Ravindra Jadeja – Brydon Carse: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान फार मोठं नाही. पण, या धावांचा पाठलाग करताना भारताचे ७ फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत. दरम्याना रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डीने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. पण पहिल्या सत्राच्या शेवटी नितीश रेड्डी बाद होऊन माघारी परतला. यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स आणि रवींद्र जडेजा यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सने चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं होतं. त्यानंतर पाचव्या दिवसाच्या सुरूवातीलाच जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने जोरदार आक्रमण करत आधी ऋषभ पंत, मग केएल राहुल आणि शेवटी वॉशिंग्टन सुंदरला बाद केलं. त्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर होता. पण नितीश कुमार रेड्डी आणि रवींद्र जडेजाने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला.
ब्रायडन कार्स- रवींद्र जडेजा यांच्यात बाचाबाची
इंग्लंडचे खेळाडू स्लेजिंग करून भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, भारतीय फलंदाज संयमी खेळी करताना दिसून येत आहेत. यादरम्यान रवींद्र जडेजा आणि ब्रायडन कार्स यांच्यात धक्काबुक्की झाली. तर झाले असे की, ब्रायडन कार्स गोलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा स्ट्राईकवर होता. त्यावेळी रवींद्र जडेजाने शॉट मारला आणि शॉट मारताच २ धाव घेण्यासाठी सांगितलं. पहिली धाव घेत असताना जडेजा धावला त्यावेळी ब्रायडन कार्स मध्येच उभा होता. त्यामुळे ब्रायडन कार्सला धक्का लागला. जडेजा पडणार होता, पण त्याने स्वत:ला सावरलं आणि दुसरी धाव पूर्ण केली. त्यावेळी जडेजा त्याला म्हणाला की, “मी धाव घेण्याच्या प्रयत्नात होतो..” प्रत्युत्तर देत कार्स म्हणाला की, ” तू माझ्या दिशेने धावत आलास.” त्यानंतर दोघांमध्येही बाचाबाची झाली. शेवटी बेन स्टोक्सने दोघांनाही समजवलं आणि हा वाद मिटवला.
भारतीय संघ अडचणीत
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतला.त्यानंतर करूण नायरला अवघ्या १४ धावा करता आल्या. कर्णधार शुबमन गिलला ६ आणि नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला आकाशदीप १ धाव करत माघारी परतला. सामन्यातील पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऋषभ पंत, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी स्वस्तात माघारी परतले आहेत.