Benefits Of Reverse Walking: चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे असे म्हटले जाते. सकाळी उठल्यावर वर्कआउटच्या आधी काही मिनिटे चालल्याने शरीराला फायदा होतो. याशिवाय रात्री जेवणानंतर शतपावली केल्याने पचनक्रियेमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळते. चालण्याशी संबंधित अनेक व्यायाम तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये करीत असाल, पण तुम्ही रिव्हर्स वॉकिंग हा व्यायाम केला आहे का? रिव्हर्स वॉकिंग करताना उलटी पावले टाकत चालायचे असते. लहानपणी ही गोष्ट तुम्ही मज्जा किंवा खेळ म्हणून केली असेल. आधी खेळ वाटणारा हा व्यायाम शरीरासाठी खूप फायदेशीर असतो असे म्हटले जाते.

पायांचे स्नायू मजबूत होतात.

रिव्हर्स वॉकिंग केल्याने दोन्ही पायांमधील स्नायूंना बळकटी येते. मागच्या दिशेने चालल्याने स्नायू जास्त ताणले जातात. शिवाय हा व्यायाम करताना पाय दुखण्याचे प्रमाणदेखील कमी होण्याची शक्यता असते.

पाठदुखीवर आराम मिळतो.

रिव्हर्स वॉकिंग करताना पाठीच्या खालच्या भागावर दबाव येतो. यामुळे पाठीशी निगडित दुखणी कमी होऊ शकतात. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, असे लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने हा व्यायाम करू शकतात.

लक्ष केंद्रित राहावे यासाठी मदत होते.

रिव्हर्स वॉकिंग या व्यायामामुळे मानसिक आरोग्यदेखील सुधारते. मागच्या दिशेला चालताना फोकस असणे आवश्यक असते. या व्यायामामुळे मेंदूला लक्ष केंद्रित करायला मदत होते. त्याशिवाय मेंदू आणि शरीराच्या अन्य अवयव यांमध्ये समन्वय साधला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुडघ्यावर ताण येत नाही.

बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो. चालताना त्यांच्या गुडघ्यांवर ताण आल्याने त्यांना वेदना होत असतात. रिव्हर्स वॉकिंग करताना गुडघ्यांवर कमी प्रमाणात ताण येतो. गुडघेदुखीचा त्रास सहन करणारे लोक डॉक्टरांशी चर्चा करून हा व्यायाम करू शकतात.