iPhone 6 Plus धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जर तुमच्याकडे जुना किंवा डॅमेज झालेला आयफोन ६ प्लस असेल तर त्याबदल्यात अॅपलकडून नवा iPhone 6s Plus मिळू शकतो. MacRumors च्या वृत्तानुसार अॅपलच्या अधिकृत स्टोअरमधून बिघडलेला किंवा जुना आयफोन ६ प्लस लवकरच ग्राहकांना बदलून घेता येणार आहे.

वाचा : या वर्षात ‘iPhone X’ ची विक्री होणार बंद?

हा फोन का बदलून देण्यात येणार आहे किंवा आयफोन ६ प्लसचं नेमकं कोणतं व्हेरिएंट बदलून देण्यात येणार आहे हे मात्र अजूनही उघड झालेलं नाही. MacRumors नं पूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार अॅपल लवकरच आयफोन ६ प्लसचं उत्पादन थांबवणार आहे, म्हणूनच जुन्या आयफोन ६ प्लस धारकांना आयफोन ६ एस प्लस बदलून देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अॅपर स्टोअरमध्ये आयफोन ६ प्लसची बॅटरी बदलून घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. अॅपलनं दिलेल्या माहितीनुसार आयफोन ६ प्लसच्या मोबाईल बॅटरीचा आधीच तुटवडा आहे. त्यामुळे मार्च ते एप्रिलपर्यंत या बॅटरी उपलब्ध होणार नसल्याचं मॅक रुमर्सनं म्हटलं आहे. त्यामुळे त्या बदल्यात ग्राहकांना नवा फोन देण्याचा कंपनी विचार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बातमीबरोबरच या वर्षात आयफोनX ची विक्रीही कंपनीकडून थांबवण्यात येणार असल्याचं सुप्रसिद्ध विश्लेषक मिंग ची क्युओनं सांगितलं आहे.