भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला यंदाचा क्रीडा क्षेत्रातील मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. २५ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. विराट कोहलीसोबत महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूचीही यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. मात्र शून्य गुण मिळवूनही विराटला खेलरत्न पुरस्कार मिळाल्यामुळे काही जणांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्कारांची नाव अंतिम करणाऱ्या ११ जणांच्या समितीसाठी काही निकष आखून दिलेले असतात. यामध्ये खेळाडूने केलेल्या कामगिरीच सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या ३ गटांमध्ये मुल्यांकन केलं जातं. मात्र समितीला आखून देण्यात आलेले निकष हे फक्त ऑलिम्पीक खेळांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेले आहेत. क्रिकेट हा खेळ लोकप्रिय असला तरीही तो ऑलिम्पिकमध्ये खेळला जात नाही, याच कारणासाठी विराटला समितीने शून्य गुण दिले होते. नेमके हे निकष कसे असतात, हे जाणून घ्या…

क्रिडा प्रकार                                                      सुवर्ण      रौप्य        कांस्य
ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक                                 ८० गुण    ७० गुण      ५५ गुण
विश्व अजिंक्यपद/विश्वचषक                             ४० गुण    ३० गुण      २० गुण
आशियाई खेळ                                                ३० गुण     २५ गुण     २० गुण
राष्ट्रकुल खेळ                                                   २५ गुण    २० गुण      १५ गुण

निवड समितीमधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात यावी की नाही यावर मोठी चर्चा रंगली. खेलरत्नसाठीच्या निकषांमध्ये विराट बसत नसतानाही बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी पाठवलं होतं. मात्र गेल्या एक वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीला पाहून समितीने बहुमताने विराटची निवड केली आहे. ११ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी विराटला खेलरत्न पुरस्कार दिला जावा याला आपला हिरवा कंदील दाखवला आहे.