Blankets Can Help Better Sleep : सध्या धावपळीच्या जगात शांत आणि चांगली झोप फार महत्त्वाची आहे; पण कित्येकांना चांगली झोप येण्यासाठी औषधांचा आधार घ्यावा लागतो. काही जण त्यासाठी योगासने करतात. रोज शांत झोप लागल्यास थकवा दूर होऊन, शरीरास ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. दरम्यान, चांगली झोप लागण्यासाठी एक प्रभावी पद्धत सांगितली जातेय आणि ती म्हणजे रात्रीच्या वेळी एक पाय ब्लँकेटच्या बाहेर ठेवून झोपणे. पण, ही पद्धत खरेच प्रभावी आहे का याविषयी आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. शीतल गोयल म्हणाल्या की, ब्लँकेटच्या बाहेर एक पाय ठेवून झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि याला विज्ञानाचा आधार आहे. पायांमध्ये विशेष रक्तवाहिन्या असतात, ज्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात. जेव्हा एका पायावर ब्लँकेट नसते तेव्हा शरीरातील उष्णता त्या पायामार्गे बाहेर पडू लागते. ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. ही बाब एक प्रकारे नैसर्गिक सिग्नलप्रमाणे काम करते, ज्याद्वारे मेंदूला झोपण्याची वेळ झाली आहे, असा सिग्नल मिळतो, असे डॉ. गोयल म्हणाले.
शरीराचे शरीराचे तापमान होते कमी
त्यामुळे शरीराचे शरीराचे तापमान कमी होते, जी बाब झोप येण्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण- शांत, गाढ झोप येण्यासाठी आधी शरीर थोडे थंड होणे आवश्यक असते.
झोपेच्या आधी अशा प्रकारे शरीर थंड झाल्यास मेलाटोनिन हार्मोनच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. मेलाटोनिन हे असे हार्मोन आहे, जे झोपेच्या चक्रात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात नैसर्गिकरीत्या आढळणारे हे हार्मोन झोपेचे चक्र नियंत्रित करते.
दरम्यान, एका पायावर ब्लँकेट घेऊन झोपण्याची ही पद्धत सामान्य वाटत असली तरी वैज्ञानिकदृष्ट्या फायदेशीर आहे. विशेषतः उबदार वातावरणात ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, असे डॉ. गोयल पुढे म्हणाले.
हैदराबाद येथील लकडी का पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट व क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. हिरन एस. रेड्डी यांनी असेही नमूद केले की, थर्मोरेग्युलेशन म्हणून ही पद्धत ओळखली जाते, जी शरीरातील तापमान स्थिर राखण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे.
पायांच्या तळव्यांमध्ये असंख्य रक्तवाहिन्या आणि खूप कमी केस असतात, ज्यामुळे तळव्यातून शरीरातील उष्णता नियंत्रित करण्याचे काम होते. जेव्हा एक पाय उघडा असतो तेव्हा शरीरातील अतिरिक्त उष्णता तळव्यातील रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडते, ज्यामुळे शरीराच्या मुख्य तापमानात थोडीशी घट होते, असे डॉ. रेड्डी म्हणाले.
त्याशिवाय ही पद्धत मेंदूला शांत राहण्यासाठी सिग्नल देते, ज्यामुळे मेंदू शरीराच्या सर्कॅडियन लयशी जुळवून घेतो आणि झोपेसाठी जबाबदार असलेल्या मेलाटोनिन हार्मोन्सच्या वाढीस प्रोत्साहन देतो.
झोपेच्या औषधांवरील संशोधनात असे आढळून आले की, त्वचा थोडीशी जरी थंड झाली तरी त्यामुळे पटकन गाढ झोप येऊ शकते, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
डॉ. रेड्डी असेही सांगतात की, रात्री घाम येणे, जास्त गरम होणे किंवा निद्रानाशग्रस्त व्यक्तींसाठी ही पद्धत प्रभावी ठरू शकते. औषधांशिवाय शांत झोप येण्यासाठी एक नैसर्गिक आणि घातक नसलेली पद्धत आहे. अनेकांना ब्लँकेटच्या बाहेर एक पाय ठेवून झोपण्याची ही पद्धत थोडी विचित्र वाटू शकते; पण वैद्यकीयदृष्ट्या योग्य आणि फायदेशीर ठरू शकते.