पूर्व प्राथमिक विभागातील मुलांना एकाच वेळी मराठी मुळाक्षरं, बाराखडी, इंग्रजी अक्षरं, मराठी आकडे, इंग्रजी आकडे असं सगळं कडबोळं करून शिकवणं म्हणजे खरं तर बालशिक्षणाचा पूर्ण बट्टय़ाबोळ! यावर सगळ्यांचं एकच म्हणणं, पालकांचा दबाव. या सगळ्याला पुरे पडता पडता गोंधळलेल्या शाळा आणि शिक्षकांची दया यावी अशी स्थिती! प्राथमिक विभागात गेल्यानंतर अभ्यास कठीण जाऊ  नये म्हणून अनेक पालक मुलांना शिकवणी वर्गाला पाठवतात. याचे कारण खेळपद्धतीने घेतला जाणारा अभ्यास हा पालकांना अभ्यास वाटत नाही. पालकांमध्ये खेळपद्धतीबद्दल आणि त्याच्या फायद्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम म्हणूनच सातत्याने करणे खूप गरजेचे आहे. येत्या ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्ताने एका शिक्षिकेने लिहिलेला लेख..

असं म्हणतात की पालक हे मुलांचे पहिले शिक्षक आणि घर ही मुलांची पहिली शाळा. मुलांच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यात पालकांची भूमिका काय असावी, हा मला नेहमीच कुतूहलाचा आणि आपुलकीचा विषय वाटत आला आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या वयोगटातील मुलांच्या शिक्षणामध्ये काही गोष्टी पालकांच्या मदतीने आणि त्यांना मार्गदर्शन करून करायलाच हव्यात हे मात्र नक्की. त्याच्यासाठी शाळेने, शिक्षकवर्गानेही खास प्रयत्न करायला हवेत हेही तितकंच खरं आणि आवश्यक आहे. पालक आणि शिक्षक यांनी हातात हात घालून मुलांच्या प्रगतीसाठी पुढे जायला हवं एवढं मात्र नक्की. एक शिक्षिका म्हणून मला गेल्या काही वर्षांत अनुभव आले, त्यातून जे प्रकर्षांने जाणवत गेलं तेच इथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने मांडते आहे.

या मे महिन्यात, मी मराठी माध्यमाच्या बालवाडी शिक्षिकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेले होते. बालवाडी वर्गात घेता येतील अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे मार्गदर्शन या शिक्षिकांना मी करावं म्हणून मला बोलावलं होतं. प्रशिक्षणाच्या दरम्यान शिक्षिकांशी गप्पा मारताना मी त्यांच्या शाळेत पूर्व प्राथमिकसाठी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबद्दल बोलत होते. त्याही मनमोकळेपणे अनेक गोष्टी सांगत होत्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, ‘‘नेहमीप्रमाणे अक्षर ओळख, अंक ओळख, लेखन घेतोच; त्यात आता आम्ही इंग्रजी पण शिकवायला लागलो आहोत.’’ सगळ्या शिक्षिका जेमतेम सातवी, आठवी किंवा त्यापेक्षा फार तर थोडय़ा अधिक शिकलेल्या असतील. मी विचारलं, ‘‘इंग्रजी शिकवता येतं?’’ त्या कसनुसं हसत म्हणाल्या, ‘‘काय करणार? घ्यावंच लागतं. गाणी-कविता, ट्विंकल ट्विंकल वगैरे घेतो, अल्फाबेटस् शिकवतो.’’

‘‘घ्यावंच लागतं म्हणजे?’’ मी विचारलं. त्या म्हणाल्या, ‘‘अहो मॅडम, आम्ही जर इंग्रजी घेतलं नाही तर आमच्या शाळेत कोण मुलं पाठवणार?’’

‘‘का बरं?’’ मी त्यांना परत छेडलं. ‘‘अहो, आमच्या आजूबाजूला आता खूप नर्सरी झाल्या आहेत. ते सगळे इंग्रजी शिकवतात. मग आमच्याकडे प्रवेश घ्यायला आलेले पालक पण विचारतात, तुम्ही पण इंग्रजी शिकवता का म्हणून. नाही म्हटलं तर आमची शाळा बंद पडेल.’’ त्यांची अडचण त्यांनी प्रामाणिकपणे सांगितली. ‘‘अहो, पण तुम्ही स्पष्ट सांगत का नाही, आम्ही एवढा अभ्यास घेणार नाही म्हणून.’’ मी म्हटलं. त्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे, ‘हे कसं शक्य आहे?’ अशा चकित नजरेनं बघितलं. ‘पालकांचा दबाव आणि अवाजवी अपेक्षा’ त्यांच्या नजरेतूनच मला प्रश्नाचे उत्तर मिळत होते. आपल्या मुलांना शाळेत घातल्याच्या पहिल्या दिवसापासून मराठीच नाही तर इंग्रजीदेखील लिहिता-वाचता आलं पाहिजे, असं अनेक पालकांना वाटत असतं आणि त्यामुळे ही कसरत करावीच लागते ही त्यांची बाजूही त्यांच्या दृष्टीने रास्त होती, पण..

पूर्व प्राथमिक विभागातील मुलांना असं एकाच वेळी मराठी मुळाक्षरं, बाराखडी, इंग्रजी अक्षरं, मराठी आकडे, इंग्रजी आकडे असं सगळं कडबोळं करून शिकवणं म्हणजे खरं तर बालशिक्षणाचा पूर्ण बट्टय़ाबोळ! या पूर्वीही बऱ्याच शाळांमधून हे ऐकलं होतं. सगळ्यांचं एकच म्हणणं, पालकांचा दबाव. पालक ऐकत नाहीत. पालक सारखे विचारतात, काय अभ्यास घेतला? पालकांना वाटतं आपल्या मुलाला शाळेत घातलं, आता लगेच त्याला पटापट लिहिता वाचता आलं पाहिजे. या सगळ्याला पुरे पडता पडता गोंधळलेल्या शाळा आणि शिक्षकांची दया यावी अशी स्थिती!

मुलांबद्दल तर न बोललेलंच बरं. आधीच मराठी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या रोडावलेली. त्यात आपण इंग्रजी नाही घेतलं, मुलांना लगेच अक्षरं, शब्द वाचता आले नाहीत तर पालक आपल्याकडे पाठ फिरवतील, अशी बहुतेक शाळांना भीती. पालकांना खूश करण्यासाठी अभ्यासक्रमाची वाट्टेल तशी आखणी केलेली असते. पुन्हा वर प्राथमिक विभागाची एक अपेक्षा असतेच ती वेगळी! ते म्हणतात, ‘‘पूर्व प्राथमिकमध्ये मुलांची लेखनाची आणि वाचनाची पूर्ण तयारी करून घेतलेली असली पाहिजे, नाही तर त्यांना प्राथमिकचा पुढचा लेखन व वाचनावर आधारित अभ्यास झेपणार नाही.’’ मग पालकांच्या अपेक्षांचा व प्राथमिक विभागाच्या मागणीचा विचार करून सर्वसमाविष्ट असा कडबोळ्यासारखा एक अभ्यासक्रम पूर्व प्राथमिकसाठी आखला जातो, ज्यामध्ये वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात आणि या सगळ्यामध्ये तीन ते सहा वर्षांच्या मुलांचा सर्वागीण विकास करण्याच्या नावाखाली खेळघराच्या संकल्पनांना सुरुंग लावलेला असतो. पर्यायाने हसत खेळत बालशिक्षण संकल्पनेचा पुरता फज्जा उडालेला असतो.

मी गेल्या वर्षभरात ज्या ज्या शाळेतील शिक्षकांशी बोलले आहे किंवा प्रशिक्षण देण्यासाठी गेले आहे तिथे त्या शिक्षकांसाठी माझा पहिला प्रश्न असतो की तुम्ही मुलांना लिहायला वाचायला शिकवता हे ठीक आहे, पण त्याआधी मुलांच्या वाचनपूर्व आणि लेखनपूर्व तयारींवर भर देता का? लेखनपूर्व तयारी म्हणजे वळणं गिरवणे, किंवा वाळूत गिरवणे, सूक्ष्म स्नायू विकासाच्या कृती असं थोडं फार सर्वाना माहीत असतं, पण बहुतेक वेळा, वाचनपूर्व तयारी व त्याची आवश्यकता याची जाणीवच नसते. तुमच्या पालकांना या विषयी काही माहिती आहे का, असं विचारलं तर हमखास ‘नाही’ असंच उत्तर मिळतं. अशी काही कौशल्यं असतात, जी विकसित करणं गरजेचं असतं असं तुम्ही कधी पालकांना सांगितलं आहे का, असं विचारल्यावरही उत्तर नकारार्थीच असते. पूर्व प्राथमिकमधील मुलांच्या पालकांना अभ्यास म्हणजे केवळ ‘लेखन आणि वाचन’ असं न समजता मुलांची लेखनपूर्व व वाचनपूर्व कौशल्यं विकसित करण्याची आवश्कता आहे याची माहिती देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे वेळोवेळी लक्षात येत होते. मग हाच धागा पकडून पालकांमध्ये पूर्व प्राथमिकविषयी आणि त्यात घेण्यात येणाऱ्या अभ्यासाविषयी माहिती देण्यासाठी आमच्या शाळेत पालकांचीच या वर्षी सुट्टीतील शाळा घेण्यात आली.

आमच्याच पूर्व प्राथमिक विभागातील एका वर्गात पंचवीस ते सत्तावीस पालकांचा गट तयार केला. उपक्रमाचे नाव होते- ‘वाचनपूर्व तयारी- दोन दिवस’  काही चिठ्ठय़ा तयार करून ठेवल्या होत्या. वर्गात आल्याबरोबर सहभागी पालकांना एकेक चिठ्ठी उचलायला सांगितली. प्रत्येक चिठ्ठीवर एक पॅटर्न काढला होता. एकसारखे पॅटर्न असणाऱ्यांचे गट तयार केले. मग त्यांचे वाचनपूर्व तयारीवर आधारित वेगवेगळे खेळ घेतले. उदाहरणार्थ, दोन दोन कार्डस् देऊन त्यांच्यावर सारखी चित्र काढण्यास सांगितली मग ती सगळी एकत्र करून मधोमध ठेवली. खंजिरीच्या तालावर सगळ्यांना त्या कार्डाभोवती गोल फिरायला लावले. खंजिरीचा आवाज थांबताच प्रत्येकाने एक कार्ड उचलायचे आणि आपल्या सारखेच कार्ड असणाऱ्या आपल्या जोडीदाराला शोधायचे. वाचनपूर्व तयारीचा पहिला टप्पा -सारख्या चित्रांच्या जोडय़ा लावा अशा खेळात परिवर्तित झाला. वाचनपूर्व तयारीचा पहिला टप्पा मुलांकडून कसा करवून घ्यायचा याचे प्रात्यक्षिक पालकांना हसत खेळत मिळाले. मग वाचनपूर्व तयारीचा प्रत्येक टप्पा असाच खेळातून आणि कृतीतून पालकांनी  समजावून घेतला. अरे! हे वाचनासाठी आवश्यक आहे आणि आम्हाला तर माहीतच नव्हते, अशा प्रतिक्रिया आपसूकच उमटत होत्या. त्याचबरोबर या सगळ्या सोप्या क्रिया मुलांच्या वाचन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण आता घरीसुद्धा त्याच्याकडून करवून घेऊ  शकू याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

यांतरचा उपक्रम होता ‘लेखनपूर्व तयारी – दोन दिवस’  लेखनाचे वेगवेगळे पॅटर्न काढून पालकांचे गट केले. वर्गात आपापल्या गटांनी पालक बसल्यावर त्याच्यासाठी वेगवेगळ्या   कागदाच्या कृती करण्यास ठेवल्या होत्या जसं कागद फाडणे, कागदाचे गोळे करणे, कागदाचे बारीक बारीक कपटे करणे, कागदाचे चिमटीत पकडून बारीक बारीक गोळे करणे, कागद पिरगळून त्याच्या समईच्या वातीसारख्या वाती करणे, मातीकाम, वाळू मुठीने बाटलीत भरणे, वाळू बोटांनी सरळ रेषेवर आणि नागमोडय़ा रेषेवर सोडणे, ओढणीला पीळ घालणे, ओढण्यांची वेणी वळणे. या सगळ्या कृतींनंतर पालकांशी लेखनासाठी या कृतींचे महत्त्व याविषयी चर्चा केली तेव्हा हाताचे स्नायू विकसित होण्यासाठी आणि हाताची पकड मजबूत होण्यासाठी मुलांना अशा कृती मुलांना करू द्यायला हव्यात याबद्दल त्यांचे आपसातच एकमत झाले. त्यानंतर अजून काही कृती करून घेतल्या. डाव्या हाताचा कोपरा उजव्या पायाच्या घोटय़ाला आणि नंतर उजव्या हाताचा कोपरा डाव्या पायाच्या घोटय़ाला लावणे, डाव्या हाताकडच्या वस्तू, डाव्या हाताने उचलून समोर बघत उजव्या बाजूला ठेवणे; तसंच बरोबर विरुद्ध हाताने करणे, डावा हात आणि उजवा हात यांचा पीळ घालणे त्याचबरोबर डावा पाय आणि उजवा पाय यांचा पीळ घालणे आणि मग र्शयत लावणे अशा प्रकारच्या बऱ्याच कृती करण्यात पालक मग्न झाले होते आणि लहान मुलांसारखेच रमले होते. या सगळ्या क्रियाकृती वरवर करण्यास सोप्या वाटल्या तरी करताना तारांबळ उडत होती आणि सगळ्यांची हसून हसून मुरकुंडी वळत होती. त्याचबरोबर अशा कृतींच्या शर्यती लावल्याने पालकही त्यात रंगून गेले होते.

मग सगळ्यांना थोडा वेळ शांत बसवून विचारलं, या सगळ्या कृती आपण का केल्या असतील असं तुम्हाला वाटतं?  सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले होते. मग विचारलं, या कृती आणि लेखन याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? आता प्रश्नार्थक भावाची जागा आश्चर्याने घेतली. मी म्हटलं, गंमत आहे ना? ज्या लेखनाला आणि वाचनाला आपण आपल्या आयुष्यात एवढं महत्त्व देतो, आपल्या पाल्याचा अभ्यास म्हणजे पाठय़पुस्तकातील उत्तरांचे लेखन आणि पाठय़पुस्तकातील वाचन असेच आपण गृहीत धरतो किंबहुना ते जर त्याला येत नसेल तर त्याचं कसं होणार या चिंतेने आपण ग्रस्त होतो ते लेखन आणि वाचन कौशल्य विकसित करण्याबाबत मात्र आपण उदासीन असतो!

वाचनातील मुख्य अडथळे काय असतात? मुख्य म्हणजे वाचायला शिकणे म्हणजे नेमके काय करायचं? या प्रश्नांवर सत्राच्या सुरुवातीला चर्चा झाली. तेव्हा कोणालाच आपण वाचायला कसे शिकलो ते आठवत नव्हतं. शिवाय वाचायला शिकायचं म्हणजे काय हेही नक्की सांगता येत नव्हतं. पण प्रत्येकाला आपल्याला वाचताना नेमके काय अडथळे येतात हे मात्र नीट सांगता येत होतं. जसं शब्द गाळले जाणं, जोडाक्षरांचा उच्चार करण्यास कठीण जाणं. शब्दांची गाडी सुटल्यासारखं वाचणं म्हणजेच स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह यांचा बोध न होता वाचत राहाणं आणि त्यामुळे वाचलेल्या मजकुराचा अर्थ न उमजणं, वाचताना पूर्ण ओळ गाळली जाणं, किंवा परत परत तीच ओळ वाचणं यासारखे अनेक अडथळे प्रत्येकाला आठवत होते. लेखनाबाबतही अशीच चर्चा झाली. लेखन म्हणजे काय आपल्याला लिहायला आपसूक यायला लागले की खूप त्रास पडला? आपल्या लेखनातील अडथळे काय होते याच्यावर चर्चा झाली तेव्हा परत बहुतेकांना आपल्याला लिहायला कधीपासून यायला लागले हे आठवत नव्हते, पण लेखनातील अडथळे मात्र सांगता आले. जसं काही जण फळ्यावरचं उतरवून घेताना शब्द गाळत होते, तर काही जण जोडाक्षर लिहिताना गोंधळत होते. काहींना लिहिण्याचा प्रचंड कंटाळा असल्याचे आठवत होते. आता लेखनपूर्व तयारी आपली झाली होती का हे आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वळणे गिरवल्याचे आठवत होते, पण बाकीचे असे वेगळे काही विशेष प्रयत्न त्यांना आठवले नाहीत.

आपण सर्वानीच मुळात अभ्यासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘वाचन या कृतीचा’ अत्यंत बारकाईने विचार करणं आवश्यक आहे. ‘वाचणं’ म्हणजे काय याचा विचार केला तर असे लक्षात येईल की आपल्या डोळ्यासमोर जी चिन्ह (अक्षर) येतात त्यांना काहीतरी संबोधलं जातं हे आपण ऐकलेलं असतं, ते आपण उच्चारतो. ज्या मुलांचे वाचन कौशल्य विकसित झालं नसेल त्यांच्या बाबतीत डोळ्यासमोर असलेल्या चिन्हांमध्ये (अक्षरं) गोंधळ होतो. नेमका त्या चिन्हाचा उच्चार कसा करायचा. नजर ओळींवरून सराईतपणे वाचनाच्या दिशेने कशी फिरवायची. बारीक निरीक्षणाने अक्षरचिन्हातले फरक कसे ओळखायचे जसं ‘ब’ आणि ‘व’, ‘प’ आणि ‘ष’, ‘क’ आणि ‘फ’ वगैरे. तसेच एक वाक्य संपलं आणि दुसरं सुरू झालं याची जाणीव ठेवणे. या गोष्टी त्या मुलांसाठी अवघड असतात. म्हणजेच ऐकणं, पाहणं आणि बोलणं या तिन्हींचा समन्वय साधणं हे वाचन प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे वाचायला शिकायचं असेल तर या तिन्ही क्रियांचा सराव करणं गरजेचं आहे. त्यासाठी या तिन्ही क्रियांवर आधारित कृतींवर भर देणे आवश्यक आहे. त्या कृती मुलांकडून खेळामधून करवून घेणं गरजेचं असतं. वाचणं ही क्रिया मुलांसाठी केवळ शब्दांची अर्थहीन गाडी झाली की वाचलेल्या मजकुराचे आकलन होत नाही आणि त्यामुळे वाचनाची नावड निर्माण होऊन एकूण अभ्यासच कंटाळवाणा प्रवास होत जातो.

हेच लेखनपूर्व तयारीबाबतही म्हणता येईल. लेखनपूर्व तयारी म्हणजे वेगवेगळी वळणं गिरविणे एवढय़ावरच बऱ्याच शाळांतील शिक्षकवर्गाचाही माहितीचा साठा संपतो. फार फार तर सूक्ष्म स्नायू विकासाच्या क्रियाकृती करवून घेणे हे काही ठिकाणी माहीत असते. पण पालकांमध्ये मात्र याबद्दल फारशी माहिती नसल्याचे जाणवते. लेखनपूर्व तयारीचे ढोबळ असे चार भाग करता येतात- हात आणि बोटे यांच्यामध्ये ताकद येणे आणि नियंत्रण येणे.

हात व डोळे समन्वय साधणे.

दोन्ही हाताचा समन्वय साधता येणे.

त्याचबरोबर इतरही गोष्टी त्याच्या जोडीने आहेत, ज्याचा लेखनपूर्व तयारी म्हणून पालकांनीही विचार करावा. उदाहरणार्थ, खांद्यांमध्ये ताकद येणे, साधनांचा वापर नीट करता येणे, जो हात आपण प्रामुख्याने वापरतो त्याचा जास्तीत जास्त वापर करणे, हाताच्या बोटांची विभागणी करता येणे.

या सगळ्या वाचनपूर्व व लेखनपूर्व क्रियाकृती खेळाच्या माध्यमातून मुलांकडून भरपूर प्रमाणात पूर्व प्राथमिक विभागात करवून घ्यायला हव्यात. तसेच या कृती करण्याचं महत्त्व शाळांनी पालकांपर्यंत पोहचवायला हवं, तरच या वयोगटातील मुलांच्याकडून मिनी शिशुपासून करण्यात येणाऱ्या लेखन आणि वाचनाच्या अपेक्षांपासून मुलांची सुटका होईल. तसंच आपण जेव्हा मुलांना नर्सरी किंवा प्ले ग्रुपला घालतो तेव्हा आपल्या मुलांकडून अभ्यास आणि पुढील शाळेची तयारी म्हणजे अवास्तव लेखन करवून घेतले जात नाही ना याबाबत पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. माझ्या स्वत:च्या मुलीच्या वेळेस मी बालशिक्षणाच्या क्षेत्रात नव्हते. पण तिच्या शाळेत लहान आणि मोठय़ा शिशूत जे काही करवून घेतलं जायचे ते तिच्या क्षमतेच्या पलीकडचे होते आणि ते तिला येत नाही म्हणजे ती काहीही न करणारी असा तिच्या शिक्षिकेचा दावा होता. या त्यांच्या दाव्याखाली मीही तेव्हा दबून जात होते. कालांतरानेच माझ्या लक्षात आले, क्षमता मुलीची नाही तर तिच्या शिक्षिकेची कमी होती. आज १८ वर्षांनीही परिस्थिती तशीच आहे. प्राथमिक विभागात गेल्यानंतर अभ्यास कठीण जाऊ  नये म्हणून आमच्या शाळेतही अनेक पालक मुलांना शिकवणी वर्गाला पाठवतात. याचे कारण खेळपद्धतीने घेतल्या जाणारा अभ्यास हा पालकांना अभ्यास वाटत नाही. पालकांमध्ये खेळपद्धतीबद्दल आणि त्याच्या फायद्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम आमच्या शाळेत सातत्याने चालू असते. त्याला हळूहळू सकारात्मक प्रतिसाद येत आहे. पण हे काम सातत्याने करणे खूप गरजेचे आहे.

एकूण असं म्हणता येईल की वाचन आणि लेखनाच्या पूर्वतयारीबाबत पालक आणि शिक्षकांमध्ये मोठय़ा प्रमाणात जागरूकता आणणं हे मुलांच्या लेखन व वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी खूप गरजेचं आहे, ज्याचा फायदा मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात होईल. पालकांच्या सुट्टीतील या अशा कार्यशाळा रोजच्या छोटय़ा छोटय़ा कृतींतून मुलांना त्याच्या पुढच्या लेखनाच्या आणि वाचनाच्या प्रवासासाठी कसे तयार करून घेऊ  शकू यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. तसंच त्याचं महत्त्व जाणून पूर्व प्राथमिक वयोगटातील मुलांच्या शाळेकडून अवाजवी अपेक्षाही पालकांनीही करू नयेत. तरच पूर्व प्राथमिक मुलांची शाळा त्यांचे खरोखरचे खेळघर बनतील आणि दबाव, अपेक्षांच्या लोढण्याव्यतिरिक्त ती मुले बहरतील.

रती भोसेकर

ratibhosekar@ymail.com