सुहास जोशी

हिमाचल आणि लेहच्या भटकंतीत थुक्पा हा पदार्थ सर्वत्र मिळतो. तुलनेने थेंतुक  हा प्रकार तसा ठरावीक ठिकाणीची मिळतो. थेंतुकचे अगदी समर्पक वर्णन करायचे तर आपल्याकडे चकोल्या किंवा वरणफळ करतात तसाच हा प्रकार आहे. फक्त येथे बारीक छोटय़ा छोटय़ा चकत्या न करता लांबच लांब पट्टय़ा असतात. मनाली-लेह रस्त्यावरील काही ढाब्यांवर हा पदार्थ मिळतो. व्हिस्की नाला येथील एका ढाब्यावरील पन्नाशीकडे झुकलेले ढाबामालक जोडपे अगदी निगुतीने थेंतुक तयार करतात. पत्नी वेगवेगळ्या भाज्या घालून सूप तयार करण्यात गुंतलेली असते. तर तिचा पती थेंतुकसाठी मैदा आणि कणकेचे मिश्रण तिंबत असतो. भरपूर भाज्या घातलेल्या या सूपसदृश मिश्रणाला चांगली उकळी येईपर्यंत थेंतुकचे पीठ तयार होते. मग त्याची मोठी पोळी लाटली जाते आणि त्याच्या उभ्या लांबलचक पट्टय़ा कातून घेतल्या जातात. त्या पट्टय़ा एकेक करून त्या रटरटणाऱ्या मिश्रणात सोडल्या जातात. त्यानंतर मिश्रणाला थोडी वाफ येऊ दिली जाते. मग मोठाल्या वाडग्यात अगदी आग्रह कर करून थेंतुक वाढले जाते.

व्हिस्की नाला हे ठिकाण उंचावर आहे, पण ते चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये रात्री चांगलीच थंडी असते. अशा वेळी वाडगाभर गरम थेंतुक खाताना मस्त वाटते. रोजरोज पराठा किंवा मॅगी खाऊन कंटाळा आला असेल तर या वाटेवर थेंतुक हमखास खाऊन पाहावे.

लेहमध्येदेखील काही ठिकाणी थेंतुक मिळते, पण व्हिस्की नाल्यातल्या थेंतुकची चव काही वेगळीच आहे.