Virat Kohli-Naveen Ul-Haq Video: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर वातावरण तापलं होतं…मैदानात कर्णधार रोहित शर्मासोबत आपल्या होम ग्राऊंडवर दिमाखात उतरलेला विराट कोहली खेळत होता! दोघं मिळून अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची पिसं काढत होते. पण त्याचवेळी समोरून नवीन उल-हक गोलंदाजी करण्यासाठी आला. आता विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातले ‘सौहार्दा’चे संबंध तोपर्यंत जवळपास आख्ख्या क्रिकेट विश्वाला माहिती होते. त्यामुळे नवीन उल-हक बॉलिंग करायला येताच घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विराटला त्याच्या दिल्लीकर प्रेक्षकांनी तुफान चीअर करायला सुरुवात केली. हे पाहून विराट कोहली प्रेक्षकांकडे वळला आणि त्यानं असं काही केलं की ज्याचं कौतुक आता सगळं क्रिकेट विश्व करत आहे!

नेमकं काय झालं होतं या दोघांमध्ये?

यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामन्यात विराट कोहली व नवीन उलहक यांच्यात वादावादी झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. बंगळुरूनं लखनऊचा १८ धावांनी पराभव केल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करत असताना विराट कोहली व नवीन उल-हक यांच्यात वाद झाला. इतर काही खेळाडूंनी या दोघांमध्ये मध्यस्थी करून त्यांना दूर केल्यानंतर विराटनं पुढे जाऊन प्रेक्षकांना चीअरअप करण्याचे हावभाव केले. मग यात गौतम गंभीर पडला आणि त्याच्यात व विराटमध्येही पुन्हा वाद झाला. दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

दिलजमाई झाली हो! पाहा व्हिडीओ…

या प्रकरणानंतर क्रिकेट चाहत्यांपासून सोशल मीडियावर सर्वत्र विराट विरुद्ध नवीन उल-हक यांच्यातल्या वादाचीच चर्चा झाली. त्यामुळे बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर विराट कोहलीचा काय आवेश असेल, याविषयी चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. विराट मैदानावर उतरल्यानंतर नवीन उल-हकशी त्याचं पुन्हा वाजणार का? अशी चर्चा होती. प्रेक्षकांनी नवीन उल-हकच्या बॉलिंगवेळी विराट, विराट नावाचा गजरच चालवला होता. त्यावेळी विराटनं त्याच्यातल्या खेळाडूचं दर्शन घडवलं!

नेमकं झालं काय?

नवीन उल-हक गोलंदाजी करत असताना विराटच्या नावाने दिल्लीकरांनी गजर चालवला होता. त्यावेळी विराट नॉन स्ट्रायकर एंडला असताना अचानक प्रेक्षकांच्या दिशेनं वळवा आणि त्यानं नवीन उल-हकला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना असं न करण्यासाठी खुणावलं. हातानं विराटनं सगळ्यांना शांत राहायला सांगितल्यानंतर दिल्लीकरांनीही त्यांच्या आवडत्या खेळाडूचं म्हणणं ऐकलं आणि सर्व शांत झाले.

…म्हणून तो विराट आहे! पाहा व्हिडीओ…

यानंतर विराट कोहलीनं नवीन उल-हकची गळाभेटही घेतली. दोघांमध्ये दिलखुलास हसत झालेला संवाद त्यांच्यात दिलजमाई झाल्याचीच साक्ष देत होता. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांनीही तो क्षण साजरा केला असेल यात शंका नाही.

IND vs AFG: …अखेर घोडं गंगेत न्हालं! कोहली-नवीनची दिलजमाई, कॉमेंट्रीला गंभीरची उपस्थिती; पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सर्वावर कडी म्हणजे ज्यावेळी मैदानात विराट कोहली व नवीन उल-हक यांच्यात दिलजमाई होत होती, तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये खुद्द गौतम गंभीर कॉमेंट्री करत होता. “दुसऱ्या देशातून कोणताही खेळाडू आला तर त्याला ट्रोल करू नका. याआधी नवीन उल हकला पाहून प्रेक्षकांनी कोहली-कोहलीचा नारा दिला होता. कोणत्याही खेळाडूला ट्रोल करणे चुकीचे आहे. अफगणिस्तानातील खेळाडू भारतात आयपीएल खेळायला येतात ही त्यांना मिळणारी खूप मोठी संधी आहे. एक भारतीय म्हणून त्यांचे स्वागत करणे आपले काम आहे”, असं आवाहन गंभीर प्रेक्षकांना करत होता!