3 Foods to Avoid in Hot Summer Season: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरt आहेत. कडाक्याचे ऊन आणि अंगाची होणारी लाही लाही यांमुळे उन्हाळ्यात जीव कासावीस होऊन जातो. उन्हाळा सुरू होताच शरीरात उष्णतेचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळे पचनसंस्था, त्वचा आणि एकंदर आरोग्यावर परिणाम होतो. योग्य आहार घेतल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो आणि शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तब्येत चांगली ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती ही की, हायड्रेटेड राहणे. कारण- शरीरात पाण्याची कमतरता अनेक समस्यांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळेच अनेकदा या दिवसांत भरपूर पाणी प्यावे, असा सल्लाही तज्ज्ञ मंडळी देत असतात.

वेगवेगळ्या ऋतूनुसार आरोग्याची तशी काळजी घ्यावी लागते. वाढत्या उन्हामुळे आपल्याला डिहायड्रेशन, अपचन, गॅस यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. चुकीच्या आहारामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उदभवतात. उन्हाळ्यात खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण- या ऋतूत पोटाशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात आहारात बदल करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तुम्ही काय खाऊ नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बेंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन एडविना राज यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. यासंबंधी सविस्तर जाणून घेऊ..

उन्हाळ्यात ‘हे’ ३ पदार्थ चुकूनही खाऊ नका

जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा

उन्हाळ्यात मसालेदार आणि तेलकट पदार्थांपासून दूर राहणे चांगले. उन्हाळ्याच्या दिवसांत तळलेले अन्न खाल्ल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि तुम्हाला दिवसभर पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ नका.

अधिक मीठ नकोच!

तुम्ही जेव्हा गरजेपेक्षा जास्त मीठ खाता तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. हृदयरोग, रक्तदाबवाढ या समस्या उद्भवतात. त्याशिवाय लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते. मीठ वा सोडियमचे अति सेवन हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. तेलकट आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ पचनाचा वेग कमी करतात. प्रकृती चांगली ठेवण्यासाठी मीठ मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साखरयुक्त पेये

उन्हाळ्याच्या दिवसांत लोक थंड पेये जास्त प्रमाणात पितात. कारण- त्यामुळे त्वरित शरीराला आराम मिळाल्यासारखे वाटते. परंतु, या पेयांमध्ये भरपूर साखर असते. जरी साखरयुक्त पेये ताजेतवाने करतात असे वाटत असले तरी ही पेये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे ती शक्यतो टाळलेलीच बरे. चहा-कॉफीचे सेवन शक्य झाल्यास टाळा.