नियंत्रित आहारानंतर (डाएटिंग) लगेच पोषणमूल्ययुक्त आहार अशा पद्धतीने आहारात सातत्याने बदल करणे हे आयुर्मान कमी करणारे ठरू शकते असा धोक्याचा इशारा एका अभ्यासाअंती देण्यात आला आहे. याबाबत फळमाशीवर करण्यात आलेल्या प्रयोगात आहारात वेगवेगळे बदल करून आयुर्मान तपासण्यात आले होते.

ब्रिटनमधील शेफील्ड विद्यापीठात याबाबत संशोधन करण्यात आले असून त्यात आहारातील बदल हे माणसाची वार्धक्य प्रक्रिया किंवा वार्धक्यामुळे होणारे रोग रोखू शकतात का हा त्यातील मुख्य मुद्दा होता. सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून त्यात ड्रॉसोफिला मेलानोगॅस्टर या माशीला मर्यादित आहारावर व नंतर पोषक परिपूर्ण आहारावर ठेवण्यात आले होते. माशांच्या आहारात बदल केल्यानंतर त्या अधिक प्रमाणात मरतात व अंडीही कमी घालतात असे दिसून आले. मर्यादित आहारानंतर पोषणमूल्ये असलेला मोठा आहार माशांना पचवणे कठीण जाते त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवतो असे दिसून आले.

मानव व प्राण्यात पोषणूल्ये असलेला पण कुपोषण न होऊ देणारा आहार घेतल्याने आयुर्मान वाढते असा समज होतो. यात ज्या माशांचा आहार कमी करून त्यांना मर्यादित पण पोषक आहार दिला होता त्यांनी पुन्हा जास्त प्रमाणात आहार मिळून शरीराची हानी भरून येण्याची वाट पाहिली नाही उलट त्यांनी मृत्यूचा मार्ग पत्करला. यात जेव्हा आधी कमी आहार व नंतर जास्त आहार असे बदल केले गेले तेव्हा त्यांच्यात जास्त हानी झाली. आहार सातत्याने बदलणे किंवा कमी-जास्त करणे यामुळे जास्त घातक परिणाम होतात असे मत शेफील्ड विद्यापीठातील अँड्रय़ू मॅकक्रॅकन यांनी व्यक्त केले. याचा अर्थ काहीवेळा डाएटिंग करणे व नंतर आहार वाढवणे धोकादायक ठरू शकते असा आहे.