डॉ. बिपीनचंद्र भामरे
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेक वेळा अनियमित झोपेच्या वेळा, चुकीची आहारपद्धती याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. बऱ्याच वेळा लहान वाटणाऱ्या आजारांकडे आपण दुर्लक्ष करतो, मात्र हेच लहानसहान विकार पुढे वाढत जातात. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार असल्याचं दिसून येतं. अनेकांचा कमी वयामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं आपल्या कानावर येतं. परंतु हृदयाशी निगडीत अन्यही काही आजार आहेत. त्यातलाच एक म्हणजे अरिथमिया.
अरिथमिया हा एक हृदयासंबंधित आजार आहे, ज्यामध्ये हृदयाचा ठोका अनियमित स्वरुपाचा असतो. याचे दोन प्रकार आहेत. पहिला टॅकिकार्डिया आणि दुसरा ब्रॅडकार्डिया. यापैकी टॅकिकार्डियामध्ये हार्ट बीट्स सामान्यपेक्षा जलद असतात. तर ब्रॅडकार्डियामध्ये हार्ट बीट्समध्ये हार्टबीट्स कमी असतात.
अरिथमियाची लक्षणे –
१. धाप लागणे
२. चक्कर येणे.
३. छातीत दुखणे.
४. अशक्तपणा येणे.
५. बेशुद्ध होणे.
६. छातीत तीव्र वेदना होणे
आजार होण्यामागची काही कारणे?
१. हृदयाच्या उतींमधील असाधारण बदल. जसे, हृदयातील रक्त प्रवाह कमी होणे, हृदयाच्या ऊती कडक होणे किंवा त्यावर जखम होणे.
२. अति परिश्रम व मानसिक तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि स्ट्रेस हार्मोन्स सोडण्यासाठी कारणीभूत ठरते, हे देखील हृदयाचा लय नसल्याचे कारण होऊ शकते.
३. रक्तप्रवाहात इलेक्ट्रोलाइट्स, हार्मोन्स किंवा द्रवपदार्थांच्या असंतुलनामुळे देखील हृदयाच्या गतीवर वर परिणाम होऊ शकतो.
४. हायपरटेन्शनच्या औषधांसारख्या औषधोपचारामुळे सुद्धा एरिथिमिया होऊ शकतो.
५. वाढते वय, अनुवंशिकता यासारख्या घटकांमुळे हृदयाचा लय नसण्याचा धोका वाढू शकतो.उपाय किंवा उपचार पद्धतीअरिथमियाचे निदान करण्यासाठी, डॉक्टर रुग्णाच्या कौटुंबिक इतिहासाविषयी, शारीरिक दिनचर्येबद्दल आणि इतर कारणाविषयी विचारपूस करतात. याव्यतिरिक्त, एक शारीरिक चाचणी केली जाते. यात डॉक्टर नाडी, हृदयाची गती आणि इतर आजारांची लक्षणे तपासतात.
इतर निदान तपासणी –
१. रक्त तपासणी – इलेक्ट्रोलाइट्स, लिपिड्स, हार्मोन्सच्या स्तरांचे मूल्यांकन करण्यासाठी.
२. इलेक्ट्रोकर्डियोग्राम (इसीजी) – हृदयाचा ठोका, त्याचा रेट, लय इत्यादींचे मूल्यांकन करण्यासाठी.
३. इकोकार्डियोग्राफी (हृदयाचा अल्ट्रासाऊंड स्कॅन).
४. शरीराच्या विविध भागांचे अल्ट्रासाऊंड – इतर रोग वगळण्यासाठी.
हृदयाचा लय नसण्याच्या उपचारांमध्ये परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. डॉक्टर हार्ट रेट स्थिर करण्यासाठी ब्लड थिनर्स, बिटा ब्लॉकर्स किंवा एडेनोसाइन्स सारखे औषध देऊ शकतात.काही गंभीर प्रकरणांमध्ये, हृदयाचा ठोका नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर आणि इम्प्लांटेबल कार्डियोव्हर्टर डिफायब्रिलेटर सारख्या प्रत्यारोपित उपकरणांचा उपयोग केला जातो.
आजारापासून दूर राहण्यासाठी ‘हे’ करा
१. धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
२. तणाव कमी करा आणि योग आणि ध्यानधारणा यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा.
३. डॉक्टरांच्या सल्लाने औषधे घ्या.
४. ताजे फळे, भाज्या यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या.
५.दररोज व्यायाम करा.
( लेखक डॉ. बिपीनचंद्र भामरे हे सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये कार्डिओ थोरॅसिक सर्जन आहेत.)