फळं, भाज्या कच्च्या खाव्या हे आपण नेहमीच ऐकत असतो. पण अशा फळ-भाज्या खायला सगळ्यांनाच आवडतं असं नाही. काही बच्चेमंडळींना कांदा आवडत नाही, तर कुणाला काकडी, कुणी बीट-गाजर खात नाही, तर कुणी इतर काही. पण कोशिंबिरी खायला हव्यात हे तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असतं. त्यातून मिळणाऱ्या विविध जीवनसत्त्वांविषयी, पोषकांविषयी आपण शाळेमध्ये शिकतोदेखील.. माझ्या मित्रांनो, कळतं, पण वळत नाही, हेच खरं. मग माझ्याकडे एक धम्माल उपाय आहे. आपल्या जुन्याच कोशिंबिरीला एकदम मॉडर्न रूप दिलं तर?

चार जणांकरता साहित्य : एक मध्यम आकाराचा कांदा, एक-दोन मोठे पिकलेले, लालबुंद टोमॅटो, एक उकडलेला मोठा बटाटा, मूठभर अर्धे शिजवलेले हिरवे मटार आणि मक्याचे दाणे, एक छोटी काकडी, चवीनुसार चिंचेची चटणी किंवा बाजारात मिळणारा चिंचेचा सॉस किंवा एका लिंबाचा रस, एक छोटी हिरवी मिरची आणि एक-दीड छोटा चमचा मीठ व गोडीकरता साखर किंवा एक चमचा मध. सिक्रेट गोष्ट म्हणजे खारट, जिऱ्याच्या चवीची खारी असलेली बिस्किटं, उदाहरणार्थ पार्ले, मोनॅको किंवा चक्कं भेळपुरीच्या पुऱ्या.

अन्य साहित्य : भाज्या सोलण्याकरता सालकाढणं, चिरण्याकरता सुरी, लिंबाचा रस काढण्याकरता महादेव किंवा लिंबू पिळायचा चिमटा आणि कोशिंबीर बनवण्याकरता मोठं पातेलं किंवा कढई.

कृती : सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या भाज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हिरवे मटार आणि मक्याचे दाणे बाजारातून आणलेले, फ्रोझन मटार असतील तर फ्रिजमधून काढून कोमट पाण्यात घालून ठेवा. ताजे आणलेले असतील तर मात्र दोन कप पाणी गॅसवर चांगलं उकळून घ्या. यावेळी मदतीला आणि देखरेखीला घरातलं मोठं माणूस हवं बरं का! पाणी चांगलं उकळलं की त्यात थोडं मीठ घालून मटार-मक्याचे दाणे घाला. मंद गॅसवर एक मिनिट झाकण ठेवून वाफवा आणि मग पाणी गाळून वेगळं करा.

आता सर्वप्रथम काकडीची सालं काढून त्यांच्या पातळ चकत्या करून घ्या. मग टोमॅटोचे चौकोनी तुकडे कापून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. उकडलेल्या बटाटय़ाची सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करून घ्या. सर्वात शेवटी कांद्याची साल काढून तो उभा चिरून घ्या. मग त्याच्या लांब लांब होडीच्या आकाराचे पातळ तुकडे करा.

आता ही चिरलेली भाजी आणि मटार-मक्याचे दाणे कोशिंबीर करायच्या मोठय़ा पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये नीट दोन-तीनदा ढवळून घ्या. सगळ्या भाज्या छान मिसळल्या पाहिजेत. रंगीबेरंगी भाज्या पाहूनच तोंडाला पाणी सुटेल. तेव्हा आता त्यात सर्वप्रथम एका लिंबाचा रस पिळा किंवा तुमच्या आवडीनुसार चिंचेची चटणी किंवा चिंचेचा सॉस घाला. त्यानंतर मीठ, साखर घालून चांगलं ढवळून घ्या. साखरेऐवजी तुम्ही चमचाभर मधदेखील घालू शकता.

या कोशिंबिरीमध्ये वाफवलेला फुलकोबी, गाजर, बीट, झुकीनी किंवा कच्च्या गाजराचे पातळ काप, कोबीच्या पानांचे पातळ, लांब, नूडल्ससारखे तुकडेदेखील छान लागतात. शिवाय आवडत असेल तर ताज्या पनीरचे छोटे चौकोनी तुकडे किंवा उकडलेल्या अंडय़ाचे तुकडेही झक्कास लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या कोशिंबिरीमध्ये लिंबाऐवजी चवीनुसार कैरीचे बारीक तुकडेदेखील मी घालतो.

या कोशिंबिरीचं सगळ्यात महत्त्वाचं सीक्रेट म्हणजे अगदी वाढायच्या, खायच्या वेळेस यात बिस्किटाचे मोठे तुकडे किंवा जिऱ्याच्या चवीची किंवा खारी, छोटी बिस्किटं घालायची आणि लग्गेच सव्‍‌र्ह करायचं. सोबत कुणाला आवडत असेल तर वरून पिळायला लिंबू ठेवा. तिखटपणाकरता वरून थोडी मिरेपूड घाला किंवा चिंचेची चटणी घाला. ही चटकदार, कुरकरीत कोशिंबीर नुसतीच खायची मज्जा काही औरच! या कोशिंबिरीची चव तुमच्या एका खूपच आवडत्या, चटकदार पदार्थाशी मिळतीजुळती आहे. तेव्हा ही कोशिंबीर करून पाहा आणि तुम्हाला कोणत्या पदार्थाची आठवण झाली ते मला नक्की कळवा.

श्रीपाद

contact@ascharya.co.in