नितीन शर्मा, निहाल कोशी

रोख रकमेचे पुरस्कार, गाड्या, जमीन, सरकारी नोकरी, जाहिराती आणि काही मिलिअन नवे फॉलोअर्स. वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना सरकार तसंच खाजगी अशा विविध क्षेत्रातून बक्षीसांचा वर्षाव होतो आहे. पहिलंवहिलं जेतेपद असल्याने त्याचं महत्त्व अनोखं आहे. पण काही बक्षीसं अनोखी आहेत. मध्य प्रदेश सरकारने घुवारा गावच्या क्रांती गौडच्या वडिलांचं दशकभरापूर्वी लागू झालेलं निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री विश्वास कैलास वर्गीय यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘छत्तरपूर जिल्ह्यात एक चांगल्या दर्जाचं स्टेडियम असावं अशी इच्छा क्रांतीने व्यक्त केली आहे. अशा स्वरुपाचं स्टेडियम उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल. क्रांतीच्या वडिलांचं निलंबन रद्द करून त्यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबात औपचारिक प्रक्रिया राबवली जाईल’.

या निर्णयाने भारावून गेलेल्या क्रांतीचा भाऊ मयांकने सांगितलं की, ‘माझ्या बहिणीने देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. याबरोबरीने तिने घरच्यांसाठी अतिशय मोलाची गोष्ट केली आहे’. २०११ मध्ये कर्तव्यावर असताना हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप ठेऊन क्रांतीच्या वडिलांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांनी हे आरोप फेटाळले होते. मात्र आता त्यांना सेवेत रुज करून घेतलं जाणार आहे.

बाकी खेळाडूंनाही असेच सुखद धक्के मिळत आहेत. वर्ल्डकपविजेत्या संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी संघाशी संवाद साधला. यावेळी अष्टपैलू हरलीन देओलने पंतप्रधानांना, तुमचं स्कीनकेअर रुटीन काय असतं? असं विचारलं. या प्रश्नाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या काही तासात कॉस्मेटिक कंपनीने हरलीनशी संपर्क साधला आणि सदिच्छा दूत म्हणून तिची निवड केली.

चंदीगढ विमानतळावर उतरल्यानंतर काही तासातच हरलीन एका फोटोशूटसाठी रवाना झाली. ‘आज एका ब्रँडसाठी तिचं फोटोशूट आहे. क्रिकेटच्या आवडीतून, चांगलं खेळून तिला हे मिळालं आहे याचा आम्हाला आनंद आहे’, असं हरलीनचे बंधू डॉ. मनजोत सिंग यांनी सांगितलं.

पण ब्रँडव्हॅल्यू झपाट्याने वाढणारी हरलीन या संघातली एकमेव खेळाडू नाहीये. जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा यांच्या जाहिराती आणि व्यावसायिक बाजू सांभाळणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीचे सीईओ दिव्यांशू सिंग यांनी यासंदर्भात आकडेवारीच मांडली. ‘या स्पर्धेने केवळ भारताला विश्वविजेता केलं एवढंच नाहीये, या स्पर्धेच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरणं निर्माण झाली. फायनलच्या लढतीत अर्धशतक आणि २ विकेट्स पटकावणारी शफाली आणि सेमी फायनलच्या लढतीत शतकी खेळी साकारणारी जेमिमा यांच्या ब्रँडव्हॅल्यूमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. विविध ब्रँड्स त्यांना करारबद्ध करण्यासाठी उत्सुक आहेत. इन्स्टाग्रामवर जेमिमाचे फॉलोअर्स १.५ मिलिअनहून ३.३ झाले आहेत. शफालीच्या फॉलोअर्समध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जेमिमाची एन्डोर्समेंट व्हॅल्यू ६० लाखांवरून दीड कोटीपर्यंत गेली आहे. शफालीच्या बाबतीत ४० लाखांहून एक कोटी झाली आहे. जेमिमा सध्याच्या घडीला नाईके, रेड बुल, हुंदाई सर्फ एक्सेल यांच्याशी संलग्न आहे. दडपणाच्या क्षणी हार न मानता निर्धाराने कर्तेपण स्वीकारून वाटचाल करणे याचं प्रतीक म्हणून जेमिमाकडे पाहिलं जात आहे’.

सर्फ एक्सेलने काही वर्षांपूर्वी ‘दाग अच्छे है’ नावाची कॅम्पेन राबवली होती. सेमी फायनलच्या खेळीदरम्यान सातत्याने डाईव्ह लगावून जेमिमाची जर्सी मातकटली होती. त्यामुळे डिटर्जंट ब्रँडने तात्काळ तिच्याशी करार केला. ‘महिला क्रिकेटपटू बदलाचे पाईक झाले आहेत. त्यांच्याद्वारे स्थित्यंतर होईल. खेळाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडेल. मानसिक आरोग्याबद्दल जेमिमा खुलेपणाने बोलली. स्वत:चं म्हणणं ठामपणे मांडण्याची शैली, दमदार कामगिरीसह प्रत्युत्तर देणं हे सगळं नोंदलं गेलं आहे’, असं सिंग म्हणाले.

आता बक्षीस रकमांकडे वळूया. आयसीसीने वर्ल्डकविजेत्या संघाला जवळपास ४० कोटी रुपये बक्षीस रकमेनं गौरवलं. बीसीसीआयने संघासाठी ५१ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंसाठी रोख रकमेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांच्यासाठी प्रत्येकी २.२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली. भारतीय संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार तसंच गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांनी सन्मानित करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त आयफोनही देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेटपटूंसाठी निवासी अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गाड्या आणि जमीन

आंध्र प्रदेश सरकारने २१वर्षीय श्री चरणीला १००० स्क्वेअर फूटांचा भूखंड घरासाठी बक्षीस म्हणून दिला आहे. ग्रेड १ नोकरी आणि रोख रक्कम असं बक्षीसाचं स्वरुप आहे. मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रोख रक्कम, नोकरी तसंच बढती असं आश्वासन दिलं आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी यांनी फायनलची नायक शफाली वर्माला अधिकृत निवासस्थानी भेटीसाठी निमंत्रण दिलं आहे. नव्याकोऱ्या एसयुव्ही गाड्या भेट म्हणून दिल्या जाणार आहेत. वर्ल्डकपविजेत्या संघातील प्रत्येकीला नव्याने रिलॉन्च करण्यात आलेली टाटा सियारा गाडी कंपनीतर्फे देण्यात येणार आहे.

बहुतांश राज्यांमध्ये या खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं आहे. अमनजोत कौर आणि हरलीन देओल यांचं चंदीगढ विमानतळावर आगमन झालं तेव्हा पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा आणि खासदार मीत हेयर उपस्थित होते. भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आम्ही वर्ल्डकप जिंकल्यापासून काय बदल झाला आहे हे तुम्ही पाहिलंच आहे असं अमनजोतने सांगितलं. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अमनजोतच्या आजीला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र तिचं लक्ष स्पर्धेवर राहावं यासाठी कुटुंबीयांनी तिला ही गोष्ट सांगितली नाही. वर्ल्डकपविजेत्या अमनजोतला सगळ्यात आधी आजीला भेटायचं आहे.

आमच्या सगळ्याजणींचं आयुष्य बदलून गेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना भेटण्याचा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. प्रत्येकाचं घरी जोरदार स्वागत झालं आहे असं अमनजोतने सांगितलं. हिमाचल प्रदेशात पारसा गावात रेणुकाचं जंगी स्वागत झालं. रेणुकाच्या घरी शुभेच्छुकांची रीघ लागली आहे. आमचं गाव आता रेणुकाचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. तिला पोलीस खात्यात नोकरी मिळावी अशी आमची इच्छा आहे. डीसीपीच्या गणवेशात तिला पाहायचं आहे असं तिचा भाऊ विनोदने सांगितलं.