|| सायली रावराणे
‘इंटरनेट’ हा शब्द चांगल्या किंवा वाईट अर्थाने आजकाल निव्वळ तांत्रिक बाबीपुरता राहिलेला नाही. तो जीवनाचा एक भाग बनलेला आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, गुगल घ्या वा विकिपीडिया. मानवाच्या साऱ्या क्रिया या साऱ्यांमध्ये गुंतलेल्या आहेत. आजच्या तरुणाईला इंटरनेटने शब्दश: वेढा दिला आहे. पण हा वेढा मोडून तरी काढला जातो किंवा त्याला चिकटून राहण्यासाठी आई-वडिलांशी तह करावा लागतो. अनेकांना इंटरनेट म्हणजे सुविधा वाटते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे इंटरनेटचा जीवनात उत्तम पद्धतीने वापर करता येतो. विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट ‘माहीतगार’ ठरलेला आहे. अशाच काही ‘नेट’शी नाते जडलेल्या तरुणांशी साधलेला हा संवाद.
प्रगती म्हणजे इंटरनेट
महाविद्यालयात असताना वेगवेगळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इंटरनेटची मदत होत असे. नोकरीला लागल्यानंतर मात्र या इंटरनेटने मला खऱ्या अर्थाने तारले असेच म्हणावे लागेल. मनोरंजन क्षेत्रात पत्रकारिता करताना दरक्षणी इंटरनेटची गरज लागते. नव्यानेच या क्षेत्रात पाऊल टाकत असताना घटनांची पाश्र्वभूमी मला अगदी हाताच्या बोटांवरच कळू लागली. ही सुविधा नसती तर प्रत्येक वेळी माहितीसाठी मला कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहवे लागले असते. आता मात्र इतक्या सहजरीत्या ही सुविधा उपलब्ध असल्याने ती लोकांसाठी रोजची गरज बनली आहे. स्वत: एका संकेतस्थळासाठी काम करीत असल्यामुळे हे इंटरनेटच माझे पोट भरते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. एकूणच इंटरनेट म्हणजे प्रगती. -विनय मिश्रा, पत्रकार
सोपं आणि सहज
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे अधिक सोप्या झाल्यासारख्या वाटतात. या परीक्षांचा अभ्यास करताना खूप मोठय़ा मोठय़ा पुस्तकांचे वाचन करावे लागते. अनेकदा वाचूनही काही गोष्टी आपल्याला पूर्णपणे स्पष्ट होत नाहीत. चित्र, चित्रफितीच्या माध्यमातून तीच गोष्ट समजून घेणे काही प्रमाणात सोपे होते. अर्थशास्त्राचा अभ्यास मला काही अंशी कठीणच जातो. पुस्तकांमधून या गोष्टी समजून घेताना अनेक अडचणी येतात. यूटय़ूबवर सध्या वेगवेगळ्या प्रकारे काही संकल्पना सोप्या भाषेत, वेगवगेळ्या चित्रांचा वापर करून समजावल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीने एखादी गोष्ट समजून घेणे सोयीचे ठरते. अगदी किमान पैशात ही सुविधा उपलब्ध असल्याने यावर बिनधास्त अवलंबून राहता येते. -सागर वाघमोडे, स्पर्धा परीक्षार्थी
इंटरनेटच माझा गुरू!
समाजमाध्यमांच्या आहारी गेल्याच्या तक्रारी अनेकांकडून केल्या जात असल्या तरी या समाजमाध्यमांचा चांगल्यासाठी वापर केला तर ते खूपच फायदेशीर ठरू शकतात. समाजमाध्यमांमधून वेगवेगळ्या छायाचित्रकारांचे काम पाहून मला वेळोवेळी प्रेरणा मिळते. या क्षेत्रासाठी लागणाऱ्या पद्धतींचे सर्व शिक्षण मी या इंटरनेटमधूनच घेतले आहे. विविध अॅप वापरण्याचे ज्ञान मला या इंटरनेटकडूनच मिळाले आहे. यूटय़ूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या चित्रफिती पाहून एखाद्या छायाचित्रात कशा प्रकारे बदल करावा, त्यासाठी कोणत्या अॅपचा वापर करावा, छायाचित्र काढताना कशा पद्धती वापराव्यात याची चांगलीच माहिती मिळते. यूटय़ूब हाच माझा या क्षेत्रातील गुरू म्हणावा लागेल.-शुभंकर साधले, छायाचित्रकार
मनोरंजनाधारी शिक्षण
एखादी संकल्पना पाहून आपल्याला जितक्या चांगल्या पद्धतीने कळते तितकी ती वाचून कळत नाही. विद्यार्थ्यांना शिकवताना मी याच पद्धतीचा सर्वाधिक वापर करते. इंटरनेटच्या सुविधेमुळे मला हे करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. आजकाल शाळांमध्येही अशा पद्धतीने शिकवण्याची सक्ती केली आहे. ई-लर्निग ही संकल्पना खूपच फायदेशीर ठरू लागली आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा कशा पद्धतीने वापर करावा हे माहीत असेल तर ते नेहमीच फायदेशीर ठरते. माझ्या अभ्यासासाठी अनेकदा मला काही साहित्य उपलब्ध होत नाही. मग अशा वेळेला मला इंटरनेटवर सहज उपलब्ध असणाऱ्या पीडीएफचा फायदा होतो. इंटरनेटवर खूप मोठय़ा प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. या माहितीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला तर यासारखे शिक्षणाचे दुसरे माध्यम नाही. – अश्विनी शर्मा, शिक्षक आणि विद्यावाचस्पती (पीएच.डी.) विद्यार्थी