India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो नाटू-नाटू गाण्यावर डान्स करत आहे.
भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली होती. तेव्हा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराट कोहली स्लिपमध्ये उभा असताना नाटू-नाटू गाण्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे.
‘RRR’ या प्रसिद्ध चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली हे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. बरं, विराट कोहली मॅचच्या मध्यावर डान्स करणं ही काही नवीन गोष्ट नाही, अशा प्रकारे विराट मजा-मस्ती करताना बऱ्याचदा दिसला आहे.
जडेजा आणि राहुलमध्ये नाबाद १०८ धावांची भागीदारी –
१८९ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताने ३९.५ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात केएल राहुलला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्याने या सामन्यात शानदार खेळी केली. त्याने ९१ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान राहुलनने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचबरोबर रवींद्र जडेजाही ४५ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची नाबाद भागीदारी झाली.
हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मिचेल स्टार्कचा धोकादायक चेंडू लागल्याने केएल राहुलला झाल्या वेदना, पाहा VIDEO
तत्पुर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकात १८८ धावांवर सर्वबाद झाला. सलामीला आलेल्या मिचेल मार्चने ६५ चेंडूत ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी ३-३ विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.