Ravichandran Ashwin Net Worth: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. २००९ साली अश्विनने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि शेवटही याच संघातून केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये अश्विनने म्हटले, “आयपीएलचा माझा प्रवास समाप्त होत आहे. आता मी क्रीडा जगतातील नव्या प्रवासासाठी निघत आहे.” अश्विनच्या निवृत्तीनंतर माध्यमांवर त्याच्या संपत्तीविषयीची चर्चा होत आहे.
रवीचंद्रन अश्विनची संपत्ती किती?
माध्यमात आलेल्या माहितीनुसार, अश्विनची एकूण संपत्ती ११७ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याने चेन्नईत ९ कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे. येथे त्याची पत्नी प्रीती नारायणन आणि दोन मुली राहतात. त्याच्याकडे ऑडी Q7 यासारखी आलिशान कार आहे. याव्यतिरिक्त भारत आणि विदेशातील रिअल इस्टेटमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे.
आलिशा गाड्यांचा संग्रह
रवीचंद्रन अश्विनला इतर खेळाडूंप्रमाणेच आलिशान गाड्यांचा छंद आहे. वर सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे ऑडी Q7 सारखी महागडी गाडी तर आहेच. त्याशिवाय रॉल्स रॉईस, व्होल्वो अशा गाड्यांचीही रेलचेल आहे.
आर. अश्विन प्रति वर्षी अंदाजे १० कोटी रुपये कमावतो, अशी माहिती माध्यमातील वृत्तानुसार पुढे येत आहे. त्याला बीसीसीआयने ग्रेड ए दिला होता. यामुळे मॅच फी व्यतिरिक्त तो इतर मार्गाने ५ कोटींची कमाई करत होता. चेन्नई सुपर किंग्सने २०२४ च्या लिलावात अश्विनला ९.७५ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते.
अनेक ब्रँड्सची जाहिरात
अनुभवी फिरकीपटू असलेल्या आर. अश्विनने अनेक लोकप्रिय ब्रँड्सची जाहिरात केली होती. यामध्ये मिंत्रा, बॉम्बे शेविंग कंपनी, मन्ना फूड्स, एरिस्टोक्रॅट बॅग्स, ओप्पो, मूव्ह, स्पेसमेकर्स आणि कोको स्टुडियो तमिळ यासारख्या कंपन्यांचा समावेश होतो.
कशी राहिली कारकिर्द?
अश्विनने २०११ साली वेस्ट इंडिज विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. २०११ साली एकदिवसीय विश्व कप आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघातचाही तो भाग होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला यश मिळवून देत होता. त्याने १०६ कसोटी सामन्यात ५३७ बळी मिळवले आहेत. ३७ इनिंग्जमध्ये त्याने पाच विकेट घेण्याची किमया साधली आहे. ५९ धावांवर ७ बळी ही त्याच्या कारकिर्दीतली सर्वोच्च खेळी होती.
गोलंदाजीसह अश्विनने फलंदाजीतही कमाल दाखवली होती. त्याने २५.७५ च्या स्ट्राईक रेटने ३,५०३ धावा केल्या. ज्यामध्ये सहा शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्ये १२४ हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता.
आयपीएलच्या २२१ सामन्यात त्याने १८७ बळी घेतले होते. चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण केलेल्या अश्विनने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज संघ अशा पाच संघाकडूनही तो खेळला. पंजाब संघाचे कर्णधारपदही त्याने सांभाळले होते.