पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तसेच अखेरच्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबतही साशंकता आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्रांकडून बुधवारी सांगण्यात आले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेचा तिसरा सामना राजकोट येथे १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत, तर चौथा सामना रांची येथे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत खेळवला जाणार आहे. वैयक्तिक कारणास्तव कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांनाही मुकला होता. कोहलीचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नुकतेच आपल्या यूट्युब चॅनलवर कोहली आपल्या दुसऱ्या पाल्याच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले होते.

‘‘क्रिकेटपटूंच्या कुटुंबाचा प्रश्न असतो, तेव्हा ‘बीसीसीआय’ ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे असते. आता भारतीय संघात पुनरागमन कधी करायचे याबाबतचा निर्णय कोहलीच घेईल. सध्या तरी, तो या मालिकेत खेळेल असे वाटत नाही,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केएल राहुलही दुसऱ्या कसोटीला मुकला होता. परंतु तिसऱ्या कसोटीत त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. राहुल संघात परतल्यास रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला वगळले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.