उन्हाळा आला की सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतात ती या महिन्यात मिळणारी फळं. त्यातही आता रानमेवा मिळणं थोडं कठीण झालं असलं तरी कलिंगड आणि आंबा ही फळे सहज उपलब्ध होतात. मात्र उन्हाळ्याची खरी मज्जा तर आंबा या फळाच्या सेवनानेच येते. मे महिन्यामध्ये आंब्याचा आस्वाद घेतला नाही तर या महिन्याची मज्जा तुम्ही लुटलीच नाहीत.

फळांचा राजा म्हणून आंबा सर्वत्र मिरवत असतो. उन्हाळ्यामध्ये तर प्रत्येक घरात त्याचे स्थान निश्चित असते. अगदी बाजारात आंबा आल्यापासून प्रत्येक घरात त्याच्यापासून तयार होणारे पदार्थ करण्यात येतात. यातच आंबाचा रस, मिल्कशेक, आंब्याची पोळी, आंबावडी यासारखे अनेक पदार्थ करण्यात येतात. मात्र, आपल्याला आंब्यापासून केवळ खाद्यपदार्थ करण्याबाबतच माहित आहेत. परंतु आता आंब्याचे इतरही काही फायदे आहेत. आंब्यापासून तयार झालेल्या फेसपॅकमुळे टॅन झालेली त्वचा उजळून निघते. त्याचप्रमाणे त्वचेवरील मृतपेशीदेखील निघून जाण्यास मदत होते. याप्रमाणेच आंब्याचे अन्य काही फायदे अविनव वर्मा यांनी सांगितले आहेत.-

१. आंब्याचा फेसपॅक – आंब्यामध्ये एक्सफोलिअन्टींगचे प्रमाण असते. या एक्सफोलिअन्टींगमध्ये त्वचेला हायड्रेटेड करण्याची क्षमता असते. या एक्सफोलिअन्टींगमुळे उन्हाने काळवंडलेली त्वचा उजळून निघते. त्यामुळे आपल्या फेसपॅकमध्ये आंब्याच्या फेसपॅकाचा समावेश असायलाच हवा. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आंब्याचा गर २ ते ३ मिनीटे संपूर्ण चेह-यावर लावून हलक्या हाताने चेह-यावर मसाज करावा. त्यानंतर हा गर वाळल्यावर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

२. आंबा-बेसनाचा फेसपॅक- कोणताही नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या फेसपॅकचा वापर केल्याने टॅन झालेली त्वचा पुन्हा उजळून निघतो. यामध्येच बेसन पीठाचा वापर केला तर चेह-यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते. तसेच चेह-यावरील लवही कमी होते. या बेसन पीठामध्ये आंब्याचा गर मिसळला तर त्याचे आणखी फायदे दिसून येतात. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका आंब्याचा गर, दोन चमचे बेसन, अर्धा चमचा मध आणि काही बदाम या सार-याचा लेप करुन तो चेह-यावर लावावा. हा लेप वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

३. आंबा, दही आणि केळ्याचा फेसपॅक – आंब्यामुळे त्वचेतील चमक वाढते. तर दह्यामुळे त्वचेला आवश्यक पोषकद्रव्य मिळतात. त्यामुळे या घटकांपासून तयार केलेला फेसपॅक चेह-यासाठी उपयुक्त आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आंब्याच्या गरामध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध एकत्र करुन हा लेप १० मिनीटे चेह-यावर लावावा. त्यानंतर लेप वाळल्यावर गार पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. या फेसपॅकमुळे उन्हाने टॅन झालेली त्वचा उजळून निघेल यात शंका नाही. त्यामुळे कोणत्याही प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक घटकांच्या मदतीने सौंदर्य खुलवणे केव्हाही चांगलेच.