Walking Benefits : तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात का की, ज्यांना डेस्क जॉबमुळे कंबरदुखीचा त्रास होतो? नवीन नॉर्वेजियन अभ्यासातून असे समोर आले की, दररोज १०० मिनिटे चालून तुम्ही कंबरदुखीचा त्रास २३ टक्क्यांनी कमी करू शकता. याविषयी आरोग्यतज्ज्ञ (Holistic Health Expert) डॉ. मेहता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.
JAMA नेटवर्क ओपन या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे सांगितले आहे की, वेळेचा कालावधी आणि त्याची तीव्रता वाढवल्याने दीर्घकालीन कुंबरदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. संशोधकांनी २०१७ ते २०१९ या दरम्यान सरासरी ५५ वर्षे वयोगटातील ११,००० हून अधिक प्रौढ लोकांकडून वैद्यकीय डेटा घेतला, त्याचबरोबर २०२१ ते २०२३ दरम्यानसुद्धा प्रौढ लोकांकडून तसाच वैद्यकीय डेटा घेतला आणि विश्लेषण केले; तर त्यांना असे दिसून आले की शारीरिक हालचाली केल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. पण, ते फक्त एका मर्यादेपर्यंत असतात; म्हणजेच १०० मिनिटांनंतर फायदे मिळणे थांबतात, म्हणूनच त्यांनी १०० मिनिटे हा वेळेचा कालावधी निवडला.
कंबरदुखी म्हणजे नेमकं काय?
कंबरदुखी म्हणजे तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील, म्हणजे कंबरेच्या खालील भागात होणारी तीव्र वेदना किंवा अस्वस्थता होय. यामुळे हालचाल करता येत नाही आणि काही वेळा या वेदना पायापर्यंत पसरतात. हे फक्त वृद्धांबरोबर घडत नाही तर २०, ३० आणि ४० वर्षे वयोगटातील लोकांमध्येसुद्धा कंबरदुखीचा त्रास दिसून येतो, कारण आपण शरीराची हालचाल न करता जास्त वेळ बसतो.
कालांतराने यामुळे पाठीच्या कण्यातील रक्ताभिसरण बिघडते आणि स्नायू कमकुवत होतात. पायांची हालचाल करण्यासाठी आणि वाकण्यासाठी महत्त्वाचे असलेले कंबरेचे स्नायू (hip flexors) कडक होतात. पाठीच्या हाडांमध्ये स्पंजसारख्या डिस्क असतात, ज्या मणक्यांना आधार देतात आणि हालचाल करण्यास मदत करतात. पण, जेव्हा त्याच्यावर ताण पडतो तेव्हा जवळच्या नसांवर (veins) दाब पडतो आणि वेदना जाणवतात, त्यामुळे थोडी जरी हालचाल केली तरी त्रास होतो.
चालणे आणि मणक्याच्या आरोग्याचा काय संबंध आहे?
चालणे ही क्रिया आपल्याला खूप सोपी वाटते, पण प्रत्येक पावलासह आपला पाठीचा कणासुद्धा हालचाल करतो. या हालचाली पाठीचा कणा निरोगी आणि लवचिक ठेवण्यास मदत करतात. चालण्यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगला राहतो, जो तुमच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम आहे.
चालण्यामुळे तुमची पाठ सरळ होते आणि तुमचे शरीर दोन्ही बाजूंनी समान रीतीने हालचाल करते. स्क्रीनसमोर किंवा सोफ्यावर पाठ वाकडी करून बसू नका. चालण्यामुळे तुमचे शरीर सरळ आणि संतुलित राहण्यास मदत होते.
चालणे हा एक कमी प्रभावशील व्यायाम आहे, जो वजन नियंत्रणात ठेवण्याससुद्धा मदत करू शकतो. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. अतिजास्त वजन उचलल्याने कणा आणि सांध्यांवर खूप जास्त दबाव येऊ शकतो, ज्यामुळे कंबरदुखी वाढते. चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदना कमी करणारे रसायन स्रवू लागते.
१०० मिनिटे कसे चालावे? यासाठी वेळ कसा काढायचा?
काही लोकांना १०० मिनिटे खूप वाटतील, पण एकाच वेळी १०० मिनिटे चालण्याची गरज नाही. ३० मिनिटे सकाळी चालणे, जेवणानंतर ३० मिनिटे आणि संध्याकाळी ४० मिनिटे (मीटिंग्ज किंवा कामादरम्यान फक्त तीन वेळा १०-१५ मिनिटे चालणे). फोन कॉल करताना हालचाल करा, पायऱ्या चढा, गाडी दूर पार्क करा किंवा तुमच्या पाळीव प्राण्याला घेऊन नेहमीपेक्षा जास्त वेळ चाला किंवा कॉफी पिताना बसण्याऐवजी एखाद्याला चालायला आमंत्रित करा. एखादी गोष्ट करणे आणि ती सातत्याने करणे हे ती गोष्ट परिपूर्ण करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
सुरूवात करा
जर तुम्हाला आधीच कंबरदुखीचा त्रास असेल तर आजच सुरुवात करा. नेहमी लहान गोष्टीपासून सुरुवात करा. पाच मिनिटेही तुम्ही चालला तरीही तुम्हाला फायदा होईल. ओळखीचा रस्ता निवडा. अनोळखी रस्त्याने फिरू नका. पायाला आधार देणारे शूज घाला आणि गरज पडल्यास आराम करा. जर वेदना वाढल्या, तर तेव्हा चालणे थांबवा आणि शक्य असेल तर परत या, कारण सातत्य महत्त्वाचे आहे तीव्रता नाही.