World Cup 2023, Angelo Mathews Timed Out Memes : विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये श्रीलंकेच्या संघाला आतापर्यंत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाबरोबर श्रीलंकेचा संघही गुणतालिकेच्या तळाशी आहे. भारताविरुद्ध ३०३ धावांनी पराभव झाल्यानंतर आख्खं श्रीलंका क्रिकेट बोर्डच बरखास्त करण्यात आलं आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. अशातच श्रीलंकेला आज आणखी एक धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज ज्या प्रकारे बाद झाला, ती गोष्ट श्रीलंकेच्या संघालाच नव्हे, तर स्वत: मॅथ्यूजलाही पुढची अनेक वर्षं टोचत राहील हे नक्की.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना खेळवला जात आहे. या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज Time Out झाला! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा फलंदाज टाईम आऊट पद्धतीने बाद झाला आहे. मॅथ्यूजसाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. दरम्यान, टाईम आऊट पद्धतीने बाद झाल्यामुळे मॅथ्यूज सध्या समाजमाध्यमांवर थट्टेचा विषय बनला आहे. समाजमाध्यमांवर त्याची चेष्टा करणाऱ्या मिम्सचा पाऊस पडत आहे.

सामान्य क्रिकेटरसिक आणि नेटीझन्स अँजेलो मॅथ्यूजला ट्रोल करत असतानाच इंडियन प्रीमियर लीगमधील काही संघांनीदेखील मॅथ्यूजवर मिम्स बनवून शेअर केले आहेत. लखनौ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाने समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या मिम्सवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. मॅथ्यूजवर बनवलेलं ‘जल्दी कर, सुबह पनवेल निकलना हैं’ हे मिम अनेकांना आवडलं आहे.

हे ही वाचा >> Angelo Mathews: क्रीझवर आलेल्या मॅथ्यूजला खेळण्याआधीच अम्पायरनं दिलं बाद! काय आहे Time Out चा नियम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैदानात नेमकं काय घडलं?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात २४ व्या षटकात समरविक्रमा बाद झाला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला. परंतु, तो फलंदाजीला सुरुवात करणार तेवढ्यात त्याला त्याच्या हेलमेटमध्ये काहीतरी समस्या जाणवली. त्यानं तातडीने पॅव्हेलियनकडे इशारा करून दुसरं हेल्मेट मागवलं. हेल्मेट आलंही. पण ते घालून मॅथ्यूज पुन्हा फलंदाजी करण्याआधीच शाकिब अल हसनने पंचांकडे मॅथ्यूजला बाद करण्याचं अपील केलं होतं आणि पंचांनीदेखील मॅथ्यूजला बाद घोषित केलं. हा सगळा प्रकार पाहून प्रेक्षक चक्रावले होते. श्रीलंकेच्या काही खेळाडूंना नेमकं काय झालंय हेच समजत नव्हतं. बांगलादेशचे खेळाडू मात्र जल्लोष करत होते. कारण श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज एकही चेंडू न खेळता स्वस्तात माघारी परतला होता.