News Flash

म म मका!!

रिमझिम पावसात मक्याच्या विविध पदार्थावर ताव मारल्यावर मिळालेली जिव्हातृप्ती निव्वळ अवर्णनीय आहे!

मक्याच्या हेल्दी व रुचकर पाककृती

पावसाळा आणि कणीस हे समीकरणच न्यारे! रिमझिम पावसात मक्याच्या विविध पदार्थावर ताव मारल्यावर मिळालेली जिव्हातृप्ती निव्वळ अवर्णनीय आहे! हीच सुखद जिव्हातृप्ती अनुभवण्यासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी मक्याच्या हेल्दी व रुचकर पाककृती खास ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी दिल्या आहेत..

कॉर्न जालफ्रेझी

साहित्य : स्वीटकॉर्न १ पॅकेट, दूध १ वाटी, चिरलेला कांदा अर्धी वाटी, टोमॅटो अर्धी वाटी, सिमला मिरची १ वाटी, हिरवी मिरची २-३, कोथिंबीर ४ चमचे, तमालपत्र २, लाल मिरच्या २, आले-लसूण २ चमचे, मीठ चवीनुसार.

कृती : १ पॅकेट स्वीटकॉर्न धुऊन कुकरमध्ये १ वाटी दूध घालून शिजवून घ्यावे. अर्धी वाटी कांदे, अर्धी वाटी टोमॅटो व १ वाटी सिमला मिरची बारीक चिरून ठेवावे. मिरची व कोथिंबीरची एकत्र पेस्ट करावी. कढईत तेल घेऊन त्यात तमालपत्र, लाल मिरच्या, आले-लसूण व कांद्याचे वाटण टाकून परतावे. नंतर त्यात टोमॅटो, कोथिंबीर व मिरचीची पेस्ट घालून शिजलेले कॉर्न घालावे. २ मिनिटे ठेवून तेल सुटेस्तोवर शिजवावे. वरून थोडी कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करावे.

कॉर्न क्रीम टिक्का

साहित्य : स्वीट कॉर्नचा टीन १ नग, लिंबू १ नग, मीठ चवीनुसार, काळी मिरी १ चमचा, आल्याचे तुकडे ३ चमचे, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, तेल तळायला.

कृती : स्वीट कॉर्न फ्रायपॅनमध्ये घेऊन मिश्रण आटेस्तोवर शिजवावे. जरुरी पडल्यास थोडे कॉर्नस्टार्चचे पाणी घालावे. नंतर यात चवीनुसार मीठ व िलबू पिळून आल्याचे तुकडेसुद्धा घालावेत. हातावर तेल घेऊन याच्या छोटय़ा टिकिया बनवून कॉर्नस्टार्चच्या मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा.

क्रिस्पी कॉर्न

साहित्य : स्वीटकॉर्न १ वाटी, आले-लसूण पेस्ट २ चमचे, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, सिमला मिरची १ नग, सोयॉ सॉस १ चमचा, टोमॅटो सॉस १ चमचा, कोथिंबीर २ चमचे.

कृती : स्वीटकॉर्नचे दाणे उकळून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, मीठ घालून कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून घ्या. नंतर डीपफ्राय करा. फ्रायपॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून परतून घ्या. नंतर स्वीटकॉर्नचे दाणे घाला, शेवटी कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.

कॉर्न कबाब

साहित्य : मक्याचे दाणे जाडसर दळलेले ४ वाटय़ा, बटाटा उकडलेला २ वाटय़ा, मक्याचे पीठ १ वाटी, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट ४ चमचे, कसूरी मेथी १ चमचा, धने जिरे पावडर १ चमचा, तेल तळायला.

कृती : फ्राय पॅनमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यात जिरं घालावेत. त्यात हिरवी मिरची, आले, लसूण थोडी भाजल्यावर उरलेले सगळे मसाले, कोथिंबीर घालून खमंग भाजणे. नंतर हा मसाला मक्याच्या पिठात व बटाटय़ामध्ये मिसळणे. गोलसर चपटे कबाब तयार करून डिपफ्राय करणे. सव्‍‌र्ह करतेवेळी चाटमसाला, पुदिना चटणी व कचुंबरबरोबर सव्‍‌र्ह करा.

टीप – मक्याच्या पिठात तेलाचा अंश असल्यामुळे कबाब खुसखुशीत होतात. त्यामुळे त्यात मोहन किंवा सोडा घालू नये.

कॉर्न पालक मसाला

साहित्य : बारीक चिरलेली पालक २ वाटय़ा, बारीक चिरलेला लसूण २ चमचे, स्वीटकॉर्न १ वाटी, मीठ, साखर, लिंबू चवीनुसार, बारीक चिरलेला कांदा १ वाटी, फ्रेश क्रीम २ चमचे.

कृती : पाणी उकळत ठेवा, त्यामध्ये थोडे मीठ घाला. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पालक घालून लगेच बाहेर काढा व त्याची पेस्ट करून झाकून ठेवा. दुसऱ्या एका पॅनमध्ये बारीक चिरलेला लसूण फोडणीला घालून त्यावर मक्याचे दाणे छान परतून घ्या. चवीनुसार मीठ, साखर व लिंबू घाला. वाटल्यास कांदासुद्धा घालू शकता. नंतर पालकाच्या प्युरी घालून मिश्रण एकत्र करा. वर फ्रेश क्रीम घालून लगेच सव्‍‌र्ह करा.

कॉर्न हलवा

साहित्य : किसलेला मका ४ वाटय़ा, तूप ३ चमचे, मीठ चिमूटभर, अक्रोड २ चमचे, कोकोनट मिल्क पावडर १ वाटी, साखर २ वाटय़ा, मीठ चवीनुसार, वेलची पावडर अर्धा चमचा.

कृती : सर्व प्रथम तुपावर भुट्टय़ाचा कीस तांबूस रंगावर भाजून घ्या. नंतर त्यात साखर घालून एकत्र करा. चवीनुसार वेलची पावडर, १ चिमूट मीठ घालून एक वाफ येऊ द्या. जास्तीचे पाणी आटल्यावर त्यामध्ये कोकोनट मिल्क पावडर, अक्रोडचे तुकडे घालून सव्‍‌र्ह करा.

कॉर्न पकोडे

साहित्य : वाफवलेले मक्याचे दाणे दीड वाटी, ज्वारीचे पीठ अर्धी वाटी, बेसन ३ चमचे, हिरव्या मिरच्यांची पेस्ट २ चमचे, जिरे १ चमचा, कोथिंबीर पाव वाटी, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.

कृती : मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे. भरडलेल्या दाण्यात ज्वारीचे पीठ, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन, कोिथबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, तेल गरम करून गॅस मध्यम ठेवावा. लहान लहान गोळे तेलात डीपफ्राय करावे.

कॉर्न कोफ्ता करी

साहित्य : मक्याची कणसे २-३, आले-लसूण पेस्ट २ चमचे, हिरवी मिरची ३-४, कोिथबीर ४ चमचे, मीठ चवीनुसार, लिंबू १, मक्याचे पीठ पाव वाटी, स्वीटकॉर्न २ वाटय़ा, दूध १ वाटी, तेल २ चमचे, जिरे १ चमचा.

कृती : मक्याच्या कणसाचे दाणे मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोिथबीर, चवीनुसार मीठ व थोडे लिंबू पिळून गरज पडल्यास थोडे मक्याचे पीठ घाला, कोफ्ते तळून घ्या. २ वाटय़ा स्वीटकॉर्नचे दाणे घेऊन त्यामध्ये एक वाटी दूध घाला व मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रण गाळून घ्या. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घेऊन त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेली मिरची, लसूण घाला व थोडे पाणी घाला. नंतर या पाण्यात मक्याचे काढलेले दूध घाला. चवीनुसार मीठ व कोिथबीर घाला व त्यात तयार कोफ्तेसुद्धा घाला.

कॉर्न चाट

साहित्य : स्वीटकॉर्न २ वाटय़ा, अनारदाणे अर्धी वाटी, लिंबाचा रस १ चमचा, मीठ, साखर चवीनुसार, कोिथबीर पाव वाटी, जिरे पावडर १ चमचा, ओला नारळ २ चमचे, कॉर्नफ्लेक्स पाव वाटी.

कृती : २ वाटय़ा स्वीटकॉर्नचे दाणे वाफवून घ्या. त्यामध्ये अर्धी वाटी अनारदाणा, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, बारीक चिरलेली कोिथबीर, जिरे पावडर व २ चमचे ओला नारळ घालून मिश्रण एकत्र करा. त्यावर कॉर्नफ्लेक्स घालून लगेच सव्‍‌र्ह करा.

स्पिनच कॉर्न राइस

साहित्य : पालकाची प्युरी १ वाटी, लोणी २ चमचे, बारीक चिरलेला लसूण २ चमचे, हिरवी मिरची ५-६, मक्याचे दाणे पाव वाटी, तयार भात १ वाटी, मीठ, लिंबू चवीनुसार, किसलेले चीज ४ चमचे.

कृती : सर्व प्रथम पालकाची प्युरी काढून घ्या. (पालकाच्या प्युरीकरिता पालकाची पाने स्वच्छ धुऊन गरम पाण्यात घालून वाफवून घ्या. लक्षात ठेवा की, पालक जास्त वेळ गरम पाण्यात राहायला नको. नंतर त्याची लगेच प्युरी करा.) नंतर एका फ्रायपॅनमध्ये २ चमचे लोणी घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या. नंतर मक्याचे दाणे व तयार भात घालून छान परता. नंतर तयार पालकाची प्युरी, थोडे लिंबू, चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्या. सव्‍‌र्ह करतेवेळी वरून थोडे चीज किसून घाला.

संकलन – मितेश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:30 am

Web Title: corn recipe by chef vishnu manohar for loksatta readers
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : लक्स
2 ‘पॉप्यु’लिस्ट : प्रवासाची गाणी
3 ‘कट्टा’उवाच : ओओटीडी