टेट्रिस हा गेम खेळल्याने मन अवघड प्रसंगांनाही सहजपणे सामोरे जाण्यास सज्ज होते, असे एका संशोधनात दिसून आले आहे. अनेकदा मुलाखतीचा निकाल, वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष याबाबत अनिश्चितता असते त्याला सामोरे जाण्याची आपली मानसिक तयारी नसते त्यामुळे घाबरायला होते, अशा स्थितीत या गेमचा उपयोग होतो.

टेट्रिस हा व्हिडीओ गेम असून यात ‘स्टेट ऑफ फ्लो’नावाची संकल्पना असून त्याच्या आधारे मानसिक अवस्थेचा अदमास येतो. यात जगबुडी  झाली तरी चालेल पण मी घाबरणार नाही, अशी अवस्था नकळत तयार होते व असा कसोटीचा काळ पटकन सरतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे, की भावनिक दृष्टिकोनातून अप्रिय अनुभवातून जाणाऱ्या लोकांना अनिश्चिततेच्या काळात हा गेम उपयोगी ठरतो. अडथळ्यांची शर्यत पार करताना प्रवाही राहण्याची म्हणजे मार्गक्रमण करण्याची सवय यात लागते. पर्वतारोहण, बुद्धिबळ, पोहणे यांच्याशी तुलना केली असता २२० मुलांवर टेट्रिसचा प्रयोग जास्त फायदेशीर ठरला असल्याचा दावा इमोशन या नियतकालिकातील शोधनिबंधात केला आहे.

या मुलांना दहा मिनिटे टेट्रीस हा गेम खेळण्यास सांगण्यात आले असता त्यांच्यातील काळजी व चिंतेची भावना कमी झाली. नकारात्मक भावनांवर मात करण्यात त्यांना यश आले. ज्यांना तो खेळ नीट खेळता आला नाही त्यांच्यात सकारात्मक भावना निर्माण होणे कठीण गेले. प्राध्यापक केट स्वीनी यांच्या मते या खेळात कठीण, अधिक कठीण अशा चढत्या क्रमाने आव्हाने दिलेली असतात, त्यातून मार्ग काढण्यासाठी फ्लो पद्धतीचा वापर होतो. त्यामुळे जिथे अनिश्चितता अनुभवास येणार असते अशा काळात संबंधित व्यक्तींना त्रास कमी होतो.