गेल्या काही वर्षांत आवश्यक कामांबरोबरच आता मनोरंजनाचे साधन म्हणून भ्रमणध्वनी आणि इंटरनेटद्वारे फेसबुकचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्याने प्रवासी, नातेवाईक आणि मित्रांसोबतचा एकमेकांना भेटून होणारा ‘संवाद’ काळाच्या ओघात हरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती होत असताना आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकाच्या भेटी घेणे कमी झाले असून त्याद्वारे होणारा संवादही कमी झाला आहे. काही वर्षांपूर्वी मोबाईल किंवा इंटरनेटची सुविधा असतानाही एकमेकांच्या घरी जाऊन किंवा प्रवास करताना संवाद होत असे. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांत सर्वाजवळ मोबाईल आल्यामुळे हा संवाद हरवला असल्याचे दिसून येत आहे. बाजारात महागडे मोबाईल आले आहेत. ते हमखास शालेय विद्याथ्यार्ंपासून महाविद्यालयीन युवक-युवती, सरकारी आणि खासगी कार्यालयातील कर्मचारी, व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर अशा विविध वर्गातील लोकांकडे ते दिसून येतात. विविध कंपन्यांच्या महागडय़ा मोबाईलवर ऑनलाईनची सुविधा असल्याने त्या माध्यमातून अनेकांचा ऑनलाईन संवाद होत आहे, पण यामुळे भेटीतील आनंद लोपत चालला आहे.
रेल्वे, बसगाडय़ा किंवा इतरही अनेक वाहनांमधून प्रवास करणारे एकमेकांशी आदराने बोलायचे. एकमेकांची चौकशी करायचे, चर्चेतून सुसंवाद घडायचा. शेतीचे हंगाम, आपापल्या भागातील पीक परिस्थिती, पाऊसपाणी, गावच्या जत्रा, नातेवाईकांची विचारपूस, ग्रामपंचायत निवडणूक, स्थानिक राजकारणापासून ते थेट दिल्लीच्या राजकारणापर्यंत चर्चा झडायची. राज्य व केंद्र सरकारच्या अनेक निर्णयांबाबत साधक-बाधक चर्चा व्हायची. वैशाख महिन्यात वाढते तापमान, जून महिन्यातील पाऊस, लग्नसराईबाबत चर्चा व्हायची. चर्चेतून मुला-मुलींच्या स्थळाचा विषय निघायचा. यातून एखादे चांगले स्थळ मुलगा किंवा मुलींसाठी नियोजित व्हायचे, परंतु असे चित्र आता सहसा दिसून येत नाही. वाहनांमध्ये आता पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक प्रवासी असतात. परंतु त्यांच्यात ‘संवाद’ नसतो. जो तो आपल्याच घाईत असतो. बहुतांश प्रवाशांच्या कानाला लावलेला असतो तो भ्रमणध्वनी. बराच वेळ ते भ्रमणध्वनीवर बोलत असतात. त्यामुळे सहप्रवाशांशी बोलायला त्यांना वेळच मिळत नाही. तर अनेक प्रवासी हातातील भ्रमणध्वनीवर तासन्तास गाणी ऐकत असतात. अनेकजण भ्रमणध्वनी संचात उपलब्ध असणारे खेळ खेळण्यात मग्न होऊन जातात. भ्रमणध्वनीने प्रवाशांना एवढे जखडून ठेवले आहे की, आपल्या शेजारी ओळखीचा प्रवासी बसलेला आहे, याचेही त्याला भान राहात नाही. परिणामी प्रवासात होणारा सुसंवाद हरवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
भ्रमणध्वनी व फेसबुकमुळे ‘संवाद’ हरवला..
फेसबुकचा वापर मोठय़ा प्रमाणावर होऊ लागल्याने प्रवासी, नातेवाईक आणि मित्रांसोबतचा एकमेकांना भेटून होणारा ‘संवाद’ काळाच्या ओघात हरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
First published on: 08-02-2014 at 02:27 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Communication lost with mobile and facebook