Himalayan Pink Salt Side Effects : तेजस्वी प्रकाश ही सर्वांत लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. अलीकडेच ती सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमात दिसली होती. दरम्यान, तिनं हल्लीच कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेलवरील एका शोसाठी मुलाखत दिली. त्यात तिनं खाण्या-पिण्याच्या आवडींविषयी सांगितलं. विशेष म्हणजे त्यात तिनं खास महाराष्ट्रीय जेवण बनवलं. याचदरम्यान तिनं रोजच्या आहारात पांढरं नाही, तर फक्त गुलाबी मीठ वापरत असल्याचं कबूल केलं.
पण, आहारात फक्त गुलाबी मीठ वापरणं शरीरासाठी योग्य आहे की, नाही हे समजून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसनं तज्ज्ञांचा सल्ला जाणून घेतला, तज्ज्ञ काय म्हणाले ते जाणून घेऊ…
पांढरं की गुलाबी; कोणतं मीठ शरीरासाठी फायदेशीर?
गुलाबी मीठ, ज्याला सामान्यतः हिमालयीन मीठ, असं म्हणतात. हे मीठ विशेषतः पाकिस्तानच्या खेवरा प्रदेशातील मीठ खाणीत आढळून येते, जो सैंधव मिठाचा एक प्रकार आहे. त्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुलाबी रंग त्यात अत्यल्प प्रमाणात आढळणाऱ्या लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियमसारख्या खनिजांमुळे येतो. ही खनिजे त्याला सौम्य स्वरूपात मातीची चव देतात, ज्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक या मिठाचा वापर करताना दिसतात.
गुलाबी मीठ हे कमी प्रक्रिया केलेला, जास्त खनिजे असलेला खाद्यपदार्थ आहे. त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नसल्याचा दावा केला जातो. पण, पांढऱ्या मिठात अँटी-केकिंग एजंट पदार्थ असतात, ज्याचे दीर्घकाळ सेवन केल्यास, ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. गुलाबी मीठ प्रामुख्याने सैंधव मीठ म्हणून विकले जात असल्याने त्यात भेसळ नसते, असे ‘द हेल्दी पॅन्ट्री’च्या आहारतज्ज्ञ आणि मधुमेह व दाह तज्ज्ञ खुशबू जैन तिब्रेवाला म्हणाल्या.
आहारतज्ज्ञ तिब्रेवाला म्हणाल्या की, गुलाबी मिठात शरीरास आवश्यक खनिजे असली तरी ती खूप कमी मात्रेत असतात. त्यामुळे त्याचा आरोग्यास तितकासा फायदा होत नाही, तसेच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठीदेखील गुलाबी मीठ तितकेसे फायदेशीर ठरत नाही. कारण- गुलाबी मिठात सोडियमचे प्रमाण पांढऱ्या मिठाइतकेच असते. लोक असेही मानतात की, गुलाबी मीठ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात बहुतेकदा गुलाबी मीठ म्हणजे काळे मीठ, असा अनेकांचा गोंधळ होतो, ज्यामध्ये हायड्रोजन सल्फाइड असते. पण, गुलाबी मिठात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठीचे कोणतेही गुणधर्म नसतात.
तसेच गुलाबी मीठ वापरताना ही काळजी घेतली पाहिजे. त्यात भारतीय माती आणि पाण्यात नैसर्गिकरीत्या आयोडीनचे प्रमाण कमी आहे, ज्यामुळे आपल्याला आयोडीनची कमतरता भासते आणि गलगंडासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच लोकांना नेहमी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचा सल्ला दिला जातो.
अशा परिस्थितीत गुलाबी मिठाचा पूर्णपणे वापर करणे हे शरीरासाठी फायदेशीर आहे, असे म्हणण्यापेक्षा जास्त हानिकारक आहे, असेही तिब्रेवाल्या म्हणाल्या.
त्यात गुलाबी मीठ दीर्घकाळ वापरल्याने आयोडीनची कमतरता निर्माण होईल. त्यामुळे हायपोथायरॉईड, गर्भधारणेशी संबंधित समस्या, केस गळणे, कोरडी त्वचा, ऊर्जा कमी होणे, गलगंड यांसारखे त्रास होण्याचा धोका वाढू शकतो, असेही तिब्रेवाला यांनी स्पष्ट केले.
त्यासाठी घरात गुलाबी मिठाबरोबर ३-४ वेगवेगळ्या प्रकारचे मीठ ठेवणे फायदेशीर ठरेल. दररोज वापरासाठी आयोडीनयुक्त पांढरे मीठ, चव व पोत यांसाठी गुलाबी मीठ, पचनासंबंधित गोष्टींसाठी काळे मीठ आणि उपवासासाठी, आयुर्वेदिक गरजांसाठी सैंधव मीठ वापरावे. कारण- मिठाच्या प्रत्येक प्रकाराचे फायदे आहेत. कोणतेही मीठ जास्त प्रमाणात किंवा वेगळे सेवन करू नये, असेही तिब्रेवाला म्हणाल्या.