WPL 2023 Highlights Updates, MI-W vs RCB-W: महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईला दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. दिल्लीला यूपी वॉरियर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास उत्तम नेट रनरेट असलेला संघ अव्वल स्थानावर जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युतरात मुंबई इंडियन्सने १६.३ षटकात ६ गडी गमावून १२९ धावा केल्या. त्याचबरोबर साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकला. बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरूचा संघ चाचपडताना दिसला. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे योगदान दिले. अमेलिया केरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी इस्सी वोंग आणि नॅट सीव्हर ब्रंट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सायका इशाकने एक विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सोफी डिव्हाईन (०) पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया केरने बंगळुरूला तीन धक्के दिले. तिने प्रथम कर्णधार स्मृती मंधानाला यष्टिका भाटियाकडे झेलबाद केले. मंधाना २४ धावा करू शकली. यानंतर हीदर नाइटला वोंगने झेलबाद केले. तिला १२ धावा करता आल्या. कनिका आहुजाला अमेलियाने यष्टिरक्षक यस्तिकाच्या हातून यष्टिचित केले. कनिकाला १२ धावा करता आल्या. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे सर्वाधिक धावांचे योगदान दिले. एलिस पेरीला नॅट सीव्हर ब्रंट एलबीडब्ल्यू केले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिलाही नॅट सीवरने बोल्ड केले. मेगन शुटला सायका इशाकने एलबीडब्ल्यू केले. तिला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी इस्सी वाँगने २० व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कासट यांना बाद केले. रिचा १३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९धावा करून बाद झाली. दिशाला दोन धावा करता आल्या.