How to Apologize : कोणत्याही नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असेल तर नाते दीर्घकाळ टिकते. नात्यात एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना वेळ देणे खूप जास्त गरजेचे आहे. अनेकदा नात्यात जोडीदार दुखावतो. आपल्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे जोडीदाराला खूप त्रास होतो अशावेळी त्यांना माफी मागणे गरजेचे असते. तुम्ही सुद्धा माफी मागता का? माफी मागताना तुम्ही फक्त सॉरी म्हणता का? मित्रांनो, माफी मागण्यासाठी सॉरी हाच फक्त एक पर्याय नाही. तुम्ही अनेक प्रकारे माफी मागू शकता.
जेनिफर थॉमस आणि गॅरी चॅपमन यांच्या “द फाइव्ह अपोलॉजी लँग्वेजेस: द सीक्रेट टू हेल्दी रिलेशनशिप्स” या पुस्तकात माफी मागण्याचे प्रभावी मार्ग सांगितले आहेत. आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
खेद व्यक्त करणे
विशिष्ट एखाद्या गोष्टीसाठी माफी मागणे, म्हणजे खेद व्यक्त करणे होय. ज्या कारणामुळे जोडीदार दुखावला असेल ते विशिष्ट कारण बोला आणि त्यासाठी माफी मागा.
जबाबदारी घ्या
एखादी चुकीची गोष्ट तुम्ही केली त्याची जबाबदारी घ्या. तुम्ही चुकीचे होते, हे जोडीदारासमोर स्वीकारा.
पुन्हा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करा
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विश्वास गमावला असेल तर त्यांना विचारा की तुम्ही असे काय करावे की ज्यामुळे ते पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवतील. नाते निभवण्यासाठी तुमची मेहनत त्यांच्या लक्षात येईल. यामुळे जोडीदार तुमच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्यास तयार होईल.
वचन देणे
“मी यावर काम करेन. या नंतर मी तुला असं कधीच दुखावणार नाही.” हे वचनबद्ध शब्द ऐकून जोडीदाराला चांगले वाटेल.
माफ करण्याची विनंती करणे
“तु माझी माफी स्वीकारशील का?” जर तुम्ही असे म्हणत असाल तर हे खूप मनापासून माफ करण्याची विनंती करत असल्याचे वाटते. वरील या पाच पद्धती वाचून तुम्हाला तुमची माफी मागण्याची पद्धत सुधारावी, असे वाटेल. तुम्ही यातील काही पद्धत वापरून माफी मागू शकता. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही नात्यात कितीही कठीण परिस्थिती असो या दोन गोष्टी असेल तर कधीच दोन व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण होत नाही.