करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव.. 

coronafight@expressindia.com

वैजनाथ प्रभुदेसाई : ‘आजोबा उद्यापासून पाळणाघर नाही. आईबाबापण ऑफिसला जाणार नाहीत. आणि आजीपण घरी. मज्जा आहे ना. तुमच्या सकाळच्या योगवर्गाला  सुटी,’ नातीच्या या बोबडय़ा, निरागस बोलांमुळे या टाळेबंदीचा ताण पळून गेला. मी एक योगशिक्षक आहे. सकाळचा वेळ कसा सत्कारणी लावायचा हे सुचत नव्हते. नातीकडून मिळालेल्या आनंदाचा आणि ऊर्जेचा उपयोग करायचे ठरवले. तिच्या आईबाबांना घरूनच काम करायचे होते. त्यामुळे हे सगळे कसे होणार, असे भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होते. पण नात खूप आनंदी होती. कारण तिला घरात सगळे एकत्र मिळणार होते.

घरच्या सर्वानाच योगाची गोडी लावावी असे खूप दिवस मनात होते, या काळात नामी संधी चालून आली. सुरुवात नातीपासून के ली. तिच्या आईवडिलांना पूर्वी कामाच्या व्यापामुळे योग, व्यायाम यासाठी वेळ नव्हता. आताही घरून कराव्या लागणाऱ्या कामामुळे योग करायची फार इच्छा नव्हती. पण आता त्यासाठी नातीलाच तयार केले. उद्यापासून तू योगशिक्षक आणि आईबाबांना शिकवायचे आहे असे तिला पढवले. मग काय तीही उत्साहाने तयार झाली. सूनबाईंनीही उत्साह दाखवला. दोघांची शिकवणी सुरू झाली. पत्नीही येऊ लागली. नातीला कं टाळा आल्यावर सारे गच्चीत जाऊन तिला खेळवू लागलो. छान गप्पा होऊ लागल्या. मी गीता शिकलो होतो. पत्नीलाही ती शिकवू लागलो. मला चित्र  काढणे विशेषत: व्यंगचित्र काढण्याचा छंद आहे. त्याचेही प्रयोग होऊ लागले. स्वयंपाकघरात पत्नी आणि सूनबाई वेगवेगळे पदार्थ करत असल्याने तिकडेही मजा सुरू होती. आमच्या योगसंस्थेने  सकाळी आम्हा शिक्षकांसाठी साधना, ध्यान वगैरेचे उजळणीवर्ग ऑनलाइन सुरू  के ल्याने त्यातही छान वेळ जाऊ लागला. वाचनाची आवड होतीच. एकू णच टाळेबंदीचा हा काळ जेवढा वाटला होता तितका काही वैतागवाणा नाही.

पुस्तकांच्या जगात

करिश्मा मुदलियार, सांताक्रूझ

सध्याचा काळ आपल्या सर्वाची मानसिक परीक्षा घेणारा आहे. त्यामुळे या काळात स्वत:चे मानसिक संतुलन उत्तम राखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वाचन. मला तशी बालपणापासूनच कथा-कादंबऱ्या वाचण्याची विशेष आवड आहे. आता हाच छंद माझी स्वत:ची ओळख निर्माण करण्यात फायदेशीर ठरत आहे. इन्स्टाग्रामवर सुरू केलेल्या अकाउंटवर मी स्वत: लिहिलेल्या चारोळ्या, कविता आणि वेगवेगळ्या विषयांवरील माझे लेख शेअर करू लागले.  त्याशिवाय मला छायाचित्र काढण्याचीही प्रचंड आवड असल्याने माझा मित्र अक्षय याच्यासह  छायाचित्रांचे खास अकाउंटही सुरू केले. परंतु सध्या घराबाहेर पडून छायाचित्र काढणे अशक्य असल्याने मी वाचनावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन महिन्यांत मी आतापर्यंत सवी शर्मा यांचे ‘स्टोरीज वी नेव्हर टेल’, आशीष बागरेचा यांचे ‘डिअर स्ट्रेंजर आय नो हाऊ यू फील’, कोमल कपूर यांचे ‘अनफॉलोइंग यू’ आणि नोवोनील चक्रवर्ती यांचे ‘चीटर्स’ इत्यादी पुस्तके तसेच कादंबऱ्या वाचल्या आहेत. प्रत्येक कादंबरीने मला माझे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी फार सहकार्य केले असून माझी लिखाणाची शैलीही यामुळे सुधारली आहे. वाचनाव्यतिरिक्तच मी नवनवीन पाककृतीही शिकते आहे. कुटुंबीयांसह मौजमजा करतानाच्या विविध चित्रफितीसुद्धा मी समाजमाध्यमांवर पोस्ट करत असून मित्र-मैत्रीणींशी भ्रमणध्वनीवर तासन्तास गप्पा मारूनही मी वेळ घालवते. मुख्य म्हणजे गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून मी आमच्या इमारतीबाहेरही गेलेली नाही. त्यामुळे करोनाचे संकट टळल्यावर मुंबईतील ‘स्ट्रीट फूड’चा आस्वाद घेण्यासाठी मी फार आतुर आहे.

खारीचा वाटा

संपदा वागळे, ठाणे : ‘लोकसत्ता’ने २०१४ ते २०१६ अशी सलग तीन वर्षे व्यक्ती आणि संस्थांविषयी सदर लिहिण्याची संधी दिल्याने वेदनांचे एक वेगळे जग पाहता आले. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात सारेजण आपल्या घरच्या सामानाची बेगमी करण्यात गुंतले असताना मला त्या वंचितांचे के विलवाणे चेहरे आठवू लागले. वाटले की यातील एक-दोन संस्थांना थोडेफार पैसे पाठवावेत. पण तेवढय़ात गुरूंचे शब्द आठवले, ‘पैशाचे दान सगळ्यात सोपे. सेवा कधीही वरचढ. तेव्हा सेवेचा धर्म पाळायला हवा. जिथे काम तिथे शाम..’

पण या टाळेबंदीच्या काळात घराबाहेर न पडता कशी सेवा करता येईल बरे? विचार करताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली. लहान मुलांसाठी मी गोष्टींचे ऑनलाइन शिबीर घ्यायचे ठरवले. माझे टोपण नाव आऊ. त्यामुळे शिबिराला नाव दिले आऊच्या गोष्टी. याआधी मला मुलांसाठी काम करण्याचा अनुभव होताच. या शिबिरासाठी मी शुल्क आकारले होते, पण ते एका सामाजिक संस्थेला देण्याचे ठरले.

गोष्टी निवडून, रंगवून सांगणे माझ्यासाठी नवे नव्हते, पण मुलांना ऑनलाइन सांभाळणे अवघड होते. या कामात सून प्रिया हिने खूप मदत के ली. तंत्रज्ञान व्यवस्थित समजावून दिले. गोष्टीला अनुरूप छायाचित्रे शोधणे, ती योग्य वेळी पाठवणे हे सगळे तिच्याकडून शिकले. या शिबिरासाठी मलाही खूप अभ्यास करावा लागे, पण मुलांसोबत गप्पा मारताना मजा येत असे. या सगळ्या प्रक्रियेत अत्यंत समाधान होते. या शिबिरादरम्यान जमलेले शुल्क मी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला पाठवले. हाती असलेल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करून समाजकार्यात खारीचा वाटा उचलता येतो, हे मला या काळाने शिकवले. या दृष्टिकोनातून मी नक्कीच या करोनाची ऋणी आहे.

त्यांना सलाम!

शुभांगी शिवराम काटवटे : आम्ही डॉक्टर? नाही, विद्यार्थी (Medical student)  नाही,  इंटर्नसुद्धा नाही हो. आम्ही ते महाभाग आहोत, ज्यांची इंटर्नशिपही संपली आणि पूर्णत: डॉक्टरची पदवी (degree) पण हातात नाही. एकं दरीत साऱ्या देशावर एवढे मोठे संकट आलेले असताना, आमच्याकडे वैद्यकीय ज्ञानाची नवीकोरी तलवार असतानाही ती म्यानातून बाहेर काढण्याची परवानगी नसलेले आम्ही कमनशिबी. अशा अर्धवट अवस्थेत आम्ही नाशिकमध्ये घरात अडकलो होतो. एकच गोष्ट चांगली की आमची खानावळ सुरू होती. पण या वेळी डब्यापेक्षा काळजी होती ती, इतर जीवनावश्यक वस्तूंची. उदा. जंतुनाशके , साबण, मुखपटय़ा, हातमोजे, इ. घरातील प्रत्येक गोष्ट आणि व्यक्ती आत येण्याआधी त्यांचे वैद्यकीय शुद्धीकरण होत होते. अर्थात धुऊन पुसून घ्यायचे हो. कधी नव्हे ती घराची फरशी अगदी चमकत होती.  इतर वेळी कधीतरीच भेटणारी आणि के वळ लग्नाचा पुढचा नंबर तुझाच हं, असे वाक्य फे कणारी नातेवाईक मंडळीही आता पोटतिडकीने फोन करत होती. घरून सारखे ‘परत ये’चा धोशा लावला होता. याच दरम्यान माझ्या काकांचा मृत्यू झाला. पण या करोनामुळे जाता तर आले नाहीच पण अंतिम दर्शनही घेता आले नाही. हे दु:ख फार मोठे होते.  परतीचा प्रवास सुरू झाला, शासनाने चार वेळा वेबसाइट बदलली. आमच्यासारख्या स्मार्ट फोनवाल्या व्यक्तींना कळले, पण आमच्या शेजारच्या घरात अडकलेल्या बिचाऱ्या मजुरांना ते उमगलेच नाही. ते चालतच हजारो किमी जाण्यासाठी निघाले.  मला या परतीच्या प्रवासात दिसली ती डॉक्टर आणि पोलीस परिवाराची सेवा. आपल्यासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून राबणे. हे आपले खरे नायक! त्यांना सलाम!  हे सगळे के ल्यानंतर घरी पोहोचले तेव्हा अक्षरश: खोलीत बंद आहे. चौदा दिवसांचा हा अज्ञातवास संपला की कळेल काय ते. अस्पृश्यता ही कल्पना किती भयंकर होती, याची इतक्या तीव्रतेने प्रथमच जाणीव झाली. करोना लेका बास की आता! या रोगाच्या निमित्ताने बरेच काही शिकवलेस आम्हाला!

ऋणानुबंधाच्या गाठी

राजश्री भावे, ठाणे करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने टाळेबंदीची घोषणा केली, यापुढे आपण कोणत्याही मानवी संपर्काशिवाय कसे राहणार, याचे मला भलतेच दडपण आले. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. मुले परदेशात. एरवीही त्यांचे रोज २-३ फोन सुरू असतात. घरीही मी कधी एकटी नसते. नातेवाईक-ओळखीपाळखीचे येत-जात असतात. शिवाय आमच्या मदतनीस मावशी, माळी, भाजीवाले दादा, वीज दुरुस्ती करणारे असे माझे हे विस्तारित कु टुंब आहे. पण आता त्या सगळ्यांचीही ये-जा थांबणार. एरव्ही खंबीर असलेली मी या एकटेपणाच्या नुसत्या विचारानेच एकदम खचून गेले. रात्री झोप येईना! मन अस्वस्थ झाले! अशा वेळी अचानकपणे आठवण झाली ती शेजारच्या स्मिताताईंची. त्यांचे गुरू वामनराव पै यांच्या अनुभवांची. लगेच त्यांचे यूटय़ूबवरचे प्रवचन ऐकले. ते म्हणतात, ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘विचार बदला आयुष्य बदलेल’ या दोन वाक्यांनी एकदम धैर्य आले. मन शांत झाले आणि झोप लागली.

सकाळी उठल्यावर जवळच्याच एका स्नेही जोडप्याला फोन के ला. तेही ज्येष्ठ नागरिक, पण कु टुंबाच्या गोतावळ्यात राहणारे. माझी मन:स्थिती त्यांच्या लक्षात आली आणि ते दोघे त्वरित माझ्याकडे राहायला आली (अर्थात पोलिसांना विनंती करूनच. कारण टाळेबंदीच्या दुसऱ्याच  दिवशी रिक्षा- टॅक्सी बंद झाल्या होत्या. त्यांच्या मुला-सुनेने गाडीवरून माझ्याकडे सोडले.  या गांगल दाम्पत्याशी आमचा जुना स्नेह, पण इतके  दिवस चोवीस तास एकत्र राहण्याची ही पहिलीच वेळ. पण मनातली धाकधूक बाजूला ठेवून आम्ही एकमेकांत दुधातील साखरेप्रमाणे असे विरघळलो की जणू आम्ही कायमच एकत्र राहतोय. त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसालाही ते घरी गेले नाहीत. तो आम्ही इथेच श्रीखंड-पुरीवर ताव मारत आणि मुलांबरोबर झूम मीटिंग करत साजरा केला.आता लॉकडाऊन संपेपर्यंत आमची युती अभेद्य राहणार या विचाराने मला केवढे आश्वस्त केलेय म्हणून सांगू ! मध्येच एकदा माझ्या मानेत लचक भरली आणि पोळ्यांचा प्रश्न निर्माण झाला. काही दिवस भात खाऊन काढले, पण रोज रोज दोन्ही वेळेला भात खायची सवय नव्हती. काय करावे ते सुचेना! दरम्यान आमच्याकडे घरकामासाठी मदतनीस असणारी सविता हिचे रोज सकाळ-संध्याकाळ फोन यायचे- ‘आई तुम्ही बऱ्या आहात ना, काही हवे आहे का, खर्चाला पैसे हवेत का..’ वगैरे वगैरे. कारण सविताचा पगार दर महिन्याला तिच्या खात्यात जमा होतो.  टाळेबंदीच्या काळात मला बाहेर पडायला लागू नये म्हणून माझी मुले घरखर्चाचे पैसेही सविताच्या खात्यात जमा करू लागली. ती त्याच्या वस्तू आणून माझ्याकडे पोहोचवत असे. पोळ्यांचा प्रश्न कळल्यावर सविता लगेच म्हणाली, ‘आई काळजी करु नका. मी पाठवते.’ दुसऱ्याच दिवशी गेटवरचा वॉचमन सविताने पाठवलेली पिशवी  घेऊन आला. पिशवीत सर्वात वरती २ डबे- पांढऱ्या शुभ्र तगरीच्या फुलांनी गच्च भरलेले. माझ्या पतींचा ७ मेला स्मृतिदिन असतो हे तिच्या बरोबर लक्षात होते. सद्य परिस्थितीत बाहेर हार मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या फोटोला हार करण्याकरता ही फु ले. त्याखाली पोळीचा डबा, त्याखालच्या डब्यात मुलीने पाठवलेले आणि सविताने बँके तून काढून आणलेले पैसे.  खरोखर माझे मन भरून आले. सविता जगासाठी मदतनीस असली तरी माझ्यासाठी कु टुंबातील एक सदस्यच आहे.  सविताने पाठवलेल्या पिशवीत आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट होती. ती म्हणजे तिची माया.. त्याचे मूल्य कधी करता येईल का? आमच्या विस्तारित परिवारात आम्हाला गांगल पतीपत्नी, सविता यांच्यासारखी सहृदय माणसं जोडता आली हा ऋणानुबंधाचाच भाग! आज रक्ताची नाती लांब असताना या एकटेपणावर मी मात करू शकलेय ती अशा सुहृदांमुळेच !