पावसाळ्यामध्ये शरीरामध्ये पित्ताचा संचय होऊ लागतो ,म्हणजे ते शरीरामध्ये जमू लागते. शरीरामध्ये पित्त वाढत आहे, हे कसे ओळखावे?

१. शरीरातली उष्णता कमी होणे

शरीरामधली उष्णता कमी होणे अर्थात शरीराच्या विविध अंगांमध्ये उष्मा कमी होणे, हे पित्ताचा संचय होण्याचे प्रथम लक्षण आहे. पित्त म्हणजे शरीरातला अग्नी, शरीरातली उष्णता. पित्त जेव्हा स्वतःच्या स्थानांमध्ये जमा होऊ लागते, तेव्हा शरीरामधील इतर असंख्य कोषांमध्ये मात्र पित्ताची कमी जाणवू लागते. साहजिकच शरीरकोषांच्या विविध जैवरासायनिक क्रियांमध्ये आवश्यक असणारी उष्णता शरीराला कमी पडते. या उष्णतेच्या कमतरतेमुळेच अशा व्यक्तींना रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या शरीरामध्ये उष्मा व शरीराची उर्जा कमी झाल्याचे अनुभवास येते. याचे महत्त्वाचे निदर्शक लक्षण म्हणजे थंडी सहन न होणे. “हिवाळा सोसत नाही,थंडावा वाढला की अशक्तपणा जाणवतो, एसीचा थंडावा नकोसा वाटतो, पंख्याचा वारा सहन होत नाही,उघड्या पायांना घरातल्या लादीचा थंडावाही सहन होत नाही, रोजचेच आंघोळीचे पाणीसुद्धा गरम लागते, रोजचेच जेवण तिखट लागते “या आणि अशाच प्रकारच्या तक्रारी सांगणारे अनेक लोक असतात. त्या सर्वांच्या शरीरामध्ये तेव्हा शरीरामध्ये पित्त जमत असल्याची (पित्तसंचयाची) स्थिति आहे आणि त्यांना पुढे जाऊन पित्तविकार होण्याची दाट शक्यता आहे,असे निदान करता येते. हे आयुर्वेद शास्राचे वैशिष्ट्य आहे, जे प्रत्यक्ष रोग होण्यापूर्वीच रोग होण्याची संभावना लक्षात घेऊन त्यावर उपचार सुचवते. अशा तक्रारींकडे एकतर दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांना मानसिक त्रास असल्याचे लेबल लावले जाते.’

आणखी वाचा: नायटा झालाय? काय कराल?

२.उष्ण आहारविहाराचा तिटकारा

जेव्हा शरीरामध्ये पित्त जमत असते,तेव्हा ज्या कारणांनी पित्त वाढते, त्या कारणाविषयी त्या व्यक्तीला तिटकारा निर्माण होऊ लागतो. तिखट,खारट, आंबट पदार्थ खावेसे न वाटणे हे लक्षण अनेक रुग्ण सांगत असतात, जेव्हा “सोसत नाहीत ना, मग खाऊ नका,” असा सल्ला दिला जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तवात हे पित्तसंचयाचे लक्षण असते. केवळ तिखट-खारट-आंबट नव्हे तर तळलेले पदार्थ, लसूण ,मिरे, लवंग, मिरची, मोहरी, हिंग, आले, ओवा, अळशी, मेथी, खजूर, डिंक वगैरे शरीरामध्ये उष्णता वाढवणारे पदार्थ त्यांना नकोसे होतात किंवा त्रासदायक होऊ लागतात. केवळ उष्ण आहारच नव्हे तर उष्णता वाढवणारा विहार आणि (उष्णता वाढवणारी कामे व व्यवहार) सुद्धा त्यांना नकोसे होतात. जसे की आंघोळीचे रोजचेच पाणी गरम वाटणे, सूर्यप्रकाश नकोसा वाटणे, चमकणार्‍या वस्तूंकडे बघू न शकणे, टीव्ही-कम्प्युटर अशा किरणे फेकणार्‍या वस्तूंकडे फार वेळ बघितल्यास त्रास होणे, स्वयंपाकघरात अग्नीजवळ वावरताना त्रास होणे, उष्णतेच्या सान्निध्यात करायची कामे नकोशी वाटणे, उष्ण हवा नकोशी वाटणे, उष्ण वातावरणाचा तिटकारा वगैरे.अनेकदा या तक्रारी मानसिक समजल्या जातात. वास्तवात या तक्रारींना अत्यंत महत्त्व आहे. शरीरामध्ये पित्त वाढत आहे, हे समजून घेऊन त्या लक्षणांचा आदर करून त्यानुसार योग्य औषध-उपचार करुन, आपल्या आहारामध्ये व विहारामध्ये बदल केला तर पुढे जाऊन संभवणारे गंभीर आजार टाळता येतील.

आणखी वाचा: Health Special: योग्य पद्धतीने वजन वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ नक्की खा !

३. पीतावभासता

शरीरामध्ये पित्त वाढत आहे,हे ओळखण्याचे एक सहज लक्षात येण्यासारखे लक्षण म्हणजे पिवळ्या रंगाचा आभास. शरीरामध्ये पित्त वाढलेली व्यक्ती आपल्याला सभोवतालचे सर्व पिवळ्या छटेमध्ये दिसते असे सांगते. हा दृष्टीदोष नाही,याची खात्री केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पित्त साठत आहे (पित्त संचय होत आहे), असे निदान करता येते व त्यानुसार योग्य तो उपचार करता येतो. दुर्दैवाने अशा लोकांनासुद्धा तुम्हाला भास होत आहे, मानसिक उपचार घ्या, असा सल्ला दिला जातो. सामान्य वाटणार्‍या या तक्रारी दुर्लक्षित राहिल्याने किंवा त्यांचा योग्य उपचार न झाल्यामुळे पुढे जाऊन पचनसंस्थान, त्वचा, नेत्र, मस्तिष्क आदी अवयवासंबंधित पित्तजन्य (उष्णताजन्य) गंभीर विकार होऊ शकतात. साहजिकच पित्ताच्या या संचय-स्थितिमध्येच योग्य उपचार करुन पुढचे आजार टाळावेत.त्याच अपेक्षेने आयुर्वेदाने हे मार्गदर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.