SA vs AUS WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा तिसरा दिवस सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलमध्ये अटीतटीची टक्कर सुरू आहे. दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच नववी विकेट मिळाली आहे. पण ऑस्ट्रेलियाकडेही चांगली आघाडी आहे. यादरम्यान तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत, यामागचं कारण जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना फारच अटीतटीचा होत आहे. दोन्ही संघ सामन्यात कमालीची कामगिरी करत आहेत. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला. तर दक्षिण आफ्रिकेचा संघही दुसऱ्याच दिवशी सर्वबाद झाला. दोन्ही संघांचे गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. कगिसो रबाडा आणि पॅट कमिन्स या दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट घेतल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच मैदानावर हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. दोन्ही संघांनी भारतात अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांना आदरांजली वाहिली आहे. या कारणामुळे दोन्ही संघातील खेळाडूंनी आदरांजली वाहण्यासाठी काळी पट्टी बांधली आहे. तर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी काही मिनिट उभं राहून आदरांजली देखील वाहण्यात आली.
१२ जून रोजी दुपारी भारतात अहमदाबाद येथे सर्वात मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं. ज्यामध्ये २४२ प्रवासी, २ वैमानिक आणि १० केबिन क्रू सदस्यही होते. हे विमान अहमदाबाद येथील मेघानीपरिसरातील एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर कोसळले, ज्यामध्ये २० डॉक्टर होऊ घातलेल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. या सर्वात मोठ्या विमान अपघातामध्ये फक्त एका प्रवाशाचा जीव वाचला आहे.
इतकंच नव्हे तर इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताचा अ संघ आणि भारतीय क्रिकेट संघ यांच्यात आज १३ जूनपासून इंट्रास्क्वाड सराव सामना सुरू होत आहे. या सामन्याकरता भारताचे सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळणार आहेत. अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृत्यू पावलेल्या लोकांना आदरांजली वाहिली गेली.