ICC World Cup 2023: २०२३च्या विश्वचषकादरम्यान, विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि भारतीय क्रिकेट संघातील इतर अनेक खेळाडू टीम इंडियाच्या उर्वरित संघापासून वेगळे झाले आहेत. टीम इंडिया सध्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये खेळत आहे आणि न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आले आहेत.
रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी छोटासा ब्रेक घेतला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध आहे, दरम्यान खेळाडूंना ७ दिवसांचा दीर्घ विश्रांती मिळाली आहे. या ब्रेकचा फायदा खेळाडूंना होईल, ज्यामुळे विश्वचषकाच्या आगामी सामन्यासाठी मदत होईल.
३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान आशिया चषक असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह बहुतेक खेळाडू घरापासून दूर आहेत आणि सतत प्रवास करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर, बीसीसीआयच्या एका सूत्राने यापूर्वी पीटीआयला सांगितले होते की, “दोन सामन्यांमध्ये सात दिवसांचे अंतर असल्याने खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसोबत थोडा वेळ मिळणे योग्य आहे. त्यासाठी त्यांनी विश्रांती घेतली आहे.”
काय घडलं सामन्यामध्ये?
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताने २७४ धावांचे लक्ष्य ४८व्या षटकात सहा गडी गमावून पूर्ण केले.
अष्टपैलू हार्दिक पांड्या अजूनही एनसीए, बंगळुरूमध्ये आहे आणि तो थेट लखनऊमध्ये टीम इंडियामध्ये सामील होईल, अशी माहिती समोर येत आहे. याआधी बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला होता. भारताचा पुढील सामना रविवारी २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे.