सध्याच्या डिजिटल युगात संगणक हा सर्व व्यवहारांचा केंद्रबिंदू असल्याने प्रिंटर ही अत्यावश्यक गरज बनली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टपासून कार्यालयातील कामकाजापर्यंत अनेक बाबतीत प्रिंटरची वेळोवेळी गरज भासत असते. त्यामुळे बाजारात अनेक प्रिंटर येत आहेत. ‘एचपी’ कंपनीचा ‘नेव्हरस्टॉप १२०० डब्ल्यू’ हा प्रिंटर आपली अशी प्रत्येक गरज भागवण्यासाठी उपयुक्त आणि परवडणारा प्रिंटर आहे.

‘एचपी’ ही कंपनी प्रिंटरच्या उत्पादनांसाठी विशेषकरून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीचे प्रिंटर वापरात आहेत. अगदी घरगुती साध्या प्रिंटरपासून मोठमोठय़ा कंपन्यांमधील अवाढव्य पिंट्रपर्यंतची उत्पादने ही कंपनी निर्माण करते. या सगळय़ांत ‘एचपी नेव्हरस्टॉप १२०० डब्ल्यू’ हा काही बाबतीत वेगळा ठरतो. सर्वप्रथम हा प्रिंटर घरगुती वापर किंवा छोटय़ा कार्यालयांसाठी उपयुक्त आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे साधारण दोन फूट बाय दोन फूट आकाराच्या जागेत सहज सामावणाऱ्या या प्रिंटरमध्ये त्या ठिकाणच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत. पण त्याचवेळी या प्रिंटरच्या अन्य वैशिष्टय़ांकडे आणि रचनेबद्दल माहिती द्यायला हवी.

सुटसुटीत मांडणी, आटोपशीर आकार आणि सहज जोडणी ही या प्रिंटरची प्रमुख रचनात्मक वैशिष्टय़े आहेत. प्रिंटर  ‘अनबॉक्स’ केल्यानंतर अर्थात नवीन प्रिंटर सुरू केल्यानंतर जोडणीसाठी तुम्हाला कोणतेही सॉफ्टवेअर किंवा विशेष प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. कारण ‘वायफाय’ नेटवर्कद्वारे तुम्ही अगदी पाच मिनिटांत हा प्रिंटर तुमच्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरशी जोडू शकता. ही जुळणी प्रक्रिया साधी सोपी आहे. वायफाय नसल्यास तुम्ही प्रिंटरसोबत पुरवलेल्या यूएसबी वायरच्या मदतीने तो संगणक किंवा लॅपटॉपशी जोडून त्याचा सेटअप करू शकता. यामध्ये ब्लूटुथची व्यवस्था आहे. मात्र, तिची प्रमुख भूमिका प्रिंटरच्या सेटअपसाठी आहे. या प्रिंटरला ‘स्कॅनर’ची जोडणीही पुरवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे दस्तावेज किंवा छायाचित्रे स्कॅन करण्याची सुविधाही मिळते.

या प्रिंटरमध्ये कागद ठेवण्यासाठी एकच ट्रे पुरवण्यात आला असून कागद ठेवल्यानंतर ते झाकण्यासाठी वेगळी ‘केस’ही पुरवण्यात आली आहे. प्रिंटरवर धूळ बसणे किंवा धुळ बसून त्याच्या ‘पेपर ट्रे’मधील कागद खराब होणे, या दोन्ही गोष्टी ‘एचपी नेव्हरस्टॉप’मध्ये टाळता येतात. अर्थात हा ‘पेपर ट्रे’ बसवताना थोडी झटापट करावी लागते. मात्र, ती सुरुवातीलाच.

आता या प्रिंटरच्या कामगिरीबद्दल. सर्वप्रथम ‘एचपी नेव्हरस्टॉप १२०० डब्ल्यू’ हा कृष्णधवल मुद्रण करणारा प्रिंटर आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला रंगीत प्रिंटआऊट काढावी लागत असेल तर हा प्रिंटर तुमच्या उपयोगाचा नाही. एका वेळी पाच हजार प्रति मुद्रित करणारा हा जगातील पहिला लेझरजेट प्रिंटर असल्याचा ‘एचपी’चा दावा आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एका प्रिंटआऊटसाठी साधारण २९ पैसे इतका खर्च येतो. यातून येणाऱ्या प्रिंटआऊट सुस्पष्ट आणि गडद आहेत. विशेषत: मजकुराच्या मुद्रणासाठी हा अतिशय उपयुक्त आहे. कृष्णधवल छायाचित्रांच्या मुद्रणाचा पर्याय फारसा उपयोगात नाही. मात्र, लहान मुलांसाठी ‘कलरिंग’साठीची चित्रे किंवा शैक्षणिक अभ्यासातील आकृत्या किंवा कार्यालयीन कामकाजाचे आलेख आदी गोष्टी यावर प्रिंट करता येतात. दुकानांमधील बिले मुद्रित करण्यासाठीही हा प्रिंटर उपयोगी ठरू शकतो.

या प्रिंटरचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याचा टोनर. ‘एचपी नेव्हरस्टॉप’मध्ये शाईचा टोनर वेगळय़ा पद्धतीचा असून तो अगदी सहजपणे काढता किंवा बसवता येतो. कोणत्याही प्रिंटरमध्ये शाईचे ‘कार्टरेज’ काढणे आणि बसवणे हे अतिशय कटकटीचे काम आहे. मात्र, यातील टोनर अगदी झाकण फिरवावे तसे फिरवून बाहेर काढता येते. ही बाब या प्रिंटरचे महत्त्वाचे वैशिष्टय़ असे म्हणावे लागेल.

आता या प्रिंटरच्या किमतीकडे येऊ. ‘एचपी नेव्हरस्टॉप एमएफपी १२०० डब्ल्यू’ हा प्रिंटर अंदाजे २३ हजार ४६० रुपये किमतीला उपलब्ध आहे. ही किंमत जास्त वाटते. कारण या प्रिंटरची निर्मिती मुळात घरगुती किंवा छोटय़ा व्यवसायांना डोळय़ांसमोर ठेवून करण्यात आली आहे. असे असताना एका प्रिंटरसाठी २३ हजार रुपये मोजणे त्या ग्राहकांना कितपत परवडेल, ही शंकाच आहे. दुसरे म्हणजे, यामध्ये रंगीत प्रिंटआऊट काढण्याची सुविधा नसल्याने केवळ कृष्णधवल प्रिंटसाठी इतके पैसे मोजताना ग्राहक नक्कीच विचार करू शकतील.