संदीप द्विवेदी

काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला होता. लंडनमध्ये राहणारा विराट तिथल्या रूटीनविषयी फार काही सांगत नाही किंवा शेअरही करत नाही पण त्या पोस्टची गोष्ट वेगळी होती. प्रायव्हसी आणि स्पेस या दोन कारणांसाठी विराटने लंडनला स्थायिक झाला आहे. त्यादिवशी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. नईम अमिन हे प्रशिक्षक कोहलीबरोबर फोटोत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इन्डोअर सराव केल्यानंतरचा फोटो होता. अमीन आयपीएलमधल्या गुजरात टायटन्स संघाचे असिस्टंट कोच आहेत. सरावादरम्यान मार्गदर्शन केल्याबद्दल कोहलीने अमिन यांच्याप्रति कृतज्ञताही व्यक्त केली होती.

ऑगस्टच्या मध्यात ही पोस्ट कोहलीने शेअरने केली होती. त्यावेळी विराट आणि रोहित शर्माच्या वनडे भवितव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या दोघांनी टेस्ट आणि टी२० मधून निवृत्ती स्वीकारली आहे. आधुनिक क्रिकेटमधले हे दोन दिग्गज आता फक्त वनडे प्रकारात खेळत आहेत. दोन वर्षात वनडे वर्ल्डकप होणार आहे. दोघेही चाळिशीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे हे दोघं किती वर्ष भारतासाठी खेळणार याविषयी साशंकता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर भारतीय संघाने वनडे खेळलेल्या नाहीत त्यामुळे या दोघांना मॅच प्रॅक्टीस मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या दौऱ्याआधी दोघांचा इंडिया ए संघात समावेश होणं अपेक्षित नाही का? जेणेकरून त्यांना सराव मिळेल. वर्ल्डकपमध्ये खेळायचं असेल तर या दोघांना सातत्याने खेळावं लागेल. वनडेंची संख्या तशीही कमी झाली आहे. अशा परिस्थितीत या दोघांना मॅच प्रॅक्टीस म्हणता येईल अशी मिळण्याच्या संधी कमी आहेत. निवडसमितीचे चेअरमन अजित आगरकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता.

पण खरंच विराट आणि रोहितला मॅच प्रॅक्टीसची आवश्यकता आहे? गेले दीड दशक या दोघांनी वनडेत धावांच्या राशी ओतल्या आहेत. त्यांना सूर गवसण्यासाठी अ संघ किंवा डोमेस्टिक स्पर्धेतला सामना खेळणं आवश्यक आहे का? मॅच प्रॅक्टीस हा मुद्दा प्रमाणापेक्षा जास्त उचलला जातोय का? पण या मुद्याची दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. इन्डोअर फॅसिलिटीमधला सराव एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्धच्या सामन्यासाठी पुरेसा ठरू शकेल का? १०० षटकं मैदानावर खेळण्यासाठी इन्डोअर सराव आवश्यक सराव देऊ शकतो का? या दोघांच्या नावाला वलय आहे. दोघांची प्रत्येक धाव रेकॉर्डबुकात नोंदली जाते. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे चाहत्यांचं, ट्रोलर्सचं लक्ष आहे. लाखभर क्षमतेचं स्टेडियम तुमच्या नावाचा जयघोष करत असताना इन्डोअर सराव मसल मेमरींना प्रोत्साहित करू शकतो का? हा खरा प्रश्न आहे.

निवृत्ती फार दूर नाही

या दोघांवरही वेगळ्या प्रकारचं दडपण आहे. दोन आयसीसी जेतेपदं पटकावून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी निवडसमितीने शुबमन गिलकडे वनडेची धुरा सोपवली आहे. निवडसमितीने भविष्याच्या दृष्टीने आखणी करायला घेतली आहे हे उघडच आहे. एखाद्या मालिकेतलं अपयश आणि भारतीय क्रिकेटसाठी हे संदर्भहीन ठरू शकतात. व्यवहारी जग क्रूर आहे.नावावर जबरदस्त अशी कामगिरी असली तरी एखादं अपयश गाशा गुंडाळायला लावू शकतं हे दोघांनाही माहिती आहे. विराट-रोहितसाठी नव्हे तर वर्षानुवर्ष भारतीय क्रिकेट फॉलो करणाऱ्या चाहत्यांसाठी ही परिस्थिती वेगळी आहे. हे दोघेही भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ होते. आहेत पण आता ते एकच प्रकारात खेळत आहेत. संघाची धुरा युवा शिलेदाराकडे सोपवण्यात आली आहे. या दोघांची जागा पटकावण्यासाठी मोठी रांग आहे. पण या दोघांना स्वत:ला नव्याने सिद्ध करायचं आहे. विराटने ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या झाल्या सोशल मीडियावर एक वाक्य शेअर केलं. विराट लिहितो- जेव्हा तुम्ही संघर्ष न करता गोष्टी सोडून देता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने हरता. विराटला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. त्याची अरे का रे करण्याची वृत्ती ऑस्ट्रेलियन्सना भावते. त्याला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियम पूर्ण भरतं. ऑस्ट्रेलियात त्याचा रेकॉर्डही उत्तम आहे. पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने विराट ऑस्ट्रेलियात होता. टेस्ट प्रकारातून निवृत्त झाल्याने विराटसाठी ती ऑस्ट्रेलियातली शेवटची टेस्ट सीरिज होती. विराटसाठी त्या दौऱ्याची सुरुवात पर्थमधल्या शतकाने झाली. मात्र सिडनीतल्या पाचव्या टेस्टपर्यंत विराटच्या फॉर्म, टेंपरामेंट आणि कव्हर ड्राईव्ह याविषयी चर्चा होऊ लागल्या. चुकातून तो शिकत नाहीये यावरही टिप्पणी होऊ लागल्या. त्या सीरिजमध्ये तो शेवटचा ज्या पद्धतीने आऊट झाला त्यावेळी जु्न्या दुखण्याची आठवण निघाली. ऑफस्टंपबाहेरचा चेंडू खेळताना फटका खेळण्याचा मोह त्याला आवरला नाही. एकाग्रचित्ताने मॅरेथॉन खेळी साकारणाऱ्या विराटला ऑफस्टंपबाहेरचा चेंडू सतावतो. पूर्वी त्याला चुकातून शिकायला वेळ होता मात्र आता फार वेळ हाताशी नाही. कारण तो एकाच प्रकारात खेळतो. वनडे सामन्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.

शेवटच्या टेस्टमध्ये स्कॉट बोलँडने चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. चेंडू ड्राईव्ह करण्याच्या टप्प्यात राहील असा होता. विराट क्रीझमध्ये होता. शरीरापासून दूर फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न स्लिपमधल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. विराटने स्लिपमध्ये कॅच टिपला गेल्यावर निराशा व्यक्त केली. त्याचे प्रतिध्वनी ऑस्ट्रेलियाच्या त्या भव्य मैदानात ऐकायला मिळाले. याखेपेस विराट ऑस्ट्रेलियात आहे आणि वनडे खेळण्यासाठी आहे. मात्र या प्रकारातही ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूंनी त्याला सतवलं आहे. आयपीएल स्पर्धेतही टेस्ट मॅचला साजेशा टप्प्यावरील चेंडूंनी त्याची खेळी संपुष्टात आणली आहे. वनडेतही हे होऊ शकतं. बॉलर्स त्याच्यासारख्या मोठ्या खेळाडूला बाद करायचा मूलमंत्र विसरत नाहीत.

विराटने या प्रश्नापासून पळ काढलेला नाही किंवा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं नाही. प्रश्न नाहीच असंही त्याने मानलेलं नाही. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान तो क्रीझच्या बाहेर उभं राहून खेळत होता. इंग्लंडमध्ये स्विंग होणाऱ्या चेंडूवर फसू नये यासाठी बॅट्समन अशा पद्धतीने क्रीझच्या बाहेर उभं राहून खेळतात. ऑस्ट्रेलियात बॉलर्सना चांगली उसळी मिळते, त्या उसळीवर बाद न होण्यासाठी कोहलीने ही क्लृप्ती अवलंबली होती. उसळत्या चेंडूवर स्वार होण्याचा त्याचा प्रयत्न फसायचा. सॉफ्ट हँड्सने खेळणं हा त्याच्या खेळाचा भाग नाही. त्यामुळे जोरकस फटका बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये कॅच जात असे. सुरुवातीच्या अपयशानंतर त्याने पुन्हा क्रीझच्या आतून खेळायला सुरुवात केली. पण बॅकफूटवर आधारित तंत्र नसल्याने त्याची विकेट जात असे. आता तो धड पूर्णपणे फ्रंटफूट प्लेयर नाही, ना बॅकफूट प्लेयर. त्यामुळे तो द्विधा मनस्थितीत अडकतो आणि अपयशाची मालिका सुरुच राहते.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने विराटला पदलालित्यासंदर्भात मदत केली होती. २०१४ इंग्लंड दौऱ्यात विराटला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावेळी मायदेशी परतल्यानंतर सचिनच्या मार्गदर्शनात विराटने या कच्च्या दुव्यावर काम केलं. ऑस्ट्रेलियात जाऊन त्याने धावांची टांकसाळ उघडली. तेंडुलकरने कोहलीला चेंडूचा सामना करताना उभं राहताना काही सूचना केल्या. मात्र आता पुन्हा त्याच चुका जाणवू लागल्या आहेत.

२०२१ मध्ये त्याने स्टान्समध्ये बदल केला. तो ऑफ मिडल गार्ड घेऊ लागला. ऑफस्टंपच्या ठिकाणी त्याचं डोकं असतं. असं केल्यामुळे ऑफस्टंपबाहेरचे चेंडू त्याला त्रास देणार नाहीत. ऑफस्टंपबाहेरचे चेंडू तो सोडू लागला. पण त्याचवेळी तिन्ही स्टंप्स कव्हर केल्यामुळे तो एलबीडब्ल्यू होऊ लागला. टप्पा पडून आत येणाऱ्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू होऊ लागला.

बॅटिंग ही एक देखणी कला आहे पण ती नाजूकही आहे. यासाठी अतिशय सूक्ष्म सखोल अभ्यास लागतो. वातावरणाचा, भवतालाचा अभ्यास लागतो. प्रतिस्पर्धी बॉलर नक्की काय बॉलिंग करणार याविषयी आडाखे असावे लागतात. टप्पा कुठे पडेल, फिल्डिंग कशी असेल, आपलं पदलालित्य कसं असेल याबद्दल अभ्यास लागतो. विराट जवळपास दीड दशक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे. त्याच्या नावावर खंडीभर धावा आहेत. उमेदीच्या काळात विराटसाठी धावा करणं हे दुय्यम होतं. ग्रॅहम बेनसिंगरबरोबरच्या पॉडकास्टमध्ये त्याने आपले विचार मांडले होते.

बॅटिंग म्हणजे काही सेकंदात तुम्ही घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. तुम्हाला कोणता फटका खेळायचा यासाठी अवघी काही सेकंद मिळतात. चूक झाली की पुढच्या सेकंदाला विकेट पडते. व्हिज्युलायझेशनद्वारे तुम्ही मानसिक आणि तांत्रिक पद्धतीने याची तयारी करू शकता.

मित्रासारख्या प्रशिक्षकाबरोबर इन्डोअर फॅसिलिटीमध्ये सराव आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रचंड चाहत्यांसमोर दर्जेदार प्रतिस्पर्धी बॉलरचा सामना करणं वेगळी गोष्ट. हे बॉलर चौथ्या-पाचव्या स्टंपवर जाणीवपूर्वक बॉलिंग करणार जेणेकरून विराट खेळण्याच्या मोहात अडकावा. निवृत्तीच्या उंबरठयावर असताना अशा परिस्थितीचा सामना करणं सोपं नाही. वय वाढत जाणार, हालचाली मंदावणार याची विराटला कल्पना आहे. कारकिर्दीची अखेर फार दूर नाही. जुलै ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना युवराज सिंगने आयोजित केलेल्या चॅरिटी कार्यक्रमात विराट सहभागी झाला होता. भारतीय संघात तुझी अनुपस्थिती जाणवते यावर विराट म्हणाला- दोन दिवसांपूर्वी मी माझी दाढी रंगवली. दर चार दिवसांनी तुम्हाला दाढीचे डोक्याचे केस काळे करण्याची वेळ येते त्यावेळी तुमचा काळ सरला हे लक्षात घ्यावं.

त्यानंतर ते संभाषण युवराज-विराट यांनी पाहिलेल्या भागीदाऱ्यांकडे गेलं. कटक इथे झालेल्या सामन्यादरम्यान युवराजने दीडशे धावांची खेळी साकारली होती. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या साथीने अडीचशे धावांची भागीदारी रचली होती. त्यावेळी मी राहुलच्या साथीने ड्रेसिंगरुममध्ये होतो. ती भागीदारी पाहणं हा अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता.

वेळ कशी भर्रकन निघून जातात. आताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि टी२० मधली स्टार मंडळी आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळत असताना, भागीदारी रचत असताना त्यांना पाहण्याचा आनंद शुबमन-यशस्वीला घेता येणार का?