२०२१ च्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने शेवटच्या वेळी भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत भारताची कामगिरी खराब झाली. टीम इंडियाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. कोहलीच्या कर्णधारपदावरही अनेक प्रश्न उपस्थित झाले. पुढील आठवड्यापासून न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० आणि कसोटी मालिका सुरू होत आहे. मात्र त्याआधी कोहली दीर्घ रजेवर जाणार आहे. त्याला बीसीसीआयची मान्यताही मिळाली आहे.

मात्र, कोहली किती दिवसांच्या रजेवर जात आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती बोर्डाकडे नाही. अशा परिस्थितीत तो न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने खेळू शकणार नाही आणि थेट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संघात सामील होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास रोहित शर्मा कसोटी आणि टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, कोहलीने नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतरच बोर्डाकडे सुट्टी मागितली होती आणि त्यांना परवानगी मिळाली आहे. असे अधिकारी म्हणाले.

हेही वाचा – “मला भारतीय संघांमध्ये सरळ सरळ दोन गट दिसतायत, एक मुंबईचा आणि…”; पाकिस्तानी खेळाडूचं विश्लेषण

मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो संघात सामील होण्याची शक्यता आहे. विराटने कर्णधार म्हणून कसोटीत चांगली कामगिरी करून भारताला इंग्लंडमध्ये २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पण आता त्याला त्याच्या फलंदाजीवरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अधिकाऱ्याच्या मते, विराटला त्याचा फॉर्म कसा परत मिळवता येईल, हे शोधण्यासाठी थोडा मोकळा वेळ हवा आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास यात नक्कीच फायदा होईल.

बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला विश्रांती घेण्यापासून रोखत नाही. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा संघासोबत राहिले तर कोणतीही अडचण येणार नाही, असे अधिकाऱ्याना सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वनडे संघाच्या कर्णधारपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. विराट कोहली अजूनही वनडे संघाचा कर्णधार आहे. जानेवारीत दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बोर्डाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, विराट फक्त काही सामन्यांसाठी विश्रांती घेत आहे. तो दुसऱ्या कसोटीपासून संघाचे नेतृत्व करेल. कसोटी संघ त्यांचा आहे आणि या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली आहे.