अनियंत्रित रांगडेपण विराटच्या व्यक्तिमत्वात वारंवार झळकतं. अतिशय महत्त्वाकांक्षी असा तरुण तडफदार कार्यकर्ता त्यात दिसतो. त्याला हरायला आवडत नाही. वेस्ट दिल्लीकर हा भाग सोडून अन्यत्र स्थायिक होतात तरी या भागाचा वाण त्यांच्या व्यक्तिमत्वातून जात नाही. आमच्यातले काही दोन्ही जगात सहजपणे वावरतात’, असं रवींदर कौर सांगतात. त्या सध्या कोपनहेगन इथे राहतात. मॉडर्न साऊथ एशियन स्टडीजच्या त्या प्राध्यापिका आहेत.
विराटचा जुना दोस्त आणि प्रदीर्घकाळचा रुममेट प्रदीप संगवान विराटची ही बाजू उलगडून सांगतो. ‘मी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्याला भेटलो. मला वाटलं आता तो मोठा सेलिब्रेटी झाला आहे, तो बदलला असेल. अनुष्का शर्मा जसं दुसरीकडे जाते तसं विराटमधला वेस्ट दिल्लीकर जागा होतो. अनुष्का परतली की तो चांगला मुलगा होऊन जातो. दिल्लीचा विराट कोहली तुम्ही अनुभवला पाहिजे’.
क्रिकेट अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ रामचंद्र गुहा सांगतात की ते अनेक खेळाडूंशी बोलले आहेत. विराट अतिशय तोलूनमापून आणि मुद्देसूद बोलतो असा गुहा यांचा अनुभव आहे. त्याच्याभोवती एक प्रभावळ आहे. अनिल कुंबळे यांना भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून बाजूला करण्यात आलं. त्यावेळी विराट किती ताकदवान आहे यासंदर्भात गुहा यांनी भाष्य केलं होतं.
सुरेंदर खन्ना भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत. दिल्ली क्रिकेटमध्ये ते सल्लागार आहेत. कोहलीचं रांगडेपण ते उलगडून सांगतात. ज्येष्ठांनी सांगितलेलं एक वचन ते उद्धृत करतात. ‘जब चल रही हो, चलना चाहिए. और ना चलाया वो मूर्ख. जब ना चल रही हो, तब चलने की कोशिश करता है, वो महामूर्ख है’. विराट अतिशय हुशार आणि स्मार्ट आहे. कधी रागवायचं, कधी हसून प्रतिसाद द्यायचा, कधी दुर्लक्ष करायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. वारे वेगळ्या दिशेने वाहत आहेत हे समजल्यावर त्याने भारतीय संघाचं नेतृत्व सोडलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी बघा. क्रिकेटबाहेरच्या जगात त्याची ताकद पाहा. तो एक ब्रँड आहे. तो आयकॉन आहे. लाखो कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. तरीही विराट आपलं मूळ विसरलेला नाही. माजी क्रिकेटपटूंसाठी, बालपणीच्या प्रशिक्षकासाठी तो वेळ काढतो. प्रशिक्षकांचं योगदान तो कधीही विसरलेला नाही.
कोहलीला आपल्या पार्श्वभूमीची कल्पना आहे. त्याची त्याला खंत नाही. वेस्ट दिल्लीतला प्रत्येकजण विराटसारखा नाही असं रवींदर कौर सांगतात. वेस्ट दिल्ली सोडून अन्यत्र स्थायिक झालेल्या मंडळींमध्ये एकप्रकारचा न्यूनगंड आहे. आपण आधी वेस्ट दिल्लीत राहत होतो हेही हे लोक सांगत नाहीत. त्यांना तो इतिहास पुसून टाकला आहे. वर्गवादाचे दुष्परिणाम. बाकी काही नाही.
ज्यांना हा न्यूनगंड नाही त्यांना या भागातून प्रसिद्धी पावलेली एक डिश खूप आवडते. सोया चाप- शाकाहारी मंडळींना मांसाहारासदृश अनुभव देणारा सोयीबीनपासून तयार केलेला पदार्थ. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट राहण्याकरता विराटने आता मांसाहार सोडला आहे. पण सोया चाप त्याला नक्की आवडत असणार. अलीकडे वेस्ट दिल्लीमधल्या बाजारांमध्ये अफलातून असे अफगाणी मोमो मिळतात. इथल्या भागात नांदणाऱ्या बहुविध संस्कृतीचं ते द्योतक आहे.
काहीच हाताशी नसतानाही वेस्ट दिल्लीकर तग धरून राहतात. त्यांच्यात एक अजब अशी लढाऊ वृत्ती आहे. बाकी सहकारी साथ सोडत असतानाही विराट एकटाकी संघर्ष करत राहतो. जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करतो. गेल्या ट्वेन्टी२० विश्वचषकात हारिस रौफसारख्या वेगवान गोलंदाजाला साईटस्क्रीनवर षटकार तोच मारु शकतो. ते षटकार बसले नसते तर लक्ष्य आवाक्याबाहेर गेलं असतं आणि भारताला पराभावाला सामोरं जावं लागलं असतं. धावांचा पाठलाग करताना विराटने एक प्रारुपच तयार केलं आहे. त्याचं शतक आणि भारत जिंकणं हे समानार्थी शब्द झाले आहेत. तो नाबाद राहून जिंकूनच देतो.
रवींदर कौर कोहलीच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक गोष्ट सांगतात. वेस्ट दिल्लीतल्या सध्याच्या युवा मंडळींना काय हवंय? त्यांना मोठं घर, दोन गाड्या, नोकरचाकर, ड्रायव्हर. विराट कोहलीने हे सगळं तर मिळवलंच पण एका चित्रपट अभिनेत्रीशी लग्न केलं. विराटची ही वाटचाल वेस्ट दिल्लीतल्या अनेकांसाठी स्वप्नवतच आहे. वेस्ट दिल्लीतल्या पोरगेल्या विराटने ही मोठी स्वप्नं पाहिली. ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. स्वप्नं साकार झाली आहेत. इथल्या युवा मंडळींना विराटने स्वप्न पाहण्याची ताकद दिली आहे.