Virat Kohli Heart Warming Gesture For Shreyas Iyer And Shubman Gill: भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हा विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा झाल्यानंतर ही जोडी पहिल्यांदाच मैदानात उतरली होती. त्यामुळे या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण पहिल्याच सामन्यात ही जोडी फ्लॉप ठरली. विराट कोहली शून्यावर तर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतले. विराट फलंदाजीत फ्लॉप राहिला. पण सामना सुरू होण्याआधी त्याने कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यरसाठी जे केलं, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी -२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे हे दोघे केवळ वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. न्यूझीलंडविरुद्ध झालेला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना हा दोघांचा शेवटचा सामना होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दोघांनी पुनरागमन केलं आहे. या दौऱ्यासाठी गिलची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात भारतीय खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात जाताना दिसून येत आहेत. त्यावेळी विराट कोहलीने कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यरला पुढे जाण्यास सांगितलं. विराट अनुभवी खेळाडू आहे. पण युवा खेळाडूसाठी त्याने जे केलंय, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. नेटकऱ्यांनी विराटच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.
पहिल्या वनडेत भारताचा पराभव
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २६ षटकात ९ गडी बाद १३६ धावा करता आल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने २२ व्या षटकात विजय मिळवला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वनडे सामना २३ ऑक्टोबरला अॅडलेडच्या मैदानावर रंगणार आहे.