दिग्गज टेक कंपनी Apple चार वर्षांनी पुन्हा एकदा सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी ठरली आहे. मार्केट ट्रॅकर Gartnerच्या रिपोर्टनुसार, Apple ने 2020 च्या चौथ्या तिमाहीमध्ये सॅमसंगच्या तुलनेत जास्त स्मार्टफोन विकले आणि सॅमसंगवर मात करत पहिला क्रमांक गाठलाय. 2016 नंतर पहिल्यांदाच अ‍ॅपलने ग्लोबल मार्केटमध्ये सॅमसंग आणि Huawei कंपन्यांवर मात करत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

विक्री किती झाली?

कंपनीने अलिकडेच लाँच केलेली iphone 12 सीरिज अ‍ॅपलसाठी गेमचेंजर ठरली. या सीरिजच्या स्मार्टफोनची जगभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाली याचाच फायदा अ‍ॅपलला झाला, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यानुसार, 2020 च्या चौथ्या तिमाहीत अ‍ॅपलने 79.9 मिलियन म्हणजे जवळपास 7.9 कोटी iPhone विकले, तर सॅमसंगने एकूण 62.1 मिलियन म्हणजे जवळपास 6.29 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. या कालावधीत स्मार्टफोन बाजारात अ‍ॅपलचा वाटा 20.8 टक्के, तर सॅमसंगचा वाटा 16.2 टक्के नोंदवण्यात आला. आयफोन 12 सीरिज लाँच होईपर्यंत सॅमसंग कंपनी अव्वल क्रमांकावर होती, पण आयफोन 12 ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर सॅमसंगवर अ‍ॅपलने मात केली आणि पहिला क्रमांक गाठला असं रिपोर्टमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

iPhone 12 सीरिज :-

Apple ने iPhone 12 सीरिजअंतर्गत चार आयफोन लाँच केले आहेत. यात iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या चार डिव्हाइसचा समावेश आहे. सर्व फोनला 5जी सपोर्ट असून यांच्यातील आयफोन 12 मिनी सर्वात स्वस्त आणि छोटा फोन आहे.