रोहित शर्मा, विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारताच्या नव्या युगाची सुरूवात पराभवाने झाली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत भारताचा ५ विकेट्सने पराभव केला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या पराभवामागील सर्वात मोठं कारण म्हणजे संघाचे खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी. क्षेत्ररक्षणात जर कोणी सर्वात जास्त झेल सोडले तर तो यशस्वी जैस्वाल होते. पण भारत सामन्यात हरत असताना यशस्वी जैस्वाल सीमारेषेवर नाचत असताना दिसून आला, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या ५ फलंदाजांनी या सामन्यात शतकं झळकावली. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकी कामगिरी केली. पण क्षेत्ररक्षणाच्या वेळेस मात्र भारताने सर्वांनाच निराश केलं. भारताने दोन्ही डावांमध्ये मिळून अनेक झेल सोडले. यात सर्वाधिक झेल सोडण्याचं काम यशस्वी जैस्वालने केलं, त्याने या सामन्यात ४ झेल सोडले.
यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात एक महत्त्वाचा झेल सोडला, ज्याचा भारताला सामन्यात मोठा फटका बसला. यशस्वी जैस्वालला झेल सोडल्यामुळे चाहते सोशल मीडियावर तुफान ट्रोल करत आहेत. पण आता यादरम्यान जैस्वालचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो नाचताना दिसत आहे, यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत.
यशस्वीने दुसऱ्या डावात ९७ धावांवर खेळत असताना बेन डकेटचा झेल सोडला. यानंतर त्याने मॅचविनिंग खेळी खेळत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. एकिकडे भारतीय संघ सामना गमावत होता, तर दुसरीकडे जैस्वाल सीमारेषेवर फलंदाजी करताना इंग्लंडच्या चाहत्यांसमोर नाचताना दिसला. त्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. पण खरंतर इंग्लंडचे चाहते त्याला ट्रोल करत होते. चाहते इंग्रजीमधील नर्सरीची कविता बोलत त्याला चिडवत होते आणि यादरम्यान तो नाचत होता.
दोन्ही डावांमध्ये भारतीय संघाचं सर्वात मोठं नुकसान मधल्या फळीतील फलंदाज आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी धावा न काढल्याने झालं. वरच्या फळीने चांगली फलंदाजी केली आणि इंग्लंडला ३७१ धावांचे लक्ष्य दिले. यानंतर इंग्लंड संघाला शेवटच्या दिवशी फक्त ३५० धावा करायच्या होत्या आणि भारताला १० विकेट घ्यायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाज पहिल्या सत्रात विकेट घेऊ शकला नाही.
इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १८८ धावांची भागीदारी केली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. यादरम्यान बेन डकेटने सर्वाधिक १४९ धावा केल्या आणि भारताला ५ गडी राखून पराभूत केले. याशिवाय जो रूटनेही अर्धशतक झळकावले. भारताचे आघाडीचे २ गोलंदाज बुमराह आणि सिराज यांना एकही विकेट मिळाली नाही. तर रवींद्र जडेजाने १, प्रसिद्ध कृष्णाने २ आणि शार्दुल ठाकूरने २ विकेट घेतल्या.