Mohammed Shami, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी आज बीसीसीआयने १८ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात युवा खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलं आहे. काही अनुभवी खेळाडूंना कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. तर काही प्रमुख खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. काय आहे शमीला संघात स्थान न मिळण्यामागचं कारण? जाणून घ्या.
मोहम्मद शमी गेले काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याला इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळाली. मात्र, कमबॅक केल्यानंतर तो आपली छाप सोडू शकलेला नाही. याशिवाय त्याची फिटनेसही चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देणं टाळलं आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाल्यानंतर, निवडकर्त्यांना पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार, तो या दौऱ्यावर जाऊ शकत नाही. या दौऱ्यावर जाण्यासाठी तो फिटनेस पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता.मात्र, गेल्या आठवड्यात त्याला पुन्हा त्रास झाला. त्यामुळे एमआरआय काढण्यात आला.”
तसेच ते पुढे म्हणाले,“ तो ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकेल असं मला वाटत नाही. मला वाटलं होतं, तो काही सामन्यांसाठी उपलब्ध असेल. पण तो फिट झाला नाही, तर अडचणी वाढतील. हे खूप दुर्दैवी आहे. कारण आम्हाला त्याच्यासारखा गोलंदाज संघात हवा होता.”
भारतीय कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. ही जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून, अर्शदीप सिंगचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ :
शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव